कमालीच्या गुप्ततेने गेले जवळपास महिनाभर या संपूर्ण मोहिमेची जोरदार पूर्वतयारी सुरू होती. उपग्रहाचा मुख्य लाँचर तर कधीपासून सज्ज होता. त्याची जबरदस्त ताकद पाहता, आणखीही काही उपग्रह त्याच्यासोबत आकाशात झेपावू शकतील याची शास्त्रज्ञांनाही पुरेपूर खात्री होती. या उपग्रहाचे उड्डाण यशस्वी होईल असे दिसू लागताच, त्याच्यासोबत अवकाशात झेपावण्यासाठी इतर किती तरी उपग्रह तर उतावीळच झाले होते. फक्त नेमका मुहूर्त सापडत नसल्याने, लाँचरवर धूळ साचू लागल्याचे पाहून शास्त्रज्ञांना चिंता वाटत होती. मग अवकाळी पावसाची वेळ साधून त्याच पावसात लाँचरला स्नान घालण्यात आले. आता लाँचरची झळाळीही वाढली होती. मग नव्या जोमाने तयारी सुरू झाली. लहानसहान चाचण्या सुरूच होत्या. मुख्य उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्याआधी त्यामध्ये काही तांत्रिक बदल करणे गरजेचे होते. प्रत्येक फेरबदलासोबत त्याची नव्याने चाचणी घेण्याची जबाबदारी काही मुरब्बी शास्त्रज्ञांवर सोपविण्यात आली होती. दुसरीकडे, या प्रक्षेपणात आयत्या वेळी कोणताही व्यत्यय येऊ नये, कोणत्याही तांत्रिक बाबीच्या पूर्ततेअभावी प्रक्षेपण रद्द करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सारी यंत्रणा एका जागी एकत्र करण्यात आली. प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेले सारे मनुष्यबळ प्रक्षेपण केंद्राच्या आसपास तयार ठेवण्यात आले. त्यांचा ठावठिकाणा लागून आयत्या वेळी काही घातपात होऊ नये व कमालीची गुप्तता राहावी यासाठी सातत्याने त्यांच्या मुक्कामाच्या जागाही बदलण्यात येत होत्या. एवढी सज्जता करूनही अचानक याच यंत्रणेतील एक महत्त्वाचा दुवा गायब झाला आणि संपूर्ण नियोजनच ढासळते की काय या भीतीने प्रक्षेपण केंद्रावर गडबड उडाली. अशा वेळी, प्रक्षेपणासाठी उभा असलेला लाँचर पूर्ण शक्तिमान आहे आणि त्याच्या साह्य़ाने मुख्य उपग्रहासह सारे लहान उपग्रहदेखील एकाच वेळी अवकाशात झेप घेऊ शकतात, याची खात्री होणे गरजेचे असते, हे ओळखून तशी वातावरणनिर्मिती करण्यात आली आणि त्यातही यश आले. तयारी पूर्ण झाली. आकाशातील मळभदेखील आता दूर झाले होते. एसएनसीपीसी-१६२ नावाचा हा शक्तिशाली उपग्रह अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाला आणि इतर लहानसहान उपग्रहदेखील लाँचरला जोडण्यात आले. मुख्य उपग्रहासोबतच्या निरीक्षक उपग्रहावर बसविण्यात आलेल्या सुसज्ज कॅमेऱ्यांच्या दिशा निश्चित करण्यात आल्या. नागरी नियोजन, किनारी भागातील जमिनींचा वापर, ग्रामीण संसाधने आणि पायाभूत विकास आदी बाबींचे निरीक्षण करण्याची जबाबदारी निरीक्षक उपग्रहावर सोपविण्यात आली. त्यासाठी पाच वर्षांचा कालावधीही निश्चित करण्यात आला आणि एसएनसीपीसी-१६२ उपग्रह अवकाशात भरारी मारण्यासाठी सिद्ध झाल्याचे मुख्य वैज्ञानिकांनी जाहीर केले. आता कोणत्याही क्षणी आपल्यासोबत अन्य उपग्रहांना घेऊन एसएनसीपीसी-१६२ चे अवकाशात प्रक्षेपण होणार, हे निश्चित झाले आणि सर्वानी प्रयोगशाळांमध्ये बैठक मारली. ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले. कोणतीही तांत्रिक त्रुटी राहू नये यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा जारी होता..

..आणि तो क्षण आला. उपग्रहाने अवकाशात यशस्वीपणे झेप घेतली. आता काही दिवसांतच उपग्रह आपले काम सुरू करणार आहे. सोबतच्या लहान उपग्रहांचे काम ठरल्यानुसार झाले, की संपूर्ण मोहीम फत्ते होईल, असा मुख्य वैज्ञानिकांचा विश्वास आहे!

Story img Loader