‘तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन’ हे वाक्य मोठे दिलासादायक आहे. यामागे मोठा विचार आहे. जेव्हा समाज समस्यांनी ग्रासलेला असतो, तेव्हा त्याला दिलाशाची खरी गरज असते. अशी वेळ ओढवते, तेव्हा संभ्रमित समाज या वाक्याचीच प्रतीक्षा करत असतो. हे वाक्य कानावर पडले की त्या समाजाला हायसे वाटते. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्यात जेवढा दिलासा असतो, तोच दिलासा या वाक्यातही असतो. रिपब्लिकन पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आवाजात तो दिलासा आहे. ज्या समाजाला दिलासा हवा असतो, त्यांना तो नेमका मिळून जातो. ‘तेव्हा मी तुमच्यासोबत असेन’ अशी ग्वाही जेव्हा रामदास आठवले या कविमनाच्या नेत्याने दिली, तेव्हा अनेकांना प्रश्न पडला आणि आठवलेंना ओळखणारे अनेक जण सुखावूनही गेले. अनुयायी संभ्रमावस्थेत असूनही सुखावले. एकाच वेळी अनेक राजकीय पक्षांनाही हायसे वाटले. महाराष्ट्राच्या राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील ही मतांची पेढी आपल्याबरोबर असावी असे अनेक पक्षांना वाटत असते. जेव्हाजेव्हा ज्या पक्षांना ते आपल्याबरोबर असावेत असे वाटले, तेव्हातेव्हा आठवले त्यांच्यासाठी धावूनही गेले. कधी ते काँग्रेससोबत राहिले, कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिले, कधी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे बोट पकडून शिवसेनेसोबतही चार पावलांची वाटचाल केली. आता केंद्रात आणि राज्यात मोदी-फडणवीस यांची सत्ता आली आणि आठवले भाजपच्या ‘रालोआ’ तंबूत दाखल झाले. राजकारणात अशी सर्वव्यापी व परोपकारी व्यक्तिमत्त्वे अभावानेच आढळतात. वेळ पडेल त्यानुसार व ज्याला जशी गरज वाटेल त्यानुसार कोणाबरोबर राहायचे याचा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. म्हणून, ‘तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन’ असे आठवले म्हणाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे अनेक राजकीय पक्षांनाही बरे वाटले. मुद्दा होता आरक्षणाचा! मोदी सरकारने आरक्षण बदलले तर सरकार राहणार नाही, असे अगोदर त्यांनी बजावले आणि साहजिकच, जर सरकार राहणार नसेल, तर साहजिकच आपण त्यांच्याबरोबर नसणार, हेही त्यांच्या या दिलाशातून स्पष्ट झाले. आरक्षण बदलले तर सरकार नसेल, मग अशा वेळी आपण कुणाबरोबर असणार याची उत्सुकता तमाम कार्यकर्त्यांना तसेच राजकीय पक्षांनादेखील असणार, असे आडाखे आजवरच्या राजकीय वाटचालीतून आठवले यांना नेमके बांधता येतात. त्यामुळे ही उत्सुकताही त्यांनी संपवून टाकली. ‘तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन’ असे ते म्हणाले आणि ज्यांना ज्यांना तो प्रश्न पडला, त्यांना हायसे वाटले. आता हे सरकार नसेल, तेव्हा त्या वेळी ते कोणाबरोबर असू शकतात, हेही कार्यकर्त्यांनी ओळखले आणि ते नि:शंक झाले. ‘जब तुम को आयेगी कळ, तब समझेगा मेरा बळ’ असा इशारा त्यांनी पूर्वीच देऊन ठेवला आहे. योग्य वेळ येईल तेव्हा ते हे खरे करून दाखवतीलच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा