तर, गेल्या काही महिन्यांपासून देशावर दाटून राहिलेले दहशतवादाच्या भयाचे आणि अशांतीचे वातावरण आता पुरते निवळलेले असून सध्या देशात ‘अतिशांतते’चा काळ सुरू झाला आहे, यात शंका उरलेली नाही. ऊठसूट कुरापती काढून सेनादलांना सदैव डोळ्यात तेल घालून जागता पहारा करावयास भाग पाडणाऱ्या, सीमेपारच्या शत्रूंच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या छुप्या कारवायांनाही विराम मिळाला आहे, आणि सारे काही आलबेल आहे असे वाटण्यासारखी स्थिती नक्की झाली आहे. अशा शांततेच्या काळात, सेनादले काय काम करतात, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. शांततेच्या काळात सैन्य स्वस्थ बसलेले नसते, तर सलोखा आणि सामंजस्याचे देशांतर्गत वातावरण कायम राहावे आणि युद्धज्वरासारख्या सतावणाऱ्या भावनांच्या सावटाखालून बाहेर येऊन समाजाने विरंगुळ्याचे काही क्षण समाधानाने अनुभवावेत यासाठी सेनादलांचे प्रयत्न सुरू असतात. बऱ्याच कालावधीनंतर देशात अशी स्वस्थ स्थिती अनुभवण्यास मिळत आहे. सैन्यदलांनीही दगदगीच्या दैनंदिनीतून विरामाचा सुस्कारा टाकला असून काही अवांतर मोहिमा हाती घेतल्या आहेत. तसे नसते, तर शेकडो वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या हिममानवाच्या- म्हणजे, बालकथा, लोककथा, पुराणकथांमधील ‘यती’च्या- अस्तित्वाचे पुरावे शोधण्यासाठी लष्कराच्या खास तुकडय़ा हिमाचलातील शोधमोहिमांसाठी बाहेर पडल्याच नसत्या. त्या यतीच्या ‘एकेरी पाऊलखुणां’चा मागोवा घेण्यासाठी, त्याच्या अस्तित्वाभोवतीच्या शंकाकुशंकांवर आता साऱ्या चर्चा केंद्रित होतील. या यतीच्या चर्चेत पुढचे काही दिवस लोकांची मती अशी काही गुंग होऊन जाईल, की दिवसरात्र सतावणाऱ्या नेहमीच्या कोणत्याच समस्यांचे वारेदेखील आसपास फिरकणार नाहीत. आजवर केवळ गूढ होऊन राहिलेल्या हिममानवाच्या पावलांचे ठसे लष्कराच्या पर्वतारोहण चमूला हिमालयातील मकाऊ तळाच्या आसपास आढळल्यावर, या अभूतपूर्व घटनेची माहिती तातडीने जगाला देण्याचा उत्साह लष्करास अनावर झाला नसता तरच नवलच. अशा काही ‘चमत्कारिका’चा शोध लागल्याची बातमी जगभर पसरली, की साऱ्या उत्सुक नजरा त्याकडे वळतात. तसेच झाले, आणि यतीच्या दंतकथांना वास्तवाची झालर लावण्याची स्पर्धाही सुरू झाली. पुराणकाळातील काही अतिमानवी आकाराच्या व्यक्ती आजही चिरंजीव अवस्थेत गुप्तपणे वावरत असतात, असे ग्रामीण लोककथा मानतात. ‘टिनटिन’सारख्या चित्रकथांमध्येही यतीचा उल्लेख आहे. ते अगदीच अवास्तव नाही, याचा पुरावा देण्याची अभूतपूर्व कामगिरी लष्कराच्या या तुकडीने बजावल्यावर, ‘देव सापडल्याचा’ आनंद अनेकांना होणे साहजिकही होतेच.
आता, जेथे या यतीच्या पाऊलखुणा उमटल्या, त्या पवित्र जागी ‘यतिमंदिरा’ची उभारणी करण्याचे मनसुबेही सुरू होतील. केवळ एखाद्या फॅशन शोमध्ये चालणाऱ्या सौंदर्यवतीच्या पदन्यासांशीच तुलना होईल अशा शिस्तीत या यतीच्या बर्फावर उमटलेल्या पाऊलखुणा पाहता, तो ‘देव’ होता की ‘देवी’ याचीही चर्चा करावी लागेल.
गेल्या काही दिवसांत चर्चेच्या केंद्रस्थानापासून काहीसे बाजूला झालेल्या लष्कराला पुन्हा चर्चेत आणणाऱ्या या यतीच्या बातम्या समाजमाध्यमांपासून मुख्य माध्यमप्रवाहात जोमदारपणे वाहू लागल्याचा सुगावा आपल्या अतींद्रिय शक्तीने एव्हाना त्या यतीला लागलाच असेल. कुणी सांगावे? हिमाचलाच्या एखाद्या गुप्त गुहेतील यतीचे कुटुंब आज आनंदातिशयाने उत्सव साजरा करीत असेल. मधल्या मोठय़ा काळात, यतीच्या अस्तित्वाचा जणू माणसाला विसर पडला होता. लष्कराच्या तुकडीने बजावलेल्या कामगिरीमुळे तो पुसला गेला आहे. आता हिमाचलाच्या गूढकथांमध्ये यतीच्या अस्तित्वकथांची भर पडेल, आणि त्याची चर्चा करताना मती गुंग होऊन जाईल, एवढे खरे. अतिशांततेच्या काळात, वेळ घालविण्यासाठी यापेक्षा आणखी काय हवे?