शासकीय व्यवहारातील मराठी शब्दकोशामधील ‘वाहन’ या शब्दाचा अर्थ ग्रामपंचायतींपर्यंत झिरपला नसल्याने, परभणी जिल्ह्य़ातील गोदाकाठच्या काही गाढवांचे चांगलेच फावले आहे. गाढवे हुशार असतात, हे याआधी किती तरी वेळा स्पष्ट झाले आहे. पाठीवरच्या मिठाच्या गोणींचे ओझे हलके करण्यासाठी पाण्यात डुबकी मारणाऱ्या ‘स्मार्ट गाढवाची गोष्ट’ तर जगजाहीर आहे. अशाच गाढवाच्या हुशार जातकुळीतील काही गाढवे परभणी जिल्ह्य़ातील वाळूमाफियांनी कामाला लावली. गोदापात्रातून खोदलेली चोरटी वाळू गाढवांच्या पाठीवरून वाहून नेल्यास गाढवांवर दंड आकारला जाणार नाही, हे गुपित वाळूमाफियांनाच माहीत होते, की संबंधितांनी त्यांना ते समजाविले हे समजण्यास मार्ग नाही. तथापि, अशी शंका घेणे किंवा तिचा कीस पाडणे हे आपले काम नाही, हे त्या गाढवांस नेमके माहीत असावे. तसेच पाठीवरची वाळूची पोती जप्त झाली तरी आपल्या केसासही धक्का लागणार नाही, असे त्यांचे मालक आपापसात बोलल्याचेदेखील त्यांनी ऐकलेले असावे. वाहन या शब्दाचा नेमका अर्थ सरकारी व्यवहारातील मराठी शब्दकोशात मुळातच नव्हता, की तो शब्द असलेला कागद कोणा उकिरडय़ावर पडला व गाढवांनीच तो कागद गिळून टाकला, हे समजण्यासही मार्ग नाही. मात्र, वाहन या शब्दाच्या अर्थाचा कीस पाडूनही आपली गणना ‘गाढवा’ऐवजी ‘वाहन’ या व्याख्येत करता येणे सरकारी यंत्रणेस शक्य नाही, हे त्या गाढवांनी ओळखले असावे. म्हणूनच, जप्तीनंतर गुपचूप ‘चोरीस गेले’ की आपोआपच आरोपमुक्त होता येते हा त्यांचा वारंवारचा पूर्वानुभव असावा. परभणी जिल्ह्य़ात गोदावरीमधून होणाऱ्या चोरटय़ा वाळू वाहतुकीसाठी अशा अनुभवी गाढवांचा वापर करण्याची शक्कल वाळूतस्करांनी लढविल्यानंतर जप्त केलेल्या २९ पैकी १० गाढवे जुन्या अनुभवानुसार चोरीस गेली. आता नेमके काय करावयाचे याचा विचार करीत हातावर हात ठेवून केवळ बैसोन राहणे संबंधित अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त ठरणे तर ओघानेच येते. तसे पाहता, ‘वस्तूची वाहतूक करणारे कोणतेही साधन म्हणजे वाहन’ ही वाहनाची परंपरागत व्याख्या मराठीत रूढ असतानाही, ‘गाढवा’स ‘वाहन’ समजावे किंवा नाही याचा संभ्रम सरकारी अधिकाऱ्यांस पडावा व संशयाचा फायदा घेऊन गाढवांना दंडमुक्ती मिळावी हा योगायोग घडवून आणणाऱ्यांचे कौतुकच करावयास हवे. गोदाकाठच्या गाढवांना या संशयाचा फायदा वारंवार मिळत असल्याने, ती आता त्या गोष्टीतील ‘स्मार्ट गाढवा’चे वंशज म्हणवून घेण्यास पात्र ठरली असून, सरकारी ‘सिस्टीम’लाही संभ्रमात टाकण्याच्या आपल्याच कौशल्यावर ती गाढवे कमालीची खूश असल्याची चर्चा आहे. कोणा सरकारी कार्यालयाबाहेरील उकिरडय़ावर पडलेल्या सरकारी कागदपत्रांतील व्यावहारिक शब्दकोशांतील सोयीची पाने गाढवांस खावयास दिली की सारे काही साधते, असा शहाणपणा मालकांना सुचला असावा आणि असे कागद खाल्ल्यास आपणांस मोलही अधिक मिळते, हे त्या गाढवांसही ठाऊक झालेले असावे. म्हणूनच जप्तीची कारवाई झाल्यावरही ग्रामपंचायतीच्या आवारात उभे राहून चोरीस जाण्याची वाट पाहात स्तब्धपणे उभे राहण्याचे शहाणपण त्यांच्या अंगी आलेले असावे. धन्य ती गोदाकाठची गाढवे, ज्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसमोर शब्दार्थाचा पेच उभा केला..

Story img Loader