सरकार  कधीकधी खूपच संवेदनशील असते. असावेच लागते. त्यामुळेच, जनतेसही सरकार आणि सरकारातील मंत्री वगैरे लोक आपल्यासारखेच, आपल्यातलेच आहेत आणि आपल्याएवढेच ज्ञानी किंवा अज्ञानी आहेत, हे समजून चुकते. पण हे नेहमीच खरे नाही. रविशंकर प्रसाद हे भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत. कायदा खात्याचे मंत्रिपदही रविशंकर प्रसाद हेच मोदी सरकार (दोन)च्या पहिल्या दिवसापासून सांभाळतात. शिवाय, सकळ जनतेस शहाणे करून सोडण्याच्या सरकारी प्रक्रियेतही प्रसाद हे अधूनमधून सहभागी असतात. आर्थिक क्षेत्राचे सूक्ष्म ज्ञान त्यांना असावे.

मंदीपासून देशाला वाचवू असे खुद्द पंतप्रधानांनी म्हटल्याने आता जणू मंदीच्या लाटा थोपविण्यासाठी मंदीच्या प्रवेशाच्या वाटेवर लिंबूमिरची टांगली असावी असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण काही का असेना, मंदी खरोखरीच आहे किंवा नाही अशा शंकेस अजूनही वाव आहे, याची जाणीव रविशंकर प्रसाद  यांना मुंबईत असताना झाली, आणि ती त्यांनी खणखणीतपणे बोलून दाखविली. एकाच दिवसांत तीन चित्रपटांनी १२० कोटींचा गल्ला गोळा केला असेल, तर  मंदी आहे तरी कुठे? असा सडेतोड प्रश्न त्यांनी केला, पण तिकडे कुठे तरी गडबड झाली. मंदी आहे, असा सूर लावण्यास सारे जण तयार होऊ  लागले असतानाच प्रसाद यांच्या वेगळ्या सुरामुळे अर्थशास्त्राचे सारे निकषही चळचळा कापू लागले. अगदी घरात घुसू पाहणारी मंदी आता गायब झालीच, असेही वातावरण तयार झाले. शेअर बाजार वधारला, इकडेतिकडे सर्वत्र माणसेच माणसे दिसू लागली. रेल्वेगाडय़ा नेहमीप्रमाणे खचाखच भरून वाहत असताना, दिवाळीचे बंपर सेल गर्दी खेचत असताना, मॉल आदी दुकाने ओसंडून वाहत असताना, मंदी आहे असा क्षीण आवाज काढणाऱ्यांना प्रसाद यांनी सडेतोड जबाब दिला असे वाटत असतानाच, अचानक त्यांना संवेदनशीलतेचा साक्षात्कार झाल्याने तेजीच्या वातावरणाचा सारा नूरच पालटून गेला आहे. आपण संवेदनशील व्यक्ती असल्याने मंदी नसल्याचे मत मागे घेत आहोत असे प्रसाद यांनी स्पष्ट केल्याने आता सगळ्यांचा सूर एक झाला असला, तरी ती मंदीची मरगळ मात्र पुन्हा उसळी खाऊन उत्साहाने सर्वत्र दाटण्यास सज्ज झाली आहे.

प्रसाद यांनी आपले विधान मागे घेऊन चूक केली असे आमचे स्पष्ट मत आहे. मंदी रोखण्यासाठी कठोर उपाय हवे, मात्र प्रसाद यांचे ते आत्मविश्वासपूर्ण विधान काही तासांत त्यांनीच काढून घेतले आहे. आता मंदी खरोखरीच आली, तर तिला रोखणे कठीणच होईल. सरकारच्या सुरात सूर मिसळण्याच्या शिस्तीपायी त्यांनी मंदीला वाट मोकळी करून दिली असावी. आता सगळीकडे उत्साह दिसत असला, तरी त्यावर मंदीचे मळभ दाटलेलेच राहील. प्रसाद यांनी उत्साहावरच विरजण घातले आहे. ‘कुठे आहे मंदी?’ या त्यांच्या तीन शब्दांनी मंदीची धार केवढी तरी कमी झाली होती. पण आता पुन्हा मंदी उचल खाणार हेच खरे..

Story img Loader