रविवार असूनही मोरू अंमळ लवकरच उठला. त्याने स्वच्छ तोंड धुतले, त्यानंतर स्वच्छतागृह गाठले आणि स्नान वगैरे करूनच तो बाहेर आला. आज ‘मन की बात’ मध्ये प्रधानसेवक गांधीजींबद्दल काहीतरी बोलतीलच याची मोरूला खात्री होती. गेल्या पंधरा दिवसांपासून देशात सगळीकडे स्वच्छता अभियान सुरू झाल्याने पाहावे तिकडे स्वच्छता दिसत होती. मोरूने कधीच एवढी स्वच्छता अनुभवली नव्हती. बापूजींच्या स्वच्छतेच्या संदेशाचा पगडा त्यांच्यानंतर सत्तर वर्षांनी देशाच्या मनावर बसतोय हे पाहून मोरूला बरे वाटले. मुंबईत क्रॉफर्ड मार्केटात अचानक साचलेला हिरव्या पानांचा कचरा साफ करतानाचा मुख्यमंत्र्यांचा एक फोटो पाहिला तेव्हा मोरूला खरे म्हणजे राग आला होता. स्वच्छता अभियान झाले म्हणून काय झाले? झाडांची हिरवी पाने कचऱ्यात आवारात येतात म्हणजे काय? आणि तो कचरा स्वच्छ करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना हाती झाडू घेऊन रस्त्यावर उतरावे लागते म्हणजे काय?.. आवारात काम करणारे सफाई कर्मचारी झोपा काढतात? आदी अनेक खोचक मध्यमवर्गीय सवाल मनात येऊन त्याला प्रशासन व्यवस्थेचा रागही आला होता. नंतर त्याने सहज समाजमाध्यमांवर पाहिले. अनेक जणांनी हाती झाडू धरून स्वत:ची छायाचित्रे काढून घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले, आणि त्याचा राग मावळून सध्या स्वच्छता पंधरवडा सुरू आहे, हे यामागचे कारण मोरूला लक्षात आले. त्यामुळे त्यानेही स्वत: खाली वाकून काही ठिकाणी आढळलेला कचरा उचलण्यास सुरुवात केली असता, बाजूलाच उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने हटकले. हा कचरा सफाई मोहिमेद्वारे पाहुण्यांच्या हस्ते साफ करण्यात येणार असल्याने मुद्दामच येथे आणून ठेवला असून तो तुम्ही उचलू नका, असे त्या अधिकाऱ्याने दरडावले असता, स्वच्छता मोहिमेचा पगडा मनामनावर बसल्याची मोरूची खात्रीच पटली. म्हणूनच रविवारी मन की बात ऐकण्याचे त्याने ठरविले. देश स्वच्छ होत असल्याची ग्वाही खुद्द पंतप्रधानांनीच दिल्याने त्याला बरे वाटले. ‘स्वच्छता हे स्वातंत्र्य’ असे बापूजी आवर्जून सांगत असल्याने, आपण खरोखरीच स्वतंत्र झालो आहोत का असा प्रश्न त्याला सर्वत्र फिरताना पडू लागला आणि जमेल तेवढा कचरा उचलायचा असे ठरवून मोरू पदोपदी खाली वाकू लागला. तेव्हा अनेक लोक आपल्याकडे विचित्र नजरेने पाहात आहेत, असाही भास त्याला झाला, पण काहीही झाले तरी स्वच्छता पंधरवडय़ातील आपला वाटा उचलावयाचाच असे मोरूने ठरविलेच होते. संध्याकाळी मोरू परतून घरी आला. बहीण काशी आणि मोरूचे वडील त्याची वाटच पाहात होते. वडिलांनी त्याला त्याच्या खोलीतील पसारा आवरण्याचा आदेश दिला असता ‘आज आपण खूपच थकलो असून नंतर करू’ असे सांगून सोफ्यात झोकून देत चित्रवाणी संच सुरू करून तो बातम्या पाहू लागला..  सारेच राजकीय पक्ष बापूजींच्या स्मृतींना उजाळा देत आहेत, हे पाहून सुखावला. ‘परस्परांशी भांडणाऱ्या, एकमेकांवर आरोप करणाऱ्या राजकीय पक्षांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे बापू..’ मोरू मनात म्हणाला, आणि आपल्याला हे वाक्य सुविचारासारखे अचानक सुचल्याचे पाहून तो स्वत:वरच खूश झाला. देशातील राजकीय पक्ष तर बापूजींचे स्मरण करत आहेतच, पण वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधीही भारतात मुद्दाम दाखल झाल्याचे पाहून मोरूला कमालीचा आनंद झाला.. ‘आता स्वातंत्र्य दूर नाही’, असेही त्याला वाटून गेले!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा