आता देवसभेला असलेला शापवाणीचा अधिकार मत्र्यमानवाच्या सभेत उच्चारायला त्यांना कुणी परवानगी दिली, असले येडपट प्रश्न विचारत बसू नका. एकदा दिला म्हणजे दिला. आता बघा तुमचे वाईट कसे होईल ते. शेवटी तळतळाटातून जिभेवर आलेला शाप आहे तो. माझ्या सुनेची चौकशी करता काय? तिला सहा तास बसवून ठेवता काय? मग भोगा आता कर्माची फळे या उद्वेगातून समोर आलेला. सुनेला त्रास दिला म्हणून आनंदित व्हायला त्या काय खाष्ट सासू वाटल्या की काय तुम्हाला? अरे, अपार प्रेम आहे त्यांचे तिच्यावर. लाखमोलाच्या व त्यातही एकमेव असलेल्या सुनेवर प्रेम नाही तर आणखी काय करायचे? बसले आपले तर्क लावत, दोघीत न झालेल्या भांडणावरून! तुम्ही तिकडे लाल टोपीची खिल्ली उडवली, लखनऊत आयकराच्या धाडी घातल्या तरीही त्या शांतच होत्या. त्याचा प्रतीकात्मक विरोध म्हणून त्यांनी निलंबित खासदारांसह सर्वांनाच टोपी घालायला लावली. तरीही तुमचे डिवचणे सुरूच. त्याचे लोण थेट घरात शिरल्यावरही त्या शांतच बसतील अशी अपेक्षा तरी कशी करता? चित्रपटात सोज्वळ भूमिका केल्या म्हणजे त्या सोशीक आहेत, त्यांना राग येऊच शकत नाही असे वाटले तरी कसे तुम्हाला? आणि आता शाप देऊन झाल्यावर त्याची टर उडवता. कुणाकुणाची नावे घेऊन घाणेरड्या टिप्पण्या करता. अरे कुठे फेडाल ही पापे! त्यांनी तुम्हाला उद्देशून शाप दिलाय. २०२४ नंतर ‘शिळा’ होऊन जाल तेव्हा कळेल त्याचे महत्त्व. कळणारही नाही कसे दगड झालात ते. आणि त्या कशा काय शाप देऊ शकतात, त्या तर विज्ञाननिष्ठा मानणाऱ्या पक्षाच्या, असले मिरच्या झोंबणारे मुद्दे अजिबात समोर आणू नका. शाप काही फक्त संस्कृतिरक्षकांचेच पेटंट नाही. आहेत त्या विज्ञाननिष्ठा मानणाऱ्या पक्षाच्या पण त्यांचा पक्ष पहिलवानांचादेखील आहे. आखाड्यात उतरण्यापूर्वी हनुमानाचे नामस्मरण करणारे लोक आहेत ते. तुमच्यासारखे मंत्रजप व गंगेत डुबकी मारण्याचे प्रदर्शन करत नाहीत. लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सामान्याप्रमाणे सायकलीवरून फिरतात. शाप देण्याची कृती म्हणजे संस्कृतीचे दर्शन, तेही एका धर्माच्या. त्यामुळे येत्या निवडणुकीत समाजवाद्यांच्या ‘एमवाय’ समीकरणाला सुरुंग लागणार, पिताश्री व पुत्राचे प्रयत्न वाया जाणार, काकांना कवेत घेण्याचा बार फुसका ठरणार अशा ‘शेखचिल्ली’ स्वप्नात तर अजिबात राहू नका. शाप देण्यामुळे पक्षाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वालाच ठेच पोहोचली अशा कल्पनासुद्धा अजिबात रंगवू नका. आहेत त्यांच्याकडेही एक चाणक्य. ते आणतील त्यांना यातून बरोबर बाहेर. दुखावलेल्या महिलेचा शाप कसा खरा ठरतो हेच ते विजयी यात्रांमधून लोकांना पटवून देतील. सोबत त्यापण असतील. अजूनही जुने लोक ठेवतात त्यांच्यावर विश्वास. देवांच्या भूमीत शापाला किती महत्त्व असते याची कल्पना नाही तुम्हाला. तुम्ही बसाल बघत आणि हा शापच सायकलला पार पुढे घेऊन जाईल. एका स्त्रीचा संताप एवढा हसण्यावारी नेण्याचे काही कारण नाही. त्यामुळे यापुढे सभागृहात बोलण्यासाठी त्या उभ्या राहिल्या की शांतपणे त्यांचे ऐकून घ्या. मुद्दे सोडून बोलत असल्या तरी. आणि त्या शापावर उ:शाप कसा मिळवता येईल यासाठी पक्षाच्या पुरोहित सेलशी तातडीने संपर्क साधा. ते तुम्हाला सांगतीलच, खिल्ली उडवण्यापेक्षा शापातून मोकळे होणे केव्हाही चांगलेच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा