छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन ‘रावसाहेबी’थाटात विवाह लावताना असा कितीसा खर्च झाला असेल? लगेच काय आमची ‘आय’ मोजायची असते काय? आयकर विभागाच्या नोटिसा खायला रावसाहेब काय जनधन खात्यात मोडतात का? आता पैसा कोठून आणला, असले बालिश प्रश्न कशाला विचारायचेत शेतकऱ्यांनी? त्यांनी आपली तूर बाजारात नेऊन बारदाना यायची वाट बघावी. पण नाही, पोटदुखी नुसती! बरं ज्याचं लग्न  झालं, तो साधा माणूस नाही, आमदार आहे. त्याला शोभलं तर पाहिजे लग्न; म्हणून जरा कुठं जेवणाचे पदार्थ वाढवले तर काय बिघडलं? चार-चार वष्रे दुष्काळात राहून पिचक्या मानसिकतेत राहणाऱ्यांनी असले प्रश्न विचारायचे कशाला? शिवसेनेनं सामूहिक सोहळ्याचा धडाका लावला होता. लाजंकाजं जालन्यालाही एक विवाहसोहळा लावलाच होता की. आता आत्महत्या होतात, शेतकरी सततच समस्येत असतो म्हणून थाटच करायचा नाही म्हणजे काय? ह्य़ा प्राप्तिकर विभागाच्या माणसांना एवढं काम दिलंय त्यांनी, तर आमच्याकडं लक्ष द्यायचं नाही, असा आदेशही त्यांनीच दिला असणार. प्राप्ती किती झाली, असले प्रश्न फक्त तूर विक्रीसाठी मोंढय़ात मुक्कामी राहणाऱ्या माणसांना असतात. थाटात विवाह सोहळा करणाऱ्याला हवीच कशाला प्राप्तिकराची नोटीस? आता मराठवाडय़ात शेतकरी आत्महत्या करीत सुटलेत त्याचा आणि विवाहाचा बादरायण संबंध जोडायचा म्हणजे अतिच झालं. गेल्या वर्षी १०९३, या वर्षी ११७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वर्ष सरले, पाणी भरपूर आले. पिकलेही चांगले. आता भाव पडले. कांदा पडला, तूर बारदान्याविना कोणी विकत घेईना, सोयाबीन गडगडले, त्यात आमचा काय दोष? सत्ता आमचीच असली तरी सगळ्या गोष्टींना आम्हीच कसे जबाबदार? पडलेल्या भावाचा आणि लग्नाचा काय संबंध? सार्वजनिक जीवनात आम्हीच आदर्श घालून द्यायला पाहिजेत, असा काही नियम आहे का? सोनरी झळाळी असणारा सेट तेवढा सगळ्यांच्या डोळय़ात खुपला. म्हणे ‘रावसाहेबी थाट’! केवढा त्याग आहे आमचा? आघाडीत चांगले संबंध असताना कधी पक्ष बदलला नाही. आता नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन-चार नातेवाईकांना दिल्या उमेदवाऱ्या, तेव्हाही अशीच पोटदुखी झाली. चांगलं काही बघवतच नाही. सत्तेचं वाटप आधी घरापासून करायला पाहिजे की नाही? नोटाबंदीनंतर शाही थाटासाठी नोटा कशा आल्या आणि कोठून, असला उचापतखोर प्रश्न विचारायचा म्हणजे अतिच. पण बरं झालं, प्राप्तिकर खात्यानं ‘चकवा’ दिला. कोचिंग क्लासवाले, कारखान्याचे व्यवहार कागदावर असतात. त्यांना पकडता येते. आम्ही लाखांचे पोशिंदे आम्ही ‘चकवा’ देणार. आता ‘चकवा’ यशाच्या शिखरावर आहे. तेव्हा त्याचा थाट असणारच. तुम्ही काहीही म्हणा, लोकमत आमच्याच बाजूने आहे.. आम्हीही लोकमताची बाजू पडू देत नाही.. तुम्हाला दिसत नसेल तर बसा कोळसा उगाळत.. किंवा रांगेत उभे राहा- कधी टँकरच्या, कधी दुष्काळी अनुदानाच्या, कधी तूर विक्रीच्या.