दोघेही ३७ वर्षांचे आहेत. दोघांनी मिळून टेनिस एकेरीतील ४३ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे पटकावलेली आहेत. तब्बल २० वर्षे दोघेही खेळत आहेत. बऱ्याच अवधीनंतर यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वीच दोघे गारद झाले; पण दोघेही संपलेले नाहीत. पुढील ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी म्हणजे फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी दोघे आजही प्रबळ दावेदार ठरतात. याचे कारण थांबायचे कुठे आणि कसे हे दोघांनाही ठाऊक नसावे किंवा दोघे एव्हाना विसरले असावेत!

सेरेना विल्यम्स आणि रॉजर फेडरर या दोन महान टेनिसपटूंविषयीच ही चर्चा सुरू आहे, हे एव्हाना जाणकार नसलेल्या टेनिसरसिकांनीही हेरले असेलच! २३ ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकलेली सेरेना आणि २० स्पर्धा जिंकलेला फेडरर यांची भूक अजूनही शमलेली नाही. सेरेना गेल्या वर्षी आई झाली. फेडरर तर आता गेल्या काही वर्षांत दोन जुळ्या जोडय़ांचा बाबा झाला आहे. मुलांसाठी वेळ देत फिटनेस शाबूत ठेवून खेळणे थोडे अवघड असते; पण मी हळूहळू सरावतोय, असे त्याने मागे म्हटले होते. सेरेनासाठीही ‘वर्किंग मॉम रूटीन’शी जुळवून घेणे सुरुवातीला अवघड गेले. तरी आता ती रुळली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकन ओपन स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. यंदाही ऑस्ट्रेलियन स्पर्धेत तिचा जोश वाखाणण्याजोगा होता.

या वेळी फेडरर आणि सेरेना काहीशा अनाम प्रतिस्पध्र्याकडून (त्सित्सिपास आणि प्लिस्कोव्हा ही नावे आमच्यापैकी कुणीही यापूर्वी ऐकली असण्याची शक्यता जवळपास शून्य!) पराभूत झाले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा विरस झाला असला, तरी दोघांना त्याचे विशेष काही वाटले नाही. नवीन मुले-मुली येऊन हरवत असतील, तर त्यातून टेनिसचे भलेच होणार आहे. यंदा नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच हॉपमन कप स्पर्धेत अमेरिका विरुद्ध स्वित्र्झलड असा सामना झाला. त्यानिमित्ताने फेडरर आणि सेरेना प्रथमच टेनिस कोर्टवर आमने-सामने आले. सेरेनासमोर माझी सव्‍‌र्हिस अपेक्षेसारखी झाली नाही, अशी प्रांजळ कबुली त्या वेळी फेडररने दिली होती. आज फेडररच्या किती तरी नंतर आलेला अँडी मरे निवृत्त होत आहे. जोकोविच आणि नडाल यांची कारकीर्द लक्षणीय असली, तरी त्यांच्याकडे फेडररसारखे सातत्य नाही. महिलांमध्ये तर टेनिसपटूंची तिसरी पिढी आता मैदान गाजवू लागली असताना सेरेना अढळ आहे; फेडररसारखीच! मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमी २४ ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदांशी बरोबरी करून ती नवीन विक्रम प्रस्थापित करेल असाच तिचा खेळ दिसतो. त्यातूनही ती किंवा फेडरर अधूनमधून पराभूत होतात, हे टेनिस जिवंत आणि प्रवाही असल्याचेच लक्षण आहे. त्याबद्दलही आभार या दोघांचेच मानावे लागतील!

Story img Loader