विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर झाल्या की सुगीचे दिवस आल्याची स्वप्ने अनेकांना का पडतात हे कोडे जनसामान्यांना कधीच सुटत नाही. अशा निवडणुकांना घोडेबाजाराचे उधाण असेही म्हटले जाते. त्यासाठी आखल्या जाणाऱ्या डावपेचात खरे किती आणि खोटे किती, ते प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी असणाऱ्यांनाच माहीत! पण अशा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, की घोडेबाजारातील त्या उलाढालीचे खरेखोटे चित्र मात्र कुणालाही रंगविता येऊ शकते. ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भरलेले रंग खरे होते, पण खेळले गेलेले डाव मात्र, खरे की खोटे याचा स्वच्छ उलगडा करणारे निकाल आता जाहीर झाले. वसंत डावखरे यांच्या पाठीशी उभे असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही मित्रपक्षांच्या मतदारांनी दगा दिला नसता, तर स्वपक्षीय/ मित्रपक्षीय ९१ मतांचा फटका डावखरेंना सोसावा लागला नसता. ती सारी मते शिवसेना-भाजपच्या पारडय़ात पडल्यामुळे, निवडणुकांचा घोडेबाजार असे ज्याला म्हणतात ते काय असावे, याचा पुसटसा अंदाज येतो. अशा निवडणुकीत कोणाचे आशीर्वाद घ्यावेत आणि कोणाला आशीर्वाद द्यावेत हे ही निवडणूक कोळून प्यायलेल्या मातब्बरांना समजले नसावे, ह्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. विजयासाठी हमखास गाठीशी असलेली नेमकी मते फुटावीत आणि त्याच्याच जोरावर सेना-भाजप युतीचे रवींद्र फाटक यांचा विजय व्हावा, या गणितात कुणाला घोडेबाजाराचेच दर्शन घडू शकते. पण ‘या निवडणुकीत डावखरे यांचा निसटता विजय होऊ शकतो’ असे विधान एका ‘जाणत्या’ राजकीय भाग्यविधात्याने केले होते, तेव्हाच त्यांच्या विजयाच्या आशा डळमळीत झाल्या होत्या. सामान्य माणसाने मात्र घोडेबाजारासारख्या क्लिष्ट कोडय़ाच्या खोलात शिरूच नये, हेच बरे.. पक्षीय संख्याबळाच्या निकषावर जय-पराजयाची गणिते बांधण्याचे जुने दिवस आता इतिहासजमा होऊ लागल्याचा पहिला दाखला या निवडणुकीने दिला, असा विधायक विचार करावा! विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह समजले जाते. या सभागृहात राजकारणापलीकडील राज्यहिताचा विचार व्हावा अशी अपेक्षा असते. त्यामुळे, त्या सभागृहाच्या सभासदत्वासाठी होणाऱ्या निवडणुकीत पक्षीय संख्याबळाची गणिते मांडणे हाच पोरकटपणा. ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रगल्भ मतदारांनी याच विचारधारेला महत्त्व दिले असावे. डावखरे यांचा पराभव आणि फाटक यांचा विजय हा घोडेबाजाराचा परिणाम म्हणावा, की पक्षभेदापलीकडे जाऊन केलेल्या विचारांचा प्रभाव म्हणावा, यावर आता बराच खल होईल. घोडेबाजार, अर्थपूर्ण मतदान अशा विशेषणांची खैरात सुरू होईल. खरे काय आणि खोटे काय हे त्या मतदारांना आणि उमेदवारांनाच माहीत असेल. लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सामान्य माणसाने मात्र असे विश्लेषण करूच नये. त्याऐवजी ‘लोकशाही प्रगल्भ होते आहे’ यावर समाधान मानावे!
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2016 रोजी प्रकाशित
केवढी ही प्रगल्भता..
खरे काय आणि खोटे काय हे त्या मतदारांना आणि उमेदवारांनाच माहीत असेल.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-06-2016 at 04:11 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena wins thane mlc ravindra phatak defeated vasant davkhare