सकाळ झाली. आन्हिके आटोपून धृतराष्ट्र दालनात दाखल झाला. संजय तर हाती रिमोट घेऊन वाटच पाहत बसला होता. ठरल्याप्रमाणे धृतराष्ट्राने संजयास खूण केली. ‘हे संजया, आज जालन्याच्या कुरुक्षेत्रावर काय चालले आहे, हे तू वर्णन करून सांग!’ धृतराष्ट्र म्हणाला अन् संजयाने रिमोटचे बटन दाबले. समोर जालन्याची युद्धभूमी दिसत होती. संजय म्हणाला, ‘‘साहेब, जालन्याच्या युद्धभूमीवर आपले आणि त्यांचे सैन्य एकवटले असता अर्जुनाने शंखध्वनी करून श्रीकृष्णास आवाहन केले, की आता तू मला शत्रूसमोर घेऊन चल.. मग श्रीकृष्णाने चतुराईने रथाची दिशा बदलली. समोर आपलेच धर्मबांधव असल्याचे पाहून अर्जुनास स्फुरण चढले. एका रथावर बसलेल्या रावसाहेबास पाहून त्याचे बाहू फुरफुरू लागले. त्वचा शौर्यतेजाने थरथरू लागली. जिभेला पाणी सुटले आणि हातातील धनुष्यबाण रोखून अर्जुनाने रावसाहेबांच्या दिशेने प्रत्यंचा ताणला.. तोच श्रीकृष्ण गालात हसून अर्जुनाच्या कानाशी कुजबुजला, ‘हे अर्जुना, जालन्याच्या या कुरुक्षेत्रावर समोर दिसणारे हे आपलेच सैन्य असून आता रावसाहेब हेच आपलेही सेनापती असल्याने त्यांच्याविरुद्ध युद्ध करणे अनुचित आहे. तू निमूटपणे माघार घ्यावीस यातच युतीधर्माचे भले आहे! ’ ..हा विचित्र सल्ला ऐकून अर्जुनास संभ्रम पडला. हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर युद्धाची प्रेरणा देणारा तो श्रीकृष्ण कुठे आणि हा कुठे, असा प्रश्नही अर्जुनास पडला. पण त्याने सरसावलेले धनुष्य पुन्हा खांद्यास अडकविले. बाणही भात्यात ठेवला, आणि तो पुढील उपदेशाची प्रतीक्षा करू लागला. समोरच्या गर्दीतून रावसाहेब अर्जुनाच्या रथाकडे पाहत होते. धनुष्य उचलण्याची वेळच श्रीकृष्ण आपल्यावर येऊ  देणार नाही, हे त्यांस ठाऊकच होते. अर्जुनाचा संभ्रम वाढलेला पाहून श्रीकृष्णाने रावसाहेबांच्या दिशेने कटाक्ष टाकला, आणि नजरानजर होताच हलकेच डोळाही मिचकावला. तेवढय़ात अर्जुनाचे लक्ष श्रीकृष्णाकडे गेले आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने पुन्हा धनुष्यास हात घातला व भात्यातून बाणही काढू लागला. हे पाहताच श्रीकृष्ण मनात चरकला. नव्या महाभारतात असे काही होऊन चालणार नाही, हे त्याने ताडले. ‘अर्जुना, महाभारतातील श्रीकृष्णाने जसे सांगितले तसे वागल्यामुळे त्या अर्जुनाचे भले झाले होते, हे विसरू नकोस. तुलाही मी सांगेन तसेच वागले पाहिजे,’ असे सांगून श्रीकृष्णाने अर्जुनास बाण भात्यात ठेवण्यास बजावले. पुढच्या काही क्षणांतच श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाच्या घोडय़ांना टाच दिली, आणि रथ रावसाहेबांच्या रथासमोर उभा राहिला. रावसाहेबास समोर पाहून संतापलेल्या अर्जुनाने पुन्हा श्रीकृष्णाकडे पाहिले. आता अर्जुनाची नजर श्रीकृष्णाच्या विश्वरूपावर खिळली होती. अर्जुनाने निमूटपणे रथ माघारी वळविला, आणि तो तंबूत जाऊन विश्रांती घेऊ  लागला. काहीच न घडल्यामुळे त्याला कमालीचा थकवा आला होता. तिकडे रावसाहेबांच्या महालात, श्रीकृष्ण सस्मित मुद्रेने अभिवादने स्वीकारू लागला’’..  एका दमात वर्णन करून संजयाने रिमोटने जालन्याचे चॅनल बदलले. ते वर्णन ऐकून धृतराष्ट्र संतुष्ट झाला. शिष्टाई सफल केल्याबद्दल श्रीकृष्णाचे आभार मानणारा खलिता तातडीने रवाना करण्याचे आदेश त्याने संजयास दिले..