कृपा करून नळावरचा वाद समजून या ताज्या भांडणाकडे दुर्लक्ष करू नका. राज्याला लाभलेल्या वादाच्या परंपरेतलाच एक नवा या दृष्टीने याकडे बघा. होय, आम्ही राऊत व शहा यांच्यात सुरू झालेल्या वाक्युद्धाबाबतच बोलतोय. आता तुम्ही म्हणाल की यात अत्रे-माटे, अत्रे-फडके यांच्यातल्या गाजलेल्या वादासारखी विद्वत्ता कुठे आहे? अहो, कशी येणार? काळ बदलला की भाषाही बदलते ना! हल्ली साहित्यिक वादबीद घालत नाहीत. राजकारणी घालतात. त्याला आम्ही काय करणार? तसेही गेल्या सात वर्षांपासून हेच वाद महत्त्वाचे ठरू लागलेत. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने बघायला हवेच. असे ‘फेस टू फेस’ भिडण्यासठी हिंमत लागते. प्रत्यक्षात नसली तरी शब्दातून ती दर्शवून द्यावी लागते. ती या दोघांकडेही आहेच की! म्हणून तर काही काळ शांततेत गेला की ‘मातोश्री’च्या किंवा दिल्लीच्या त्या ऐतिहासिक गुप्त बैठकीचा विषय समोर येतो व जुंपते. कधी त्याचे ठिकाण दिल्ली असते, कधी मुंबई तर आता पुणे. भाजपकडून वेगवेगळे चेहरे समोर केले जातात, पण सेनेकडून सामना करणारे राऊतच. लिहिणे, बोलणे, जुळवून आणणे अशा तिन्ही पातळ्यांवर संचार सुरू असतो त्यांचा. तुम्ही राजीनाम्याची भाषा करता काय, घ्या मग आम्हीही करतो असे नुसते आव्हान देण्यासाठीसुद्धा ताकद लागते हो. युतीची सत्ता असताना तर ते राजीनामे खिशातच घेऊन फिरायचे. हे नुसते बोलतात, देण्याची धमक वगैरे नाही यांच्यात असा विचार करून शहांनी फासा फेकला, पण उलटवला ना त्यांच्यावरच राऊतांनी. त्यामुळे आता लगेच निवडणुका वगैरे होतील असा विचार स्वप्नातही आणू नका. वाद आहे हा. त्यात माघार घ्यायची नसते. आव्हानाला प्रतिआव्हान देत समोर जाणे शिकून घेतलेय यातील दोघांनीही. वादात समोरच्याला आपणच नामोहरम करू शकतो अशा समजात असलेल्या दिल्लीला पार रडकुंडीला आणलेय राऊतांनी. त्यामुळे केसाने गळा कापण्याची वेदना आणखी ठसठशीत होत जातेय. वादाचे हे अंक लवकर संपतील या भ्रमातसुद्धा राहण्याची गरज नाही. ‘योग्य संधी’च्या शोधाची वाट बघताहेत यातले सारेच. त्यामुळे ‘काय तेच तेच’ असे म्हणून कंटाळा करू नका. उलट उत्सुकतेने त्याकडे बघण्याची सवय करून घ्या, ती आणखी ताणायची असेल तर त्या ‘गुप्त’ बैठकीनंतर उद्धवजींनी राऊतांना व शहा यांनी देवेंद्रभाऊंना नेमके काय सांगितले असेल या प्रश्नावर डोके खाजवा. वैचारिक मतभेद झाले, धोरणे पटली नाहीत, इतकेच काय तर दोन पोलिसांनी पाळत ठेवली म्हणून आघाड्या तुटल्या व सरकारे पडल्याचे बघितले आहे आपण. येथे तर शब्द दिला व नाही दिला या एकाच कारणावरून युती संपुष्टात आली. त्यामुळे देणाऱ्याने तो खरेच दिला असेल का की ऐकणाऱ्याची चूक झाली किंवा त्यांना शब्द ऐकल्याचा भास झाला यावर तर्क लढवला तरी चालेल. उगीच वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवण्यापेक्षा हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करत राहणे केव्हाही चांगले. यातून बुद्धीचा कसही लागतो!
वादच नसता तर…
प्रत्यक्षात नसली तरी शब्दातून ती दर्शवून द्यावी लागते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-12-2021 at 00:00 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena bjp subject of that historic secret meeting in delhi akp