महानगरी मुंबईच्या एका कुशीत वसलेला हा विस्तीर्ण निसर्गरम्य परिसर अनेकांना भुरळ घालत असला, तरी इथे निरुद्देश भटकंतीसाठी कुणाला जाताच येत नाही.. मजबूत भिंतींच्या कठडय़ामधील प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतून काटेकोर छाननी होऊन खात्री झाल्यानंतरच येथे प्रवेश शक्य असतो. अर्थात त्यासाठीदेखील प्रवेशाच्या साऱ्या कसोटय़ा पार करून गुणवत्ता सिद्ध करावीच लागते. अशा या पवईच्या आयआयटीमध्ये, म्हणजे भारतीय प्रौद्योगिकी संस्थानात, शिकवणी वर्ग सुरू असतानाच म्हणे एका गोवंशाने प्रवेश केला आणि काही क्षण तेथील गोप्रेमींना आनंदातिशयाचे व आश्चर्याचे भरतेदेखील आले. ज्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चंग बांधला होता, त्याची फळे दिसू लागल्याच्या भावनेने काही जणांना कृतकृत्यही वाटू लागले असावे. अगदी आठवडाभरापूर्वीच, या परिसराच्या आवारातून बाहेर गेलेल्या एका बैलाने अकस्मात एका युवकावर हल्ला चढविला आणि पवईच्या आयआयटी परिसरातील भटक्या गोवंशांच्या दहशतीची गंभीर चर्चा सुरू झाली; पण आयआयटीमधील काही गोप्रेमींनी गोवंश रक्षणासाठी चंग बांधल्याने, भटक्या गोवंशास आता या परिसरातच हक्काचे छप्पर प्राप्त होण्याची चिन्हे असून उच्चविद्यांकितांच्या सहवासात आश्वस्तपणे राहण्याचा हक्कही प्राप्त होणार आहे म्हणे. त्यामुळे आयआयटीच्या परिसरात ज्याप्रमाणे जागोजागी चिंतनशील विद्यार्थ्यांचे घोळके परस्परांशी शैक्षणिक चर्चा करताना दिसतात, त्याप्रमाणेच भटक्या गाईबैलांचे निवांत कळपही आता दिसताहेत. एका बैलाच्या हल्ल्यानंतरच्या गदारोळामुळे प्राप्त झालेल्या या हक्काच्या आसऱ्याचा मनसोक्त वापर करण्याचा आत्मविश्वास आता त्यांच्याही अंगी रुळत चालल्याचे आता स्पष्ट झाले. वर्ग सुरू असताना एका गाईने तेथे प्रवेश केला, ही बातमी समाजमाध्यमांवरून पसरलेली असल्याने ती खरी असेलच असे नाही; पण चर्चा करण्यासाठी तर ‘फेक न्यूज’ही पुरते! या गाईला कोणतीच प्रवेश परीक्षा पार न करतादेखील वर्गात प्रवेश कसा मिळतो, येथपासून, सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून तिने वर्गात प्रवेश कसा केला येथपर्यंत साऱ्या शंकांचे दळण सुरू झाले. हा परिसर एके काळी वनक्षेत्रातच समाविष्ट होता, त्यामुळे तो वन्य आणि भटक्या जनावरांचे नैसर्गिक निवासस्थान असल्याने त्यांचा वावर तेथे असण्यात गैर काय, असा रोकडा सवाल करणाऱ्या गोप्रेमींना मात्र गोमातेच्या या वर्गप्रवेश सोहळ्यामुळे धन्य झाले असेल. याआधी परिसरात बिबटय़ांचा संचार आढळला होता. अधूनमधून मगरींचा वावरही उघडकीस आला होता. गाई आणि बैल हे तर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणसंकुलाचे हक्काचे व आद्य रहिवासीच झाले आहेत. त्यामुळे वर्गाच्या एखाद्या खोलीत गाईने आपलेपणाने प्रवेश करण्यात काहीच गैर नाही, असाही युक्तिवाद आता होईल. गोमातेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरात आता गोमूत्राच्या पवित्र शिंपणामुळे प्राणवायूचे प्रमाण वाढेल आणि गोमयाच्या पुण्यप्रभावाने मच्छरादी किटाणूंचा प्रादुर्भावही कमी होईल. भिंती किंवा जमिनी गोमयाने सारविल्यास किरणोत्साराचा धोका संभवत नाही, असाही अणुविज्ञानाच्या पौराणिक ज्ञानाने संपन्न असलेल्या अनेक राजकीय नेत्यांचा दावा असतो. त्यामुळे आयआयटीच्या परिसरातील गोवंशाचा संचार ही सुरक्षिततेच्या आणि देशाचे बौद्धिक भविष्य उज्ज्वल करणाऱ्या बुद्धिमंतांच्या भावी पिढीच्या आरोग्यसंपन्नतेच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे. खरे म्हणजे, एका गाईच्या अस्तित्वामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या सुटणार असतील, प्रदूषणाची समस्या निकाली निघणार असेल आणि अणुसंसर्गास छेद मिळत असेल, तर वर्गावर्गात एक एक गाय बांधण्याचा प्रयोग करावयास हरकत नाही. सरकारने त्यासाठी आयआयटीला ‘विशेष गोरक्षण अनुदान निधी’ द्यायला हवा!
अवघा परिसर व्हावा ‘गो’मय!
गाई आणि बैल हे तर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणसंकुलाचे हक्काचे व आद्य रहिवासीच झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 30-07-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stray cow enters classroom in iit bombay abn