काळ किती झपाटय़ाने बदलत असतो पाहा.. कालपर्यंत ज्या पक्षात ‘व्यक्तिनिष्ठा हीच पक्षनिष्ठा’ अशी स्थिती होती आणि ज्या पक्षात ‘राष्ट्र प्रथम आणि व्यक्ती शेवटी’ अशी स्थिती होती, तेथे काळाचे काटे पुरते उलटेसुलटे झाले आहेत. भाजपच्या लहानमोठय़ा कार्यालयांत, ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि व्यक्ती शेवटी’ असे शब्द असलेला फलक दिसतो. गेल्या दीड-दोन वर्षांत पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आणि काळही बदलला. नरेंद्र मोदींनी मतदानानंतर कमळाच्या चिन्हासोबत काढलेल्या ‘सेल्फी’ने पक्षात हा बदल घडविला, तेव्हापासून पक्षातच ‘सेल्फीवेड’ संचारले असे म्हणतात. हे सदासर्वदा स्वत:लाच स्वत:समोर पाहण्याचे वेड सर्वत्र फोफावत असताना काँग्रेस मात्र या सेल्फीवेडापासून दूर का राहिली, ते कोडे उलगडते आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनीच सेल्फीवेडाशी नरेंद्र मोदींचे नाव जोडल्याने आता सेल्फीपासून काँग्रेसजन कायमचा दुरावणार आहे. गेल्या वर्षी, १७ मार्चला सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली भूसंपादन कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनात निघाले तेव्हा अनेकांना सोनियाजींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नव्हता. पण आता सोनियानिष्ठ काँग्रेसजनांना कधी सेल्फीचा मोह झालाच, तर तो आवरावा लागणार आहे. कारण ‘सेल्फी’ ही ‘मोदी स्टाइल’ असल्याचे खुद्द सोनिया गांधी यांनीच जाहीर करून टाकले आहे. ज्या पक्षात ‘सोनियानिष्ठा हीच पक्षनिष्ठा’ मानली जाते, तेथे ‘मोदी स्टाइल’ची सेल्फी म्हणजे पक्षनिष्ठेशीच प्रतारणा, याची खूणगाठ आता काँग्रेसजनांना स्वत:शी बांधावी लागेल. शनिवारी सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघाचा फेरफटका मारल्यानंतर अलाहाबादेतील आनंद भवन या आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या वास्तूला भेट दिली, तेव्हा उत्साहाचे वारे अंगात संचारलेल्या सोनियानिष्ठांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला. अनेकांनी हातातील मोबाइल समोर धरून नेमका कोनही साधला, पण ‘मोदी स्टाइलपासून स्वत:ला वाचवा’ असा संदेश सोनिया गांधींनी दिला आणि सेल्फीचा हा मोह कार्यकर्त्यांना आवरावा लागला. सेल्फी काढली असती तर आपल्या हातून निष्ठेची केवढी प्रतारणा झाली असती, असा पश्चात्तापदग्ध भाव त्या वेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उमटला असणार. सेल्फी काढण्याऐवजी सामूहिक छायाचित्र काढावे असे खुद्द सोनियाजींनीच सुचविल्याने, यातून त्यांनी नेमका कोणता संदेश दिला असावा याचा अर्थ आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच शोधावा लागणार आहे. ज्या पक्षात ‘व्यक्तिनिष्ठा हीच पक्षनिष्ठा’ असते, त्या पक्षाला ‘सेल्फी’पासून दूर राहावेसे वाटू लागावे आणि ज्या पक्षात ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि स्वत: शेवटी’ असा बाणा होता, त्या पक्षाला मात्र ‘स्वयंप्रतिमा’ वेडाने झपाटावे, हे काळ बदलत असल्याचे लक्षण मानावे का?.. कदाचित याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

Story img Loader