गेल्या साडेचार वर्षांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस. टी. महामंडळात ज्या घोषणा केल्या, त्यांचे एकत्रीकरण केले की ‘अच्छे दिन’ कशाला म्हणावे हे सहज समजून येते. कोणे एके काळी, महापालिका निवडणुकीच्या हंगामात, ‘करून दाखविले’ असे अभिमानाने सांगणारे फलक जागोजागी लावून ज्या शिवसेनेने आपल्या कामांची यादी जनतेसमोर ठेवली होती, त्या सेनेचेच दिवाकर रावते हे खंदे पाईक असल्याने, त्यांनी परिवहन खात्याच्या सर्वागीण विकासासाठी जेवढय़ा घोषणा केल्या, त्यांची जंत्री मांडून ‘करून दाखविले’चा नारा देण्याची नवी संधी मिळावी अशीच आता सामान्य शिवसैनिकांची इच्छा असणार! दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगारांसाठी महामंडळात सव्वाचार हजार पदांची महाभरती करण्याची घोषणा रावते यांनी केली. त्याशिवाय, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकास महामंडळात नोकरी देण्याचेही त्यांनी जाहीर केले. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांसाठी एसटीच्या नोकरीचे दरवाजेही त्यांनी एका घोषणेतच खुले करून टाकले. मुळातच महाराष्ट्राला असंख्य समस्यांनी ग्रासलेले असताना असे, दिलासा देणारे काही शब्दांचे शिडकावे करणाऱ्या रावते यांच्या घोषणा म्हणजे तापलेल्या मनावर होणारी शीतल मलमपट्टीच ठरते. साडेचार हजारांहून अधिक बेरोजगार तरुण आता एसटी महामंडळातील नोकरीच्या संधीकडे डोळे लावून बसले असतील, यात शंका नाही. अशा शेकडो नजरा जेव्हा आपल्या एखाद्या शब्दावर खिळून राहतात, आपल्या दिलाशाचे दोन शब्द ऐकण्यासाठी हजारो कान आतुरले असतात, हे जेव्हा एखाद्या नेत्यास लक्षात येते, तेव्हा त्यामागील समाधानाची जाणीव अतुलनीय असते. दिवाकर रावते यांना आपल्या प्रत्येक घोषणेनंतर अशा समाधानाची सुखद जाणीव होत असणार.. अशी जाणीव होत गेली, की आश्वासनांचा शिडकावा करत राहण्याचा छंद लागतो. रावते यांनी साडेचार वर्षांत बरसलेल्या असंख्य आश्वासनांचे अनेक संभाव्य लाभार्थी आता त्याच्या वास्तवरूपाची वाट पाहत असून तसे झाले, की ‘करून दाखविले’ अशा मजकुराचे फलक लावण्याची संधी त्यांच्या मातृपक्षास लाभणार आहे. रावते यांच्या धडाडीबद्दल कोणासच शंका नाही. असंख्य घोषणांचा पाऊस पाडून त्यांनी ती सिद्धच केलेली आहे. एसटी महामंडळाच्या परिवहन सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांवरील सुखसुविधांची जाहिरातबाजी असो, कर्मचाऱ्यांसाठी योजनांची खिरापत असो किंवा दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त, अनुशेषग्रस्तांसाठी योजना जाहीर करणे असो, रावते यांनी कधी हात आखडता घेतलेला नाही. महाराष्ट्राच्या परिवहन खात्याच्या इतिहासात रावते यांच्या अथक प्रयत्नांची नक्कीच नोंद होणार याबद्दल कोणाच्याच मनात कोणतीच शंका राहणार नाही, अशी स्थिती दिवसागणिक भक्कम होत असताना आता रावतेंनी आपली नजर ओला-उबरच्या टॅक्सी सेवांकडे वळविली आहे. या सेवा बेकायदा असल्याचे त्यांनी जाहीर केले, तेव्हा, याच टॅक्सीचालकांच्या संपात तोडगा काढण्यासाठीही आपणच पुढाकार घेतला होता हेही त्यांना आठवत असेलच. ओला-उबरची सेवा बेकायदा असली, तरीही त्यांच्या संपात तोडगा काढून त्यांना ती सेवा सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन रावते यांनी सहृदयतेचा एक अनोखा आदर्श उभा केला होता. सरकारमध्ये असूनही एखाद्या बेकायदा सेवेविषयी एवढी कणव दाखविणाऱ्या दुर्मीळ नेतृत्वगुणाचे आगळे दर्शनही त्यांनी घडविले आहे. आता सारे जण पुन्हा पुढच्या कृतीकडे, म्हणजे, ‘करून दाखविले’च्या फलकावरील नोंदीकडे डोळे लावून बसले असतील, यात शंका नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा