आपण केवळ पुतळा आहोत, भावना व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला नाही हे विसरून मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सेल्फीसाठी ठेवलेल्या त्या फायबरच्या वाघानेही आज दोन अश्रू ढाळले असतील. राज्यात व्याघ्रसंवर्धन मोहिमा सुरू झाल्या, बिग बी नावाच्या बडय़ा असामीला व्याघ्रदूत म्हणून नेमले गेले, मंत्र्यांच्या दालनात, मातोश्रीवर, जागोजागी फायबरच्या व्याघ्रमूर्ती विराजमान झाल्या, तेव्हा, व्याघ्रसंवर्धनाचा खरोखरीचा वसा आपण घेतला असावा असे वाटून प्रत्येक वन्यजीवप्रेमीला खचितच अभिमानाचे उमाळे आले असतील. पाच वर्षांपूर्वी- तेव्हा पतंगराव कदम वनमंत्री होते – वाघाची शिकार करणाऱ्यास दिसताक्षणी गोळ्या घाला असा आदेश सरकारने जारी केला होता, तेव्हाही वन्यजीवप्रेमींना बरे वाटलेच होते. पण त्यानंतरच जय बेपत्ता झाला आणि आता अवनी नावाच्या वाघिणीस गोळ्या घालून ठार करण्यात आले. १३ मानवी जिवांची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. वन्यजीव संरक्षणाचे सारे कायदे, न्यायालयाचे आदेश आणि स्थानिकांच्या भावना या सर्व बाबींचे पालन करून या अवनीचे अस्तित्व पुसण्याचे कर्तव्य सरकारने शार्प शूटरची मदत घेऊन पार पाडले. काही वर्षांपूर्वी माणसांतील नामचीन गुंडांचाही असाच खात्मा केला जात असे. त्याला एन्काऊंटर असे म्हणत. त्यानंतर पोलिसांकडून प्रसिद्धिपत्रक जारी केले जायचे. नामचीन गुंड पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अलगद सापडतो, मग पोलीस त्यास शरण येण्याचे आवाहन करतात, पण तो गुंड पोलिसांवरच गोळीबार करतो व नाइलाजाने स्वसंरक्षणार्थ कराव्या लागलेल्या गोळीबारात तो गुंड मृत होतो, असे ठोकळेबाज वर्णन त्या प्रसिद्धिपत्रकात पाहावयास मिळायचे. अवनीला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती त्या प्रसिद्धिपत्रकाची आठवण करून देणारी आहे. अवनी नरभक्षक होती, त्यामुळे तिला ठार मारणे गरजेचे होते, असे म्हटले जात असले, तरी बळी घेण्याव्यतिरिक्त कोणतेच उपाय हाती नाहीत का, हा सवाल यापुढे सरकारला छळत राहील. एक तर, माणसांच्या अधिवासाकरिता उपलब्ध असलेली जागा आजच अपुरी पडत असल्याने आणि भविष्यातील विकासासाठी जागेचे पर्याय शोधणे अपरिहार्य होणार असल्याने, जंगलांचा ऱ्हास करणे यापुढे गरजेचे होणार आहे. जंगली प्राण्यांच्या अधिवासाची चिंता करावी की माणसाच्या विकासास प्राधान्य द्यावे, असा प्रश्न पडून जंगली प्राण्यांचे अस्तित्व पुसण्यास प्राधान्य देण्याची वेळ भविष्यात येणार याची चाहूल कधीपासूनच सुरू झाली आहे. अवनीला जेरबंद करून सांभाळावे, की नरभक्षक ठरवून तिचे एन्काऊंटर करावे हा प्रश्न समोर असताना, दुसरा पर्याय भविष्यातील या प्रश्नाच्या उत्तरासाठी अधिक सोयीस्कर ठरला असावा. एक भयाण, प्रश्नार्थक भविष्य अधोरेखित करून अवनीने आपले आयुष्य संपविले आहे. अवनी, तुझ्या जाण्याने काही दिवस खचितच दु:ख व्यक्त होणार आहे. पण आमचे कार्य पुढे सुरूच राहणार आहे. व्याघ्रसंवर्धन मोहिमेस कुठेही निधी कमी पडू नये यासाठी सरकार कटिबद्ध राहणारच आहे. तुझे बछडे जोवर सुतासारखे सरळ राहतील तोवर त्यांचा सांभाळ करणे हीच आमची तुला श्रद्धांजली असेल..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा