कानाने बहिरा मुका परि नाही, असा आपला देश बनला आहे काय? आज सुमारे आठवडा होत आला, परंतु अद्याप आपण भावी ‘पद्म’पाणी व महान अभिनेते ऋषी कपूर यांच्या सुविचारांवर फक्त चर्चाच करीत आहोत. ती ऐकत मात्र कोणीच नाही. ऐकत असते, तर एवढय़ा दिवसांत एक-दोन नामांतरांचे प्रस्ताव तरी केंद्र सरकारच्या दफ्तरी दाखल झाले असते. आपले सिने ऋषीमुनी दो बाहू उभारूनच नव्हे, तर गांधी-नेहरू घराण्याने ‘बाप का माल समझ रखा है क्या’ असा ऋजू सवाल बाह्य़ा सरसावून विचारीत आहेत आणि त्यावर कोणतीच कार्यवाही अजून होत नाही, हा चिंतेचाच विषय आहे. येरांना ऋषीमुनींच्या ट्वीटचा योग्य अर्थ समजणार नाही. काहींना ते ट्वीट म्हणजे देशातील पहिले देशभक्त अनुपम खेर यांच्याशी स्पर्धा वाटेल, परंतु या सगळ्यामागे विपणनशास्त्र आहे. लोकांच्या स्मृतिपटलावर सर्वात वरच्या स्थानी- टॉप ऑफ द माइंड- एखादे नाव असणे यास विपणनशास्त्रात खास महत्त्व असते. एखाद्या गोष्टीचा ब्रँड निर्माण होतो तो त्यातूनच. गांधी-नेहरू नामाचा ब्रँड काँग्रेसने तसाच तयार केला आणि त्याचा फायदा उपटला. आता पाळी भाजपची आहे. त्यांनाही त्यांचे ब्रँड तयार केलेच पाहिजेच. अन्यथा या ठोकभावाने लाभलेल्या सत्तेचा काय उपेग? सिने ऋषीमुनींनी हे बरोबर जाणले. एकीकडे गांधी-नेहरूंची नावे बदलावीत अशी मागणी होतानाच दुसरीकडे अकबराचे नाव पुसण्यासही आपले द्विज (म्हणजे दोन जन्मतारखा असलेले!) सेनानी व्ही. के. सिंग सरसावले आहेत. गंगा-जमनी संस्कृती हे ‘सिक्यिुलरां’चे मिथक आहे. येथे मुस्लीम हे आक्रमकच आहेत, तेव्हा त्यांचा वारसा, त्यांची संस्कृती हे पुसलेच पाहिजे, तरच देश आझाद (खऱ्या अर्थाने, कन्हैयाच्या नव्हे!) होईल, असा हा विचार आहे. तो रास्तच आहे. आता अकबरास न्या. काटजूंसारखे काही लोक अगदी राष्ट्रनिर्माता मानतात, पण त्यांना प्रेस्टिटय़ूट वा सिक्युलर म्हटले की प्रश्न मिटतो. मुद्दा संस्कृतिसंवर्धनाचा आणि म्हणून आधीच्या वारशांवर भगवा डिस्टेम्पर मारण्याचा आहे. याची सुरुवात रस्त्यांची, गावांची मुस्लीम नावे पुसण्यापासून आणि शेवट सारीच इस्लामी सामान्यनामे, विशेषनामे, भाववाचकनामे, साधी आडनामे बदलण्यापर्यंत झाला पाहिजे. या बाबतीत नविश्तन् हा फार्सी धातू तर राष्ट्ररक्षकांनी नीट ‘मार्क’ केला पाहिजे. कारण त्याच्या नवीस या धातुसाधितापासून कापडणीस, कारखानीस, कोटणीस, खासनीस, चिटणीस, जमेनीस, तटणीस, हसबनीस, पागनीस, पारसनीस, पोतनीस, वाकनीस, फडणीस, फडणवीस अशी आडनावे बनली आहेत. मुकादम, मुतालीक, मिराशी, मोगल, वकील, पागे, पेशवे, बाबूराव, बाजीराव, शहाजी, आबाजी अशी आडनावे-नावेही मुस्लीम संस्कृतीतून आली आहेत. या सगळ्यांचे नामांतर झालेच पाहिजे. ते झाले तरच आपल्या संस्था, योजना गांधी-नेहरूनामापासून आणि आपण मुस्लीमनामांपासून स्वतंत्र होऊ. आपले सिने ऋषीमुनी आणि द्विज सेनानी यांच्या नेतृत्वाखाली आपणांस ही नामांतराची नवी लढाई लढलीच पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा