‘वापस लो, वापस लो, काला कानून वापस लो’, ‘देशभरातील पालकांना छळणारा हा कायदा रद्द झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत हजारोंचा मोर्चा आझाद मैदानात येऊन स्थिरावल्यावर जाहीर सभा सुरू झाली. प्रारंभीच्या काही भाषणांनंतर संघटनेच्या अध्यक्षांनी बोलायला सुरुवात केली. ‘देशभरातील पालकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या विधिसंघर्षग्रस्त पालक संघटनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाचा हा पहिला दिवस. चार वर्षांपूर्वी चीनमध्ये मुलांनी गैरवर्तन वा गुन्हा केल्यास त्याची शिक्षा पालकांना असा कायदा लागू झाला. दोन वर्षांपूर्वी हा कायदा थोडेफार बदल करून देशात लागू करण्यात आला. या कायद्याचा आधार घेत तपास यंत्रणांनी समस्त पालक वर्गाला सध्या सळो की पळो करून सोडले आहे. मुलांच्या दुष्कृत्यासाठी अनेकांना कोठडीत जावे लागले तर काहींना जबर दंड भरावा लागला. यामुळे मुले शिरजोर तर पालक भयभीत झाले आहेत. एकीकडे कायद्याचा जाच तर दुसरीकडे गृहकलहाला सामोरे जावे लागत आहे. एका मुलाला शाळेत शिक्षक रागावले. त्यामुळे नाराज झालेल्या मुलाने मध्यान्हाच्या सुट्टीत वर्गमित्रांशी भांडण केले. तपास यंत्रणांनी मात्र त्याच्या वडिलांना अटक केली. ‘नुसता ऑनलाइन गेम का खेळतो, अभ्यास कर, मोठा हो’ असे एका पालकाने बजावताच मुलाने रागाच्या भरात शेजारच्यांची दुचाकी दगडाने ठेचली. जबाबदार पालकाला धरले गेले. प्रेमभंग झालेल्या एका मुलाने मुलीच्या घरावर दगडफेक केली, त्याची शिक्षा नाहक पालकाला भोगावी लागली. यामुळे मुलांना हटकायचे तरी कसे, असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाला आहे. काही पालकांनी मुलांना चांगल्यासाठीच रागावतो हे सिद्ध करण्यासाठी घरात कॅमेरे लावले. तरीही मुलांनी गैरवर्तन केल्यावर फुटेज दाखवूनसुद्धा पालकांना कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लाच द्यावी लागली. नवीन मोबाइल किंवा बाइक घेऊन दिली नाही म्हणून मुले राग काढत असतील तर त्याची शिक्षा पालकांना का? (टाळ्या) आता तर मुलांनी शाळा व महाविद्यालयात गट स्थापन केले असून या कायद्याचा धाक दाखवून पालकांना कसे काबूत ठेवायचे याचे बेत आखले जात आहेत… एका प्रकरणात तपास यंत्रणांनीच ही बाब उघड केली. आई-वडील दोघेही नोकरी करणारे असले की पाल्याकडे दुर्लक्ष होऊन त्याच्या गैरवर्तनात वाढ होते. या कायद्याच्या धाकामुळे अशा अनेक घरांत एकाला घरी बसावे लागले. मुलाला साधी चापट मारायची सोयसुद्धा उरलेली नाही. तेव्हा हा कायदा एक तर मागे घेतला जावा किंवा त्यात बदल करण्यात यावा. पाल्यांना सांभाळण्यासाठी नोकरदारापैकी पती किंवा पत्नीला मध्ये मध्ये पगारी रजा मंजूर करावी. मुलाचा हट्ट न पुरवण्याला पालकाची आर्थिक स्थिती जबाबदार असेल तर कारवाईच्या आधी त्यावर विचार व्हावा. या कायद्यानुसार मुलांसाठी जशी समुपदेशन केंद्रे सुरू केली तशी पालकांसाठी सुरू करावीत व कारवाईच्या आधी त्यांना केंद्रात पाठवावे. तपास यंत्रणांचा अतिरेक त्वरित थांबवण्यात यावा. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संघटनेच्या वतीने देशभर मोठे आंदोलन पुकारले जाईल असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत.’ भाषण संपताच घोषणांचा गजर सुरू होतो. तेवढ्यात अध्यक्ष पुन्हा ध्वनिक्षेपक हातात घेतात. ‘एक आनंदाची बातमी. मुलाच्या गैरकृत्याची शिक्षा भोगावी लागलेल्या शाहरुख खान व अजय मिश्रांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून ते दोघेही वेगवेगळ्या वेळी येथे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.’ हे ऐकताच पीडित पालक टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करतात.

Story img Loader