‘ओऽऽऽ साहेब, जरा ऐका तर माझं.’ सकाळपासून समोरून जाणाऱ्या प्रत्येक शिपायाकडे बघत ओरडणाऱ्या त्या भुरट्या चोराची अखेर एका जेलरला दया आली. राऊंड संपल्यावर मुद्दाम ते त्याच्या बराकीसमोर जाऊन उभे राहिले. हे बघून हुरूप आलेला तो भुरटा मग तावातावात सुरू झाला, ‘थँक यू साहेब, आता तोंड फिरवणारे हे सारे शिपाई आर्यन माझ्यासोबत कोठडीत असताना आत येऊन मला फोटो काढायला लावायचे. त्याला काहीतरी खाऊ घाल, त्रास देऊ नको असे सांगायचे. तो काय म्हणत होता हे वारंवार विचारायचे. आता तो बाहेर गेल्यावर मी पुन्हा आत आलो तर कुणी बघायलाही तयार नाही. या देशात गरिबांची काही इज्जतच नाही साहेब.’ त्यावर जेलरचा पारा चढला. ‘लेक्चरबाजी नको, काय म्हणायचे ते सांग.’ मग वरमलेला भुरटा बोलू लागला, ‘साहेब टीव्हीवर चमकायचा हक्क काय आम्हाला नाय का? आर्यनसोबतच्या दोनचार गोष्टी मी चॅनलवर सांगितल्या तर पोलिसांना एवढा राग येण्याचे काहीच कारण नव्हते. तशीही ती जुहूची घरफोडी जुनी होती. मला वाटले केस क्लोज झाली असेल. पण माझा चेहरा झळकताच सारे धावले व पुन्हा बेड्या ठोकल्या. साहेब, मी टीव्हीच्या माध्यमातून आर्यन कसा चांगला व निर्दोष आहे हेच सांगत होतो. त्या दिल्लीवाल्यांनी रचलेल्या कारस्थानाविरुद्ध राज्यात जो माहोल तयार केला जात होता त्याला हातभार लावत होतो. मला वाटले ‘अच्छा किया’ असे पोलीस म्हणतील पण झाले उलटेच. आठदहा दिवस बाहेर राहू दिले असते तर आणखी दोनतीन चॅनलवर जायचा प्लॅन होता. सुटला की मन्नतवर ये असे आर्यनने सांगून ठेवले होते. त्याच्याकडे जाऊन पिक्चरमध्ये एखादे काम मागायचे. ते मिळाले की हा धंदा सोडून द्यायचा. घरवालीला हे सांगितले तर तीही खूश झालेली. पण या पोलिसांनी माझ्या स्वप्नाचा चुराडा केला. सच्ची बताता हू साब, याच कारणामुळे मी त्या दिवशी जेलच्या बाहेर कुणाच्या खिशालाही हात लावला नाही. शर्टाची वरची बटणं लावलेली राहतील याची काळजी घेतली. चॅनलवाल्यांशी एवढे चांगले वागलो की अजूनही ते घरी फोन करून कुठे आहे म्हणून विचारत आहेत. आर्यनने बऱ्याच गोष्टी सांगितल्या मला. त्या लोकांपर्यंत पोहोचवून चमकण्याची चांगली संधी पोलिसांनी हिरावली. आता तुम्हीच सांगा साहेब, कुणी वाल्याचा वाल्मीकी होत असेल तर त्याला होऊ दिले पाहिजे ना! पण सुधारण्याची संधीच देत नाहीत. आता परवाही ‘साले टीव्ही इंटरव्ह्यू देता है’ म्हणत मारमार मारले. आता मार खाऊन मी दुरुस्त थोडीच होणार? आर्यनचा बाप शाहरुख आपला ‘जिगर का टुकडा’ आहे. एकही पिक्चर सोडत नाही त्याचा. त्याला भेटण्याची संधी चालून आली होती. कदाचित त्याने म्हटले असते तर हा धंदाबी सोडून दिला असता. एकदोन रोल मिळाल्यावर तिकडेच हातपाय मारले असते. जुहूवाल्यांना हात जोडून सांगितले, मला आठ दिवस बाहेर राहू द्या. नशिबाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊ द्या पण ऐकायलाच तयार नव्हते. आता तुम्हीच सांगा साहेब, माझे काय चुकले?’ क्षणभर थांबून जेलर म्हणाले, ‘तू स्वत:ची बाजू छान मांडतो’ त्यावर भुरटा म्हणाला, ‘साहेब वकील परवडत नसल्याने कोर्टातही मीच बाजू मांडतो.’ हे ऐकून जेलर हसत तिथून निघाले. ते जाताना बघून भुरटा पुन्हा ओरडू लागतो, ‘ओ साहेब कमीत कमी मला त्या आर्यनवाल्या कोठडीत तरी ठेवा. नशिबाने दुसरी संधी दिली तर…’ हे ऐकून न ऐकल्यासारखे करत जेलर समोर निघाले. इतर बराकीतले कैदी मात्र हास्यकल्लोळात बुडाले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा