वर्गात सर्व मुले हजर राहतील, याची जबाबदारी शिक्षकांवर टाकून दिल्लीतील आप सरकारने नसती अडचण करून ठेवली आहे. शाळेत बसून करण्यासारखे काही नसते, म्हणून किंवा शाळेबाहेरचे जग अधिक आकर्षक असेल, म्हणून शाळा बुडवून भटकणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाही. वेळेत न पोहोचल्यामुळे शाळेच्या दारातच छडीने हातावर वळ उमटवणारी शिक्षा सहन करण्यापेक्षा जवळच्याच एखाद्या चित्रपटगृहात मॅटिनी शो टाकण्याची इच्छा होणे ही परंपरा फार जुनी. शाळा बुडवून थेटरात घुसलेल्या मुलांना तिथेही जेव्हा शिक्षकांचाच चेहरा दिसतो, तेव्हा त्यांची उडणारी भंबेरीही जुनीच. विशेषत: गणित वगैरे विषयाच्या तासाला बसून डोकेदुखी ओढवून घेण्यापेक्षा शेजारच्या हॉटेलात मिसळपाव खाल्लेला काय वाईट, अशी स्वाभाविक भूमिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खरे तर शाळेबाहेरचे जग अधिक आकर्षक वाटत असेल, तर त्यात त्यांची तरी काय चूक? अशा दांडीबहाद्दरांना वठणीवर आणण्याचा चंग दिल्ली सरकारने बांधला असून, आता त्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात होईल. सरकारने काढलेल्या अध्यादेशात मनोरंजक अशा सूचना आहेत. त्यातील महत्त्वाची म्हणजे शाळेच्या भिंतींची उंची वाढवण्याची. सहज उडी मारून शाळेबाहेर पडणाऱ्या मुलांची मोठीच अडचण यामुळे होईल, यात शंका नाही. एकमेकांच्या पाठीवर चढून भिंत चढण्याची मुलांची क्षमता एखाद्या क्रीडापटूला लाजवणारी असल्याने, अशा उडी मारणाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जेरबंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. दिवसातून दोनदा हजेरी घेणे ही अशीच एक सूचना. मुलांना वर्गात हातपाय बांधून कोंडून ठेवा हेच जणू जरा अधिक सभ्य भाषेत सांगणाऱ्या या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावर टाकण्यात आल्याने त्यांची मोठीच पंचाईत होणार आहे. हेडमास्तरांनी पालकांना चिठ्ठी देणे हाच एके काळी शहारे आणणारा प्रकार असे. दिल्ली सरकारच्या अध्यादेशात शाळेतून ‘गुल’ होणाऱ्या मुलांना कोणती शिक्षा करावी, याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी पालकांना चिठ्ठी पाठवण्याची सूचना मात्र आहे. आजच्या काळात शाळेच्या परिसरात इतके काही आकर्षक घडत असताना, शाळेत जावेसे वाटण्यासाठी काय करायला हवे किंवा मुलांच्या हाती पालकांच्या आग्रहाने येणाऱ्या मोबाइलसारख्या आधुनिक काळपुरुषाशी सामना कसा करायचा, याच्याही सूचना या अध्यादेशात असत्या, तर अधिक बरे झाले असते. काळ बदलला तरी परिस्थितीत फारसा फरक पडला नाही, हेच खरे!

Story img Loader