(पुणेकर आणि डोंबिवलीकरांची माफी मागून बोलायचे तर) ठाणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. (तेथे शिवसेनेची सत्ता असूनही आहे, असे कोणी कुचकटपणे म्हणेलही, परंतु) ठाण्यात नवनवी संस्कृती रुजविण्याचे शिवसेनेचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. टक्केवारीत ते यश नाही मोजता येणार, पण ते नाकारता येणार नाही. तर या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ठाण्यात यंदा भरणाऱ्या नाटय़ संमेलनाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ठरविले आहे. या संमेलनाचे आयोजक आणि नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष राजन विचारे यांनी हे संमेलन यशस्वी करण्याचीच नव्हे, तर ठाण्याची सांस्कृतिक टक्केवारी वाढविण्याची कौपिनेश्वरापुढे शपथ घेतली असणार यात कुणासही शंका नाही. या टक्केवारीवाढीकरिता नाटय़ संमेलन रिवाजानुसार दोन-अडीच दिवसांचे असून चालण्यासारखे नव्हते. कोणताही उत्सव हा गणेशोत्सवासारखाच दिमाखदार झाला पाहिजे. तेव्हा ठाण्याच्या नाटय़ शाखेने हे संमेलन तब्बल दहा दिवसांचे केले. त् त्यात इतकी नाटके करायची, इतके सोहळे करायचे असे तब्येतीने ठरले. त्यासाठीचे नियोजन पाहून नाटय़ परिषदेची मुख्य शाखाही चार दिवस तोंडात बोटे घालून बसली होती. हे झाल्यानंतर पहिला मुद्दा आला पैशाचा, खरे तर वर्गणीचा (कारण कार्यक्रम शिवसेनेचा आहे.). त्यानुसार जिल्ह्य़ातील प्रत्येक पालिकेला आकडे देण्यात आले. पण (हाय रे दैवा!) अपेक्षेएवढा निधी जमलाच नाही. सुसंस्कृतता धरली की असे प्रकार होणारच. पण त्यावर मात करून संमेलन यशस्वी करण्याचा चंग या नाटय़देवतेच्या उपासकांनी बांधला आहे. त्या बांधकामात ही मंडळी इतकी व्यस्त राहिली की पूर्वारंभाच्या उद्घाटनला राज्य नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर, माजी संमेलनाध्यक्ष फैयाज यांनाही बोलवायचे राहूनच गेले. हे तर हे, खुद्द ठाणे शाखेचे अध्यक्ष राजन विचारे हेसुद्धा स्वत:ला आमंत्रण द्यायचे विसरून गेले, अशी चर्चा आहे. त्यामुळेच ते या सोहळ्यास तब्बल दोन तास उशिरा आले. (ते तेव्हा संमेलनास येणाऱ्या प्रतिनिधींसाठी ‘कोणी घर देता का घर’ हे स्वगत पाठ करीत होते म्हणतात. अखेर पालिका आयुक्तांनी त्यांना भाडय़ाची घरे रिकामी करून दिली. एक संकट अशा प्रकारे टळले.). तर हा उशिरा वा न येण्याचा कित्ता पुढे मग सुसंस्कृत ठाणेकरांनीही गिरवला. प्रेक्षकांची कमी उपस्थिती पाहून त्यांच्या सुसंस्कृततेबद्दल चिंतावलेल्या आयोजकांनी मग गडकरी रंगायतनचा एक प्रयोग मात्र हाऊसफुल करून दाखविला. त्याकरिता विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. आयोजनाचे हे कौशल्यच म्हणावयाचे. तर पूर्वारंभाच्या नांदीत जे दिसले ते संमेलनाच्या प्रत्यक्ष प्रयोगात दिसू नये, अशी रसिकांची खूप इच्छा आहे. पण संमेलन यशस्वी करायचे तर त्यात असे प्रकार घडणारच. अखेर कोणतेही संमेलन हे आयोजनातील चुकांमुळेच गाजते हेही प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवे. ते काहीही असले तरी प्रेक्षकांनी मात्र या संमेलनाला यायलाच हवे. ठाणेदारांची नाटय़कौतुके त्यांनी नाही पाहिली, तर मग अखेर उपेग तो काय?

Story img Loader