घर फिरले की घराचे वासेही फिरतात म्हणे. हिंदी चित्रपटसृष्टीत सिनेमाघर फिरले तरी राहत्या घरांचे वासे फिरतात! स्टुडिओचा मालक असलेला नट दादरला एका चाळीत राहू लागला. मरिन लाइन्सला आलिशान फ्लॅटमध्ये राहणारा संगीतकार समुद्रकिनारी झोकात फिरताना आढळायचा. नंतर तो बिचारा ठाण्यात आपल्या एका चाहत्याच्या घरी राहू लागला व तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. बहारों की मलिका.. असणाऱ्या अभिनेत्रीलाही अखेरच्या काळात घरासाठी वारंवार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. आयुष्य बॉलीवूडमध्ये घालवल्यानंतरही घरदार विकून रस्त्यावर आलेल्यांची तर गणतीच नाही. पण घर ‘लाभत नाही’ म्हणून बदलणारेही हिंदी चित्रपटसृष्टीत कमी नाहीत. राजेंद्रकुमार याला त्याचा वांद्रय़ाच्या कार्टर रोडचा ‘आशीर्वाद’ बंगला लाभदायी ठरला नव्हता म्हणून त्याने तो विकून टाकला. राजेश खन्ना तेथे राहायला आल्यानंतर त्याचे २५ चित्रपट खूप चालले, पण अखेरच्या काळात तो एकाकीच होता. मात्र अगदी २०१२ पर्यंत, म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत तो इथेच राहिला. कारकीर्द पूर्णपणे उताराला लागूनही घर त्याने सोडले नाही. मधल्या काळात प्राप्तिकर खात्याकडून आता जप्तीच येणार, अशी स्थिती असतानाही ‘आशीर्वाद’ बचावला. तथाकथित दुर्दैवातही राजेश खन्नाकडेच सदैव राहिलेल्या ‘आशीर्वाद’मध्ये या सुपरस्टारचे संग्रहालय करण्याचा आग्रह अखेरच्या काळात त्याची देखभाल करणाऱ्या महिलेने धरला होता. पण तसे झाले नाही. मुंबईत सरकारी घर मिळवण्यासाठी कलाकार, नेते, पत्रकारांनीही कशा लबाडय़ा केल्या याच्या कहाण्या पुढे येत आहेत. बेकायदा इमारती पाडतानाही भेदभाव केला जातो. यात ‘आशीर्वाद’कडे कुणाचेही लक्ष नसताना हा तीन मजली ऐसपैस बंगला विकला गेला. त्याची जी किंमत सांगितली जाते ती फारच कमी आहे. काही कोटींमध्ये मानधन घेणाऱ्या त्याच्या जावयासाठी तर ही रक्कम फारच किरकोळ. नव्या मालकाने ‘आशीर्वाद’ अखेर पाडायला घेतला आणि भुईसपाट होत असताना, हा बंगला ‘शापित’ होता वगैरे अंधश्रद्धांच्या गप्पांना पुन्हा ऊत आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा