साहेब, पुण्यनगरीत आपले उत्साहाने स्वागत असो! पण पुण्यात पाय ठेवताच आपण ज्या शब्दांत आम्हाला सुनावलेत, ते ऐकून आम्हाला वाईट वाटले. समाजमाध्यमवाले ‘निसटावंत’ म्हणत असले, तरी आता आम्ही ‘निष्ठावंत’च आहोत. पण सवयी आणि आधीच्या पक्षातले संस्कार कधी कधी आडवे येतात. साहेब, शहरात बेकायदा फलक लावल्याबद्दल आपण नाराजी व्यक्त केली. फलक लावले म्हणून तिकीट मिळणार नाही असेही बजावलेत. पण साहेब, प्रसिद्धीसाठी वर्तमानपत्रांत व टीव्हीवर जाहिराती देणे आमच्यासारख्या सामान्य नेत्यांना कसे परवडणार? याची दखल घेऊन आपण आपल्या इशाऱ्याचा फेरविचार करावा, अशी नम्र विनंती आहे. साहेब, आम्ही अगोदर मतदारसंघाचा, मग राज्याचा आणि नंतर देशाचा विचार करत असतो. ती आमची परंपरा आहे. आपला चेहरा, नाव मतदारांसमोर राहिले, तरच राजकारणात टिकाव धरता येतो. त्यासाठी फोटोवाले फलक, बॅनर गावात लावणे ही आमची परंपरा आहे. साहेब, त्यासाठीच तर आम्ही अधिवेशनाच्या दिवसांत गाडय़ा काढून मुंबई गाठतो, विधानभवनासमोर फोटो काढून घेतो. विधानभवनाकडे बोट उंचावलेला फोटो बॅनरवर लावला तर आपले तिकीट नक्की होते, विधानभवनासमोर उभे राहून जनतेला नमस्कार करतानाचा फोटो फलकावर लावला तर नेता होता येते, असेही म्हणतात. म्हणून तसेही फोटो काढून घेतो. साहेब, विधानभवनात, मंत्रालयात आपली भेट व्हावी यासाठी आम्ही किती तरी खेटे घातले. आपल्याला गुच्छ देतानाचा फोटो बॅनरवर लावण्यासाठी असावा यासाठी ताटकळताना फुलांचे किती तरी गुच्छ कोमेजून गेले होते. त्याचे पैसे वाया गेल्याचे दु:ख नाही; कारण आमच्या गिरीशभाऊंच्या आशीर्वादामुळे आपल्याला निवेदन देताना फोटो काढून घेण्याची संधी आम्हाला मिळाली होती. साहेब, त्या निवेदनातील आमची मागणी पूर्ण व्हावी, मतदारसंघाचे काम व्हावे, अशी आमची मागणी नाही. पण ते निवेदन देतानाचा फोटो बॅनरवर लावण्यासाठी उदार मनाने परवानगी द्यावी, अशी मात्र आमची मागणी आहे. साहेब, आता गिरीशभाऊ दिल्लीत असले, तरी आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. त्यांच्याच आशीर्वादाने मागे दादांच्या केबिनमध्ये जाण्याची संधीदेखील आम्हाला मिळाली होती. दादा अध्यक्ष होणार असे आम्हाला तेव्हाच वाटले होते, म्हणून त्यांच्यासोबत काढलेले फोटोही बॅनरवर लावण्याचा आमचा इरादा होता. साहेब, ते फोटो तुम्हाला आवडणार नसतील, तर ते काढून टाकायची आमची तयारी आहे. पण साहेब, गावात फोटोवाले बॅनर लावले नाहीत तर आम्ही नेता कसे होणार, राजकारणात कसे येणार आणि टीव्हीवर जाहिराती देणाऱ्या नेत्यांपुढे आमचा टिकाव कसा लागणार, याचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची नम्र मागणी आहे. खरे तर आमच्या या शहरात बेकायदा गोष्टींना अगोदर पाठिंबा द्यावाच लागतो. तशी परंपराच आहे. हेल्मेटला बंदी घातली तेव्हाही आम्हाला मोठा पाठिंबा मिळाला होता आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे या वेळेपुरता बेकायदा बॅनरबाजीला विरोध न करता शहरभर बॅनर लावण्याची मुभा द्यावी. त्यातून आपला नेता निवडण्याची संधी मतदारांना द्यावी, अशी आमची नम्र विनंती आहे. आपली परवानगी असेल, तर बॅनरवर आपला फोटो मोठा राहील आणि आमचा फोटो लहान राहील याची काळजी घेण्याची आम्ही आपल्यास खात्री देतो. ऐन मोक्याच्या काळात दयावान होऊन आमच्या भविष्याचा विचार करावा, हीच साहेबांच्या चरणी आमची नम्र प्रार्थना आहे!

Story img Loader