परंपरेच्या गर्तेत रुतलेल्यांचा कायापालट करण्यासाठी कळकटलेल्या देहावर नवतेचा साज चढवावा, तसा प्रयोग टपाल खाते सध्या अनुभवते आहे. भारतीय टपाल खात्याच्या म्हणजे गावोगावीच्या पोस्ट ऑफिसांच्या कळकट कारभारात आता परंपरा आणि नवतेचा हा संगम दिसणार आहे. तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलात, तरी थेट तुमच्या दारी गंगा आणण्याचे ‘भगीरथ कार्य’ खाकी कपडय़ातला तो पोस्टमनसुद्धा करू शकणार आहे. कोण्या एका पुराणकाळी, स्वर्गलोकीहून गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी त्या भगीरथाला महत्प्रयास करावे लागले होते. आता मात्र, तुमच्या अंगणात अवतरणाऱ्या गंगेचे गुपित पोस्टमनच्या खाकी पोतडीतील एका लहानशा कुपीतून उलगडणार आहे. पोस्टमनच्या रूपाने भगीरथाचे आधुनिक अवतार गावोगावी जन्म घेणार आहेत. अगदी काल-परवापर्यंत, दारी आलेल्या पोस्टमनच्या हातातील कागदाची घडी त्यामध्ये दडलेल्या निरोपाचे संकेत देत असे. आता खाकी गणवेशातील तो नवा भगीरथ देशाचा गंगादूत म्हणून दारी येईल, तेव्हा, ‘गंगा आली रे अंगणी’.. अशा अपरिमित अनुभवाने घराघरातील आनंदाची कारंजी थुईथुई उडू लागतील. हरिद्वार-हृषीकेशच्या ताज्या धारेतील पवित्र गंगाजल घरोघरी पोहोचविण्याची दळणवळणमंत्री रविशंकर प्रसाद यांची योजना टपाल खात्याने उचलून धरली आहे. खासगी कुरियर कंपन्यांच्या स्पर्धेमुळे बटवडय़ाच्या कामात कंबरडे मोडल्यानंतर टपाल खात्याने व्यापारात पाय ठेवले आणि नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील छोटय़ा कारागिरांच्या रेशीम वस्त्रोद्योगाचा प्रसार करण्याचे व्रतही स्वीकारले. ‘देश पुढे चालला आहे’, अशी ग्वाही देणाऱ्या जाहिरातींच्या गर्दीत उद्या कधी ‘घरपोच गंगाजला’ची टपाल खात्याची जाहिरात दिसली, तर धक्का बसण्याचे कारण नाही. देशाच्या प्रगतीच्या पाऊलवाटा गंगेच्या पवित्र पाण्याने पावन होणार आहेत. ई-कॉमर्सच्या वाटेने घरोघरी येणाऱ्या साडय़ा-दागिने, मोबाइल फोन आणि तयार कपडय़ांच्या टपाल खात्याच्या उद्योगात गंगाजल व्यापाराची भर पडल्याने, नेमक्या ‘गरजेच्या क्षणी’ गंगाजलाची डिलिव्हरी व्हावी यासाठी वाट पाहावी लागणार नाही. ऑनलाइन बाजारपेठांच्या स्पर्धेत पाय रोवून बसलेल्या कंपन्यांनी गंगाजलाचा व्यापार केव्हाच सुरू केला आहे. गोमूत्र आणि गाईच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्यांनीही बाजारपेठेत धडक मारली आहे. गंगाजलाच्या व्यापारातील बडय़ा कंपन्यांच्या मक्तेदारीला टक्कर देण्यासाठी आपले टपाल खाते सरसावले आहे. गंगाजल डिलिव्हरीचा हा प्रयोग मनासारखा साधला, तर पुढच्या वेळी पोस्टाद्वारे गोमूत्र आणि गोबरदेखील मिळू शकेल आणि घरोघरीचे यज्ञयागादी दैवी सोहळे सुकर होतील. ई-व्यापार तंत्रामुळे एका क्लिकवर मिळणाऱ्या या वस्तू आणि त्याचा पवित्र ऑनलाइन व्यापार करणारे टपाल खाते आता परंपरेच्या कळकट गर्तेतून बाहेर पडणार यात शंका नाही.. परंपरा आणि नवता यांचा इतका सुंदर मेळ घालता येईल याची कधी कुणी कल्पना तरी केली असेल का?..

Story img Loader