वर्षांनुवर्षे घासून गुळगुळीत झालेल्या त्याच त्या संकल्पना उराशी कवटाळून बसले की काळाच्या ओघासोबत आसपास घडणाऱ्या बदलांचे भानदेखील राहत नाही. म्हणूनच, ‘प्रभावी नेता जन्माला यावा लागतो, तो घडविता येत नाही’ या कालबाह्य़ विचारावर आजही आपली श्रद्धा असते. नेता कोणाला म्हणायचे, यावर जगभरातील अनेक विचारवंतांनी मांडलेल्या मतांच्या आधारावर आजही जागोजागी बौद्धिके दिली जातात, आणि त्यातीलच काही निकषांच्या आधारावर एखाद्याचे नेतृत्व सिद्ध करण्याची किंवा स्वीकारण्याची धडपडदेखील केली जाते. तो उत्तम वक्ता असला पाहिजे, त्याच्याकडे बुद्घिमत्ता असली पाहिजे, कोणत्याही प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची मानसिक क्षमता असली पाहिजे, धोरणात्मक बाबींवर त्याचे विचार ठाम असले पाहिजेत, तो द्रष्टा असला पाहिजे, विकासाच्या संकल्पनांचा खजिना त्याच्याकडे असला पाहिजे आणि त्या निडरपणे पुढे रेटण्याची हिंमतही असली पाहिजे. तो विनम्र असला पाहिजे, आपण सर्वज्ञ आहोत असा दर्प त्याच्या ठायी असू नये, इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे, अशा अनेक गुणांचा समुच्चय अंगी असलेला कुणीही चांगला व प्रभावी नेता होतो अशी आपली पारंपरिक समजूत आता बदलावयास हवी. कारण नेता असण्याची हीच  लक्षणे आता काळासोबत बदलत चालली आहेत. याचे भान ज्याला असते, व त्यानुसार जो स्वतस बदलतो, तो चांगला नेता होऊ शकतो. हे खोटे वाटत असेल, तर अलीकडे सर्वाधिक प्रकाशझोतात असलेले जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या चरित्राचा आणि त्यांच्या ‘नेता घडण्याच्या’ प्रक्रियेचा अभ्यास केला पाहिजे. नेता म्हणून समाजाची मान्यता मिळण्यासाठी काय केले पाहिजे, या गुपिताचा जो स्फोट त्यांनी एका पत्रकार परिषदेत केला, ते पाहता, भविष्यातील अनेक संभाव्य प्रभावी, आणि ‘बाहुबली’ नेत्यांची नामावळी नजरेसमोर आल्याखेरीज राहत नाही. त्यातील एक गुपित अधिक महत्त्वाचे आणि नेता बनण्याची स्वप्ने उराशी जपणाऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शक म्हणावे लागेल. ‘जो अधिकाधिक काळ तुरुंगात राहतो, तो अधिकाधिक प्रभावशाली नेता होतो,’ असे सत्यपाल मलिक ‘स्वानुभवा’वरून सांगतात. कारण, त्यांनी स्वतच तब्बल ३० वेळा तुरुंगाची हवा चाखली आहे.

सध्या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांच्यासारखे नेते व काही अधिकारी तुरुंगवास भोगत आहेत. त्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यामुळे या गुपिताचे ज्ञान सर्वसामान्य जनतेस झाले. हे नेते जेवढा जास्त काळ तुरुंगात राहतील तेवढे त्यांचे नेतृत्व उजळून उठेल, असा विश्वासही सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केला. ‘जेवढा तुरुंगवास अधिक, तेवढी त्या नेत्याची निवडणूक लढविण्याची पात्रता अधिक’ या सद्य:स्थितीतील सत्याचा विस्फोट सत्यपाल नावाच्या या ‘नेत्या’कडूनच झाल्याने आता अनेकांच्या व्यक्तिगत आशाआकांक्षांना नवे धुमारे फुटू लागले असतील, किंवा अशी पात्रता, योग्यता अंगी असलेल्यांच्या शोधासाठी राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या असतील तर त्यात गैर नाही.

दीर्घकाळाचा तुरुंगवास हे जर एखाद्याच्या नेतृत्वाचा प्रभाव अधोरेखित करण्याचा निकष असेल, तर निवडून येण्याच्या क्षमतेचाही तोच प्रमुख निकष असला पाहिजे. ‘वाल्या’ आणि ‘वाल्मीकी’ या आता पुराणकथा झाल्या आहेत. नेता कसा ओळखावा, याचे पुराणकालीन निकष आता बासनात गुंडाळावेत, हेच चांगले!

Story img Loader