तर, देव अस्तित्वात आहे की नाही हा मुद्दा नाही. तो असो अथवा नसो. पण असलाच, तरी सामान्य नजरेला तो दिसत नाही. अचानक काही तरी घडते आणि ज्याला आपण सामान्य समजत असतो, तोच देव असतो हे लक्षात येऊ लागते. तेदेखील, ‘मीच देव आहे’, असे तो स्वमुखाने सांगून जातो, तेव्हाच! ..निवडणुकीच्या काळात माणसाची रूपे, मुखवटे, चेहरे उघड होतात असे म्हणतात. या काळात राजकारणाचे रंग असे काही खुलून उठतात, की त्या धुळवडीत रंगलेल्याचा मूळ रंग कधी लपून जातो, तर कधी मूळ रंगासहित चेहरा उघडा होतो. सोलापूरचे श्री. ष. ब्र. (म्हणजे काय ते विचारू नका! असे काही नावामागे असले की माणूस देवत्वाच्या जवळ जातो असे मानतात..) डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यजी महास्वामीजी हे महास्वामी आहेत, हे लोकांना माहीत होते. पण ते स्वतच देव आहेत हे त्यांनीच सांगितले. ‘तुम्ही देवळात, तीर्थयात्रेस गेलात तर तिथला देव तुमच्याशी बोलणार नाही. मग तुम्ही माझ्याकडे या, कारण मी बोलणारा देव आहे’ असे परवाच त्यांनी जाहीर करून टाकले. निवडणुकीच्या राजकारणात आता मानवाबरोबरच देवदेखील रिंगणात उतरले आहेत, हे या श्री. ष. ब्र. महास्वामींनी स्वतच स्पष्ट केले आहे. हे महास्वामी खरोखरीच देव आहेत का, अशी शंका आता अनेकांना येऊ लागली असेल. त्याची शहानिशा करण्यासाठी, त्यांनी निवडणुकीसाठी आयोगाकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पाहावे. माणसाच्या जगात, असे काही मुद्दे असतात, ते त्यासाठी नेहमीच लागू असतात. असे मुद्दे ‘लागू नाहीत’ असा माणूस सहसा आढळत नाही. महास्वामींना मात्र, यातील अनेक मुद्दे लागू होत नाहीत. भौतिक जगात मानवी रूपात अवतरलेले असल्याने, पैसा, गाडी आदी भौतिक सुखाच्या बाबींनी हे महास्वामी संपन्न असले, तरी आयकर, पॅन कार्ड अशा फजूल बाबी मात्र त्यांना लागू होत नाहीत. तसे त्यांनी प्रतिज्ञापत्रातच जाहीर करून टाकले आहे. पॅन कार्डसारखी ऐहिकाची खूण नसल्याने, आयकरासारखे सामान्य माणसास पूर्ण करावे लागणारे सोपस्कारही अशा देवांना लागू होत नाहीत. संसार नाही, गोतावळा नाही किंवा कधीही कोणताही अपराध वा गुन्हा केलेला नाही तरीही, माणसांच्या जगात राहावयाचे असल्याने थोडीफार आर्थिक पुंजी, गाडीघोडय़ासारखी भौतिक परिवहनाची साधने हाताशी असणे आवश्यक असतेच.. ५० हजारांची रोकड, बँक खाती, बँका-साखर कारखान्यांचे शेअर्स, चारचाकी गाडी, अशी सव्वासहा लाखांची भौतिक संपत्ती, आणि शेतजमिनी, भूखंड, इमारती, आदी सुमारे पावणेतीन कोटींची मालमत्ता महास्वामींच्या मालकीची आहे. आयकर भरणा किंवा पॅन कार्ड ही माणसाची अपरिहार्यता असताना, महास्वामी मात्र यापासून मुक्त आहेत, एवढी एकच बाब, ते माणसाहून वेगळे आहेत एवढे समजून घेण्यास पुरेशी नाही का?
‘आपुन ही भगवान है!’..
चानक काही तरी घडते आणि ज्याला आपण सामान्य समजत असतो, तोच देव असतो हे लक्षात येऊ लागते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-04-2019 at 00:15 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur bjp candidate jai siddheshwar mahaswami remark sparks row says i am the god