संसार सुरू होऊन चार वर्षे होत आली तरी पाळणा हलत नसल्याने चिंतेचे वातावरण असतानाच एकदा कमळाबाईला ‘ती’ चाहूल लागली.. गोड बातमी आहे, असे तिने लाजत लाजतच नवऱ्याला- दादूला- सांगितले, आणि दादूलाही कमालीचा आनंद झाला. त्या रात्री, कमळाबाईसोबत दादू अंगणातल्या निंबोणीच्या झाडाखालच्या बाजल्यावर बसला आणि त्याने प्रेमाने कमळाबाईचा हात हाती घेतला. कमळाबाई सुखावली. दादूला आपल्याविषयी प्रेम वाटते, हे तिला ठाऊक होते, पण त्याने ते कधीच व्यक्त केले नसल्याने कमळाबाई नाराजच होती. कमळाबाईने कोणताही विषय काढला की दादू त्याला फाटेच फोडायचा. मग वादावादी व्हायची, पुढे काही दिवस अबोला, रुसवाफुगवा.. असं नेहमीच होत असल्याने, दादू आणि कमळाबाई एकमेकांशी फारसं बोलतही नसत. पण ती गोड बातमी समजली, आणि आता एकमेकांच्या भावना जाणून घेण्याचा क्षण आला याची दोघांनाही खात्री पटली. म्हणूनच, दादूने मायेने हातात हात घेताच कमळाबाई सुखावली. निंबोणीच्या झाडामागचा चंद्र हळूच फांदीआड गेला. कमळाबाईच्या चेहऱ्यावर चांदण्याची तिरीप पडताच, मन मोकळे करण्याची हीच वेळ आहे, हे दादूने ओळखले. ‘मग, काय नाव ठेवायचं बाळाचं?’ कमळाबाईच्या डोळ्यांत नजर गुंफून दादूने विचारलं. कमळाबाईने दादूकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत वेगळीच काही तरी चमक आहे, असं तिला उगीचच वाटू लागलं. काहीच न बोलता ती अंगठय़ानं माती उकरू लागली.  दादूनं पुन्हा विचारलं, ‘एक नाव सुचवू?’ ..आणि तिच्या परवानगीची वाट न पाहताच त्याने आपल्या मनातलं नाव सांगूनही टाकलं. ‘हे बाळ आपल्या घरात ‘समृद्धी’ आणणार आहे. आपली भरभराट होणार, आपल्या प्रगतीचा वेग वाढणार.. तेव्हा त्याचं नाव हेच ठेवायला हवं’.. दादू म्हणाला, आणि कमळाबाई चमकली. दादूच्या मनात ‘भगवं वादळ’ घोंघावू लागलंय हे कमळाबाईनं ओळखलं. आपण सुचविलेल्या नावास कमळाबाई नाही म्हणणारच नाही याची दादूला खात्रीच होती. आपल्यासोबत संसार करायचा असेल तर तिलाच तडजोडी कराव्या लागतील हे दादूला माहीत होतं. अंगणात काहीसा अंधार पसरला, आणि कमळाबाईने दादूचा हात हलकेच बाजूला केला. बाळाच्या जन्माची जेमतेम चाहूल लागली असताना, नाव काय ठेवायचं यावरून दादूनं उगीच वाद घालू नये असं तिला वाटत होतं. शिवाय, आपल्या बाळाचं नाव आपल्या आवडीचं असावं, अशीही तिची इच्छा होती. पण दादू आता हट्टाला पेटला होता. शेवटी कमळाबाईचा बांध फुटला. वाद वाढू लागला.. आणि आवाज अंगणातून घरात पोहोचला. दादूचा आवाज आता कमालीचा चढला होता. कमळाबाईलाही काय करावे सुचत नव्हते. अखेर घरातून म्हातारी बाहेर आली. ‘बारशाच्या दिवशी पाळण्याखालून बाळाला इकडून तिकडे देताना, ‘कुणी गोविंद घ्या’ म्हणतात, अन् तिकडून इकडं देताना, ‘कुणी गोपाळ घ्या’ म्हणतात.. तसं करा की.. पाळण्यातलं नाव एक ठेवा, आणि वापरायचं नाव एक ठेवा.. कशापायी वाद घालताय?’.. म्हातारी म्हणाली, आणि दादू-कमळाबाईनं एकमेकांकडे पाहिलं. ढग बाजूला झाले होते. दादू आणि कमळाबाई- दोघांच्याही चेहऱ्यावर चांदणं फुललं होतं..