भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे आपोआप ‘राजमान्य राजश्री’ ही पदवी मिळालेल्या श्रीपालराव सबनीस यांनी संमेलनातील दिमाख आणि भरजरी तोरा अजिबात मनावर न घेता आपला भाषणाचा हट्ट सोडला नाही. समाज माध्यमांच्या माऱ्यामुळे आणि अन्य संपर्क माध्यमांच्या अतिरेकामुळे साहित्यापुढील सध्याची आव्हाने कोणती आहेत आणि त्यावर काही हुकमी तोडगा असू शकतो काय? याबद्दलचे मनोज्ञ चिंतन रा. रा. सबनीस करतील, अशी सामान्य साहित्यिकांची अपेक्षा. ती फोल ठरवीत एकाच वेळी शरदराव पवार आणि देवेंद्रजी फडणवीस या दोघांनाही खूश करीत रा. रा. सबनीस यांनी आपले साहित्य, कलाविषयक चिंतन थेट ‘सामथ्र्य आणि मर्यादा सूत्रावर आधारित संवाद-संघर्षवादी धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) भूमिका’ असे भलेथोर शीर्षक असलेले ११३ पानी भाषण समाजापुढे टाकले, तेव्हा सारे जण त्या भाषणाच्या वजनानेच पार हेलपांडून गेले. ते सारे वाचून पचवणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, याचीही जाणीव सर्वाना झाली. त्यात रा. रा. सबनीस यांचे एकेक वाक्य सुटे वाचू गेले, तर विचार मौक्तिकाच्या दर्जाचे. त्यामुळे सगळ्यांचीच हबेलहंडी उडालेली. मराठी संस्कृतीचे अनेक मानदंड निर्माण केल्याबद्दल सगळ्यांना धारेवर धरणारे रा. रा. सबनीस असा सवाल विचारतात, की एवढय़ा फळ्या-चिरफळ्या करून मराठी संस्कृती जगायची कशी? त्यापाठोपाठ ते असेही म्हणतात, की मानदंडाच्या स्वतंत्र अस्मिता अधोरेखित करण्याऐवजी आपण प्रत्यक्ष मानवी जीवनासंदर्भातील भौतिक आव्हाने पेलण्यासंदर्भात काही निकष ठरवून सामथ्र्य नोंदले, तर हा प्रश्न विवेकाने सोडवता येईल. ही दोन्ही वाक्ये स्वतंत्रपणे अतिशय विचारप्रवृत्त करणारी असली, तरीही ती एकापाठोपाठ आल्याने ज्यांनी आपला प्राण डोळ्यात आणून हे सारे भाषण वाचण्याचे शिवधनुष्य पेलायचे ठरवले, त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय कसे बरे राहतील? सांप्रत मराठी विश्वातील निम्मे प्रश्न लैंगिकतेशी संबंधित असल्याचे रा. रा. श्रीपालरावांचे प्रतिपादन खोल विचारतरंगात बुडवून टाकणारे असले, तरीही त्याचा साहित्याशी नेमका कोणता संबंध, असा प्रश्न विचारण्याचे धैर्य सामान्य कुवतीच्या साहित्यिकांनी करण्याची शक्यता नव्हतीच. प्रसारमाध्यमे ही तिरडीची दांडी आहेत, असे छातीठोक विधान तर गेल्या कित्येक दशकांत कोणी केल्याचे ऐकलेले नाही. रा. रा. सबनीस यांचे अतुलनीय धैर्य, त्यांची अमोघ वाणी आणि त्यांचे विश्वविचारदर्शन यामुळे प्रेक्षक-वाचकांची दातखीळ बसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. हे संमेलन अधिक भरीव विचारांचे आणि त्रिकालाबाधित सत्याचे अनुग्रहण करणारे ठरावे, ही तो रा. रा. सबनीस यांची इच्छा. ती सुफळ संपूर्ण होण्यासाठीच जणू शुभ्रकुमार पी. डी. पाटील यांनी अतिप्रचंड खर्च केला. हे सारेच कुडमुडय़ा साहित्यिकांसाठी नवे दर्शन देणारे होते. साहित्यविश्वातील ही खळबळ आणखी बराच काळ आपले तरंग उमटवीत राहील, यात शंका नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा