‘एकचालकानुवíतत्व’ ते ‘सामूहिक नेतृत्व’ हा प्रवास तसा पचवायला खडतरच. पण एकदा तो पार पडला, की आचरायला अगदीच सोप्पा, हे आता संघ परिवाराच्या लक्षात आले असेल. संघाचेच अपत्य असलेल्या भाजपनेही सामूहिक नेतृत्वाचा स्वीकार केला. कदाचित, राजकारणात वैचारिक गोंधळाचे आणि सारवासारवीचे प्रसंग सातत्याने येणार हे परिवाराच्या धुरिणांनी अगोदरच ओळखल्याने एखादा कुणी काही बोलून गेला की दुसरा कुणी त्यावर बोळा फिरवण्यासाठी किंवा सारवासारव करण्यासाठी सज्ज असावा, हा सोयीचा हेतू त्यामागे असावा, असा अंदाज आहे. कोणे एके काळी, सरसंघचालकांचा शब्द हा अंतिम आणि काळ्या दगडावरल्या रेघेइतका ठाम असायचा, त्याच परिवाराच्या प्रवाहाला फुटणारे वैचारिक फाटे पाहताना निरीक्षकांनी तोंडात घातलेली बोटे बाहेर काढण्याची संधीदेखील त्यांना अजून मिळालेलीच नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महिन्यापूर्वी, तीन मार्च रोजी केलेले ‘नव्या पिढीस ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगितले पहिजे’ हे विधान संघाबाबत नसून देशाबद्दल आणि विशेषत: ‘जेएनयू’सारख्या विद्यापीठाबद्दल होते. कुणा ओवैसींनी त्यास नकार दिल्यामुळे वाद वाढू लागला आणि ओवैसींच्या पक्षाच्या आमदारावर विधानसभेतून निलंबित होण्याची वेळ आणली गेली. हे वादळ शमत असताना सरसंघचालकांनी २७ मार्च रोजी ‘जगभरचे लोक ‘भारत माता की जय’चा उद्घोष करतील’ अशी अपेक्षा जाहीर केली आणि २८ मार्च रोजी ‘कोणासही ‘भारत माता की जय’ म्हणण्याची सक्ती करू नये’ असा दंडक घालून दिला. दिल्लीत एका मुस्लीम तरुणाला ही घोषणा दिली नाही म्हणून हात मोडेपर्यंत मारहाण केल्याचे प्रकरण ३० मार्च रोजी बाहेर आले. मात्र ‘सामूहिक नेतृत्वा’च्या गोंधळतत्त्वानुसार संघाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते भयाजी जोशी यांनी परवाच राष्ट्रगीताच्या आणि राष्ट्रध्वजाच्या वादाची काडी लावून दिली. संघाला नेमके करायचे आहे तरी काय, हा प्रश्न उफाळून वर आलेला असतानाच स्वतंत्र विदर्भ, भारतमाता की जय आणि मंदिर प्रवेशासारख्या वादग्रस्त मुद्दय़ांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी हात घातला आणि सरसंघचालकांनी शमविलेल्या वादाचे निखारे फुंकर मारून पुन्हा चेतविले. ‘ज्यांना भारत माता की जय म्हणायचे नसेल त्यांना देशात राहण्याचा अधिकारच नाही,’ असे सांगून भागवत यांच्या सारवासारवीवरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोळा फिरविला. मुख्यमंत्रिपदाची घटनात्मक जबाबदारी ओळखून फडणवीसांनी हे विधान केले असेल, तर या तोंडी धोरणाला कायद्याचा आधार देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. तसे न होता फडणवीस बोलले असतील, तर ते भाजपमधील ‘सामूहिक नेतृत्व’ जपण्यासाठी बोलले की सर-सरसंघचालक या नात्याने मोहनराव भागवतांचे विधान फडणवीसांनी खोडून काढले, या बुचकळ्यात संघाच्या अनुयायांसह संघद्वेष्टेही राहतील!

Story img Loader