निवडणुका हेदेखील हवामानावर परिणाम करणारे एक कारण आहे. माध्यमे मात्र वातावरणाशी निवडणुकांचा संबंध आठवणीने जोडतात. नैसर्गिक हंगाम कोणताही असला तरी वातावरण तापविण्याची ताकद केवळ निवडणुकांमध्येच असते, हे सिद्धच झाले आहे. त्यामुळे त्या हवामानाशी जुळवून घेण्याची प्रत्येकाचीच- म्हणजे, सामान्य मतदाराची, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि उमेदवारांचीही- आपलीआपली पद्धत ठरलेली असते. तापलेल्या वातावरणात ‘प्रतिज्ञाबाजी’ला बहर येतो. त्याचा वातावरणावर बरावाईट परिणाम होत असला तरी आजकाल बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रत्येकासच सवय झालेली असल्याने ते परिणाम फार काळ टिकत नाहीत. ते एका परीने चांगलेच असते. कारण अशा प्रतिज्ञा जनतेच्या लक्षात राहिल्या, तर पंचाईत होण्याची शक्यताच अधिक!.. ‘सिंधुदुर्गात विनायक राऊत यांचा पराभव होत नाही तोवर दाढी काढणार नाही’ असे दीड-दोन वर्षांपूर्वी राऊत यांचे प्रतिस्पर्धी नीलेश राणे यांनी कुडाळातील स्वाभिमानींच्या शक्तिप्रदर्शन सोहळ्यात जाहीर केले होते. पण लोकांची स्मरणशक्ती तोकडी असते, हे राजकारणात शंभर टक्के सत्य असते. नाही तर, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत नीलेश राणे यांची दाढी दिवसागणिक किती वाढते, यावरच मतदारांनी लक्ष केंद्रित केले असते. तसे झाले नाही हे चांगलेच, पण तसे होणार नाही याची खुद्द राणेंनाही खात्री असणार यात शंका नाही. ‘आता नीलेश राणेंना कधीच दाढी करावी लागणार नाही’, असेही प्रतिआव्हान तेव्हा विनायक राऊत यांनी दिले होते.  धनगर समाजास न्याय मिळणार नाही, तोवर मंत्रालयात प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा पंकजा मुंडे यांनीही एकदा केली होती. शिवसेनेच्या मंचावरून अशा किती प्रतिज्ञा झाल्या असतील, पण त्या प्रतिज्ञा ‘विस्मरण-न्याया’चा सज्जड पुरावा ठरल्या आहेत. प्रतिज्ञांचा हा ज्वर केवळ नेत्यांमध्येच भिनतो असे नाही. नेत्यांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या ज्वराचा विळखा पडतो. भुजबळसाहेबांची तुरुंगातून सुटका होईपर्यंत केस व दाढी कापणार नाही, अशी प्रतिज्ञा कळंब तालुक्यातील त्यांच्या एका चाहत्याने केली होती. सुदैवाने त्याची प्रतिज्ञा फळाला आली, त्यामुळे हा चाहता बातमीतही आला. ‘कोल्हापुरात शिवसेनेचा खासदार होत नाही, तोवर पायात चप्पल घालणार नाही’ अशी प्रतिज्ञा तेथील एका कट्टर शिवसैनिकाने केली होती, ते तुम्हाआम्हास आता आठवतही नसेल. तो कार्यकर्ता मात्र, अजूनही अनवाणी फिरतोच आहे. तेथील निकालावर उमेदवार आणि या कार्यकर्त्यांची प्रतिज्ञा, दोहोंचे भविष्य ठरणार आहे. कार्यकर्ते आपल्या प्रतिज्ञांचे बऱ्याचदा पालन करतात, असे दिसते.

नेत्यांच्या प्रतिज्ञा मात्र, वातावरण तापविण्यापुरत्याच उरतात, असे पुरेसे स्पष्ट झाले आहे. अशी काही चर्चा सुरू झाली, की नेत्यांच्या प्रतिज्ञा आठवणे साहजिकच असते. ‘या मोदीला घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, ही शरद पवारांची ताजी प्रतिज्ञा आणि ‘मोदींचा पराभव होईपर्यंत अंगात शर्ट घालणार नाही’ ही त्यांच्या एका चाहत्याची प्रतिज्ञा सध्याच्या उन्हाळ्याची तीव्रता आणि निवडणुकीचा ज्वर वाढविणारी आहे!

Story img Loader