तोंडात सिगारेट ठेवून कितीही कठीण भाषेतले कोणतेही शब्द सहज बोलणारा, कितीही लांब किंवा कितीही उंच उडी मारू शकणारा, पडद्यावर पाहता पाहता एकाचे दोन- दोनाचे असंख्य होऊन पुन्हा एकमेव दिसणारा, फेकलेली प्रत्येक वस्तू हातात- किंवा हवी तिथे- परत आणणारा आणि ज्याचा चित्रपट पडद्यावर येण्याच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी लागते असा.. ही यादी पुढेही बरीच वाढवता येईल, पण हा एकमेवाद्वितीय अभिनेता म्हणजे रजनीकांत, हे वेगळे सांगावे लागणार नाही. प्रतिस्पध्र्याला गाफील ठेवून त्याचा नक्षा उतरवण्याच्या हजारो शैलीदार युक्त्याप्रयुक्त्या रजनीकांतमुळेच पडद्यावर दिसल्या. पण हाच रजनीभाई गेल्या दोन वर्षांत राजकारणात येणार म्हणाल्याने आदरार्थी बहुवचनात त्यांचा उल्लेख होऊ लागला, तेव्हापासून राजकारणातही शैलीदार चमत्कार पाहायला मिळणार म्हणून आसिंधुसिधूपर्यंतचे चाहते आसुसलेले होते. पण नाही! अपेक्षित असलेलेच करतील तर ते रजनीकांत कसले? रविवारी त्यांनी जाहीर करून टाकले- ‘मी किंवा माझ्या पक्षातर्फे कुणीही,यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाही. माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा कुणालाही नाही. कुणालाही माझे नाव, छायाचित्र.. काहीच आम्ही वापरू देणार नाही’. मग काय करणार? तर तमिळनाडूला पाणी मिळवून देणाऱ्या पक्षाला मत द्या, एवढीच भूमिका घेणार. केंद्रातील तो पक्ष गेल्या साडेचार वर्षांतील असेल की त्याआधीचा? हेही सांगणार नाही. रजनीकांत यांची राजकीय भूमिका घेणारी वक्तव्ये एक तर कमी. त्याची कारणे दोन. राजकीय पक्षाच्या स्थापनेनंतरही त्यांनी पडद्यावरच दोन भूमिका केल्या हे पहिले आणि आपला पक्षच निराळे आणि ‘आध्यात्मिक राजकारण’ करणारा असेल असे ते म्हणतात हे दुसरे. कुणाला(च) कदाचित दुसरे कारण कळणार नाही. पण रजनीकांत जर राजकारणाला अध्यात्म म्हणाले तर कुठल्याशा चमत्काराने ते खरेही ठरेल. सध्या तरी मौन, शून्यता, अपरिग्रह वगैरेंना स्थान असलेल्या जुन्या शैलीच्या अध्यात्माचा आधार रजनीकांत यांचे राजकारण घेते आहे. रजनीकांत यांनी आजवर राजकीय भूमिका जाहीरपणे मांडण्याचे मुख्य प्रसंग इनमीन साडेतीन. ‘लोकसभा लढणार नाही’ ही घोषणा म्हणजे या साडेतीनपैकी अखेरचा अर्धा प्रसंग, हे तर नक्कीच. कारण लोकसभा लढणार नाही, पण तमिळनाडूची विधानसभा निवडणूक मात्र लढणारच, हे निश्चित. परंतु याआधीचे तीन प्रसंग थोडक्यात पाहिल्यास, रजनीकांत यांच्या राजकीय अध्यात्माची कल्पना येईल. पहिला प्रसंग राजकारण-प्रवेशाच्या घोषणेचा, दुसरा प्रसंग त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या पक्ष-स्थापनेचा, आणि तिसरा प्रसंग, ‘एक विरुद्ध दहा असल्यास दहा जण ज्याच्याविरुद्ध एकत्र येतात तो मोठा’ या गेल्या वर्षीच्या वक्तव्याचा! हे वक्तव्य त्यांनी, ‘मोदींविषयी मी आत्ता काहीच बोलणार नाही, पण-’ अशा प्रस्तावनेनंतर केलेले होते. पण मोदीद्वेषाची कावीळ झालेले काही (रजनीकांतच्या पटीत काही) चाहते इतके नतद्रष्ट की, मोदीसुद्धा आता तमिळनाडूत सत्ताधारी पनीरसेल्वम, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, बिहारमध्ये नितीशकुमार आणि अन्य बिनचेहऱ्याचे नेते मिळून दहाएक जणांची साथ सांभाळताहेत याची आठवण आता काढताहेत. रजनीकांतचा पाठिंबा कुणाला, याचे वर्षभरापूर्वी मिळालेले उत्तर आता चालणार नाहीत, असे म्हणताहेत. याला रजनीकांत यांनीच कृतीने उत्तर द्यावे आणि ‘माइंड इट’ म्हणत विषय संपवावा, अशी आता उरलेल्या चाहत्यांची इच्छा आहे.
‘माइंड इट’ !
मग काय करणार? तर तमिळनाडूला पाणी मिळवून देणाऱ्या पक्षाला मत द्या, एवढीच भूमिका घेणार.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 20-02-2019 at 04:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth will not contest 2019 lok sabha elections