काही प्रश्न शाश्वत असतात. ते कधी संपतच नाहीत आणि पिच्छाही सोडत नाहीत. त्यावर उत्तरे शोधणे हादेखील एक कायमचा उपद्व्याप होऊन बसतो. तरीही ते प्रश्न उत्तरांनाच पुरून उरतात. ‘सुळसुळाट’ हा शब्द ज्या ज्या संदर्भात वापरला जातो, ते सारे प्रश्न या प्रवर्गात मोडतात. ‘संख्यावाढ’ हा केवळ माणसांच्याच बाबतीतील प्रश्न नाही. माणसांच्या सोबतीने राहणाऱ्या सर्वच प्राणिमात्रांना या प्रश्नाची लागण झालेली आहे. हा प्रश्न आपल्यापुरता सोडविण्यासाठी माणसाने फार पूर्वीच काही उपाय शोधले. ते अमलातही आणले. नसबंदी हा त्यातलाच एक प्रकार; पण कित्येक वर्षे हा उपाय वापरूनही प्रश्न मात्र आहे तिथेच आहे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट थोपविण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करण्यास महापालिकेने सुरुवात केली, पण तो प्रश्नही उपायांना पुरून उरला.  बेसुमार लोकसंख्यावाढीची माणसापुढील समस्या गंभीर होत असताना, कुत्र्यामांजरांच्या लोकसंख्यावाढीचा हा नवा वेताळ मानगुटीवर बसला आहे. कुत्र्यांची नसबंदी हा कायमस्वरूपी कंत्राटाचा एक ‘प्रवाही मार्ग’ कायम असतानाच, आता मांजरांच्या नसबंदीचा नवा ‘कंत्राटी’ मार्ग पुढे येऊ पाहतो आहे. सजीवांच्या लोकसंख्येवर निसर्गाचे नियंत्रण असते असे म्हणतात; पण मुंबईसारख्या माणसाचे नियंत्रण असलेल्या महानगरातील प्रत्येक सजीवावर माणसाचेच नियंत्रण असणार! या ‘कर्तव्यभावने’ला जागूनच महापालिकेतील काही ‘काळजीवाहू’ लोकप्रतिनिधींना आता मांजरांच्या सुळसुळाटाची चिंता लागून राहिली असावी. मध्यंतरी, मुंबईतील कबुतरांच्या वाढत्या संख्येबद्दलही महापालिकेच्या सभागृहात चिंतेचे सूर घुमले होते. कबुतरांच्या अन्नातून प्रजननक्षमता रोखणारे औषध मिसळून त्यांची लोकसंख्यावाढ रोखण्याचा एक विचार सुरू असतानाच, आता मांजरांवर नियंत्रण आणण्याची काळजी महापालिकेत उमटू लागली आहे. हे सारे स्थानिक मानवाच्याच हितासाठी आहे, अशी  समजूत असल्याने, जनतेच्या हिताची काळजी घेणाऱ्या त्या लोकप्रतिनिधींविषयीच्या आदराने मुंबईकराचा ऊर एव्हाना भरून आला असेल यात शंका नाही. मुंबईतील माणसांची नेमकी संख्या अधिकृतपणे गुलदस्त्यात असतेच, त्यामुळे कुत्री आणि मांजरांची संख्या समजणे काहीसे कठीणच आहे. तरीही, या प्राण्यांनी लोकसंख्येच्या बाबतीत माणसापुढे जाणे ही मुंबईच्या निसर्गाची पायमल्लीच ठरेल, हा उदात्त हेतू यामागे असावा. काहींना यात कंत्राटाचा व टक्केवारीच्या नव्या वाटांचा भास होत असेल, तर तो त्यांच्या आजवरच्या अनुभवाचा दोष मानला पाहिजे. शिवाय, कुत्र्यामांजरांच्या प्रश्नावर एवढी काळजी करणारे लोकप्रतिनिधी माणसांच्या समस्या का सोडवत नाहीत, हा प्रश्नही अनेकांना पूर्वानुभवामुळे पडू शकतो; पण कुत्र्यामांजरांच्या आणि कबुतरांच्या सुळसुळाटाचा बंदोबस्त करण्यासाठी सरसावणे म्हणजे माणसाच्या समस्यामुक्तीचाच एक प्रयत्न आहे, असा सकारात्मक विचार केला, की सारे काही सुरळीत वाटू लागेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा