माणसाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते, की त्या वेळी तो जगण्याचा जमाखर्च आणि काय कमावले, काय गमावले याचा हिशेब मांडू लागतो. पण प्रत्येकालाच त्यातून निभ्रेळ उत्तरे मिळवायची असतातच असे नाही. आपल्याला हवे तेच उत्तर मिळवण्यासाठी त्यात बेरीज-वजाबाक्या केल्या जातात आणि हाती आलेल्या उत्तरातून खूप काही सापडले, अशी समजूतही करून घेतली जाते. मग हाच जमाखर्च गवगवापूर्वक जगासमोर मांडला जातो. कशासाठी जगावे, सुख-शांती आणि समाधान म्हणजे ते काय असते, भौतिक प्रगतीतच समाधान असते का, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यात असंख्य विचारवंतांनी आपली आयुष्ये वेचली, तरी सर्व प्रश्नांची उत्तरे अद्यापही कोणासही सापडलेली नाहीत. अशा परिस्थितीत, सर्व प्रश्नांची उत्तरे सापडलेला एखादा वाल्मीकी समोर आला आणि रामायणाऐवजी त्याने ‘बेस्टसेलर’ इंग्रजी पुस्तकच लिहायचे ठरवले तर?.. जीवनाचे सार समजावून सांगणाऱ्या त्या पुस्तकवाल्याला महात्माच मानले पाहिजे. ‘वाल्याचा वाल्मीकी झाला’ ही पुराणकथा सर्वानाच माहीत असली, तरी अशी उदाहरणे मात्र फारच क्वचित असतात. लाखो लोकांच्या संपत्तीतून स्वत:चे विश्व उभे करणे आणि त्या विश्वाचा उपभोग घेत यशाचे शिखर गाठून लोकांना त्याकडे आशेने पाहावयास लावणे यापरते सुख नाही अशी समजूत असलेल्या एखाद्याला अंतिम सत्याचा साक्षात्कार व्हावा, शाश्वत सुखाच्या शोधातून सापडलेले सत्य जगासमोर मांडण्याचा ध्यास त्याने घ्यावा हे तर अचाटच ऐतिहासिक कार्य झाले. सहारा समूहाचे सर्वेसर्वा आणि गुंतवणूकदारांना नाडण्याच्या प्रकरणातील आरोपी असलेले सहाराश्री, अर्थात सुब्रतो रॉय यांच्या हातून हे अचाट कार्य घडणार असे संकेत आता मिळू लागले आहेत. मुंबईत एका त्रस्त गुंतवणूकदाराने मागे एकदा त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली, तेव्हापासूनच त्यांना शाई वापरावी असे वाटले असावे. आशियातील सर्वात मोठय़ा तिहार तुरुंगात केवळ खितपत पडण्यापेक्षा, ‘जगण्याचा अर्थ शोधून सापडलेल्या सत्याचे सार’ ते आता समाजासमोर मांडणार आहेत. भारतातील प्रतिष्ठित अशा रूपा प्रकाशनाने ते काम खांद्यावर घेतले आहे. सहाराश्रींच्या जीवनगाथेतून जगण्याचा कोणता मंत्र जगाला मिळणार आणि त्या मंत्राचा जप करून जगणारे जग कोणत्या वाटेने जाणार हा प्रश्नच आहे. शिवाय, भारतमातेचे प्रचंड पुतळे उभारून त्याच मातेची मुले असलेल्यांना ‘धीर धरा, परतावा नक्की मिळेल’ असे सांगणाऱ्या सहाराश्रींना जीवन कळले असणारच; पण त्यांना जीवन ज्या प्रकारे कळले, त्यात लबाडी आहे किंवा कसे यासारखे प्रश्न सध्या न्यायालयाच्या अधीन आहेत. तेव्हा प्रगती वगैरेचे मंत्र मिळवण्यापेक्षा, चेहरे आणि मुखवटे यातील फरक ओळखण्यापुरता तरी या जगण्याच्या मंत्राचा उपयोग झाला तरी ते चांगलेच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा