उन्हं अंगावर आली तरी अंथरुणात लोळत पडलेल्या मोरूकडे पाहून त्याच्या बापाला कीव आली. नोकरीसाठी वणवण करणाऱ्या मोरूच्या काळजीने बापाची झोप उडाली होती आणि बेकारीने गांजलेला मोरू झोपा काढत होता. वर्तमानपत्र तोंडासमोर धरून मोरूच्या बापाने एक सुस्कारा टाकला आणि मोरूची झोप चाळवली. काहीशा नाराजीनेच तो उठला आणि ब्रश तोंडात धरून बापाच्या हातातून वर्तमानपत्राचे एक पान त्याने ओढून घेतले.  काही क्षणांतच मोरू वर्तमानपत्र वाचण्यात गुंतला. अचानक मोरूच्या डोळ्यात चमक उमटलेली बापाला दिसली, आणि त्याचाही चेहरा खुलला. हे रोजचेच होते. मोरू वर्तमानपत्रातून रोजगाराच्या संधींचे संशोधन करतो, हे मोरूच्या बापास माहीत होते. आजही त्याला कुठल्या तरी नव्या संधीचा शोध लागला असणार, हे बापाने तर्कानेच ताडले. आता मोरू आपल्या नव्या कल्पना आपल्यासमोर मांडणार हेही मोरूच्या बापास ठाऊक होते. तसेच झाले. मोरू बेसिनवर गेला, त्याने खळाखळा चूळ भरली आणि पुन्हा वर्तमानपत्राचे ते पान उघडून तो बापासमोर बसला आणि एका बातमीवर बोट ठेवून तो बापाकडे पाहू लागला. मोरूला त्यामध्ये नव्या धंद्याची बीजे दिसू लागली होती. मोरूच्या बापाने प्रश्नार्थक चेहरा केला आणि मोरूची नजर दूरवर कुठे तरी खिळली. जणू त्याला भविष्याची चाहूल लागली होती. ‘बाबा, आता आपण शोधनिबंधांचे दुकान काढणार.. तिकडे चायनामध्ये पीएचडीसाठी प्रबंध विकून एकाने रग्गड पैसा मिळवला होता. मग अशी किती तरी दुकाने सुरू झाली. आपल्याकडेही मराठवाडय़ात शोधनिबंधांचा धंदा कुणी तरी सुरू केला होता, पण तो चालला नाही. मेघालयातून चार लाखाला एक शोधनिबंध विकत घेऊन शेकडो पीएचडीवाल्यांनी नोकऱ्या मिळवल्या होत्या.. आठवतंय? ‘एव्हाना मोरूच्या बापाचे डोळे विस्फारले होते.  तो विस्मयाने मोरूकडे पाहात होता. त्याच्या नजरेत भीती होती, कौतुकही होते आणि शंकाही होती. मोरूने बापाच्या डोळ्यासमोर हाताचे तळवे जोरात हलविले आणि मोरूचा बाप भानावर आला. ‘मेक इन इंडिया स्कीममध्ये आपण आता शोधनिबंधांचे दुकान टाकणार.. अशा स्टार्टअपची देशाला नसली तरी राज्याला गरज आहे’.. मोरू उत्साहाने बोलत होता आणि त्याच्या शब्दागणिक मोरूच्या बापाच्या चेहऱ्यावर भीतीची रेषा उमटत होती. अखेर मोरूने ती बातमी बापासमोर धरलीच.. ‘बाबा, प्राचार्यपदासाठी आता दहा शोधनिबंधांची अट घातली आहे. बेकारांना नोकरीची ही नवी संधी देण्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. शोधनिबंधांची सोय आपण करू.. पुढे काय करायचं ते त्यांना माहीत असतं’.. मोरूच्या मुखातून अनुभवी माणसासारखे बोल बाहेर पडू लागले आणि बापाने कपाळाला हात लावला. ‘अरे, आधीच या पदासाठी माणसं मिळत नाहीत. प्राचार्याचा दुष्काळ पडलाय आणि त्यात हा नवा तेरावा महिना.. कसा चालणार रे तुझा धंदा? ‘..मोरूने निराश नजरेने बापाकडे पाहिले. आपल्या स्टार्टअपच्या स्वप्नाला सुरुंग लागल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर उमटली होती.  मोरू पुन्हा डोक्यावर पांघरूण घेऊन पलंगावर आडवा झाला. पुन्हा एक लांबलचक सुस्कारा सोडून विषण्णपणे मोरूकडे पाहात मोरूच्या बापाने वर्तमानपत्रात डोके खुपसले..