माकड हा माणसाचा पूर्वज असल्याचे डार्विनचे म्हणणे असले तरी वेदशास्त्रांत त्याचा तसा उल्लेख कुठेही नसल्याने डार्विनचा सिद्धान्त माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी नाकारला होता, याची आज आम्हांस राहून राहून आठवण येत आहे. कारण माकडे उत्क्रांत होऊन माणूस तयार झाला असेल, तर आजची माकडे ही उद्याची माणसेच आहेत एवढा उदार दृष्टिकोन आजच्या माणसाने नक्कीच ठेवला असता आणि उभय जमातींमध्ये सौहार्दाचे संबंध नक्कीच दिसले असते. पण आजकाल तर, ‘माकडांच्या हैदोसामुळे माणसे हैराण’ अशा मथळ्याच्या बातम्या तयार होतात आणि माकडांचा बंदोबस्त कसा करावा या चिंतेने माणसे धास्तावून जातात. माणसांच्या जगात एक नियम सर्वमान्यपणे पाळला जातो. तो म्हणजे, जेव्हा अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा शत्रूच्या शत्रूस मित्र मानण्यासही माणसे मागेपुढे पाहात नाहीत. माकडांच्या बंदोबस्तासाठी अलीकडे हाच नियम रूढ होऊ लागला आहे. म्हणूनच माणसांनी माकडांच्या बंदोबस्तासाठी वाघाचा वापर केला, ही बातमी वाचनीय ठरली. पण खरेखुरे वाघ असे सहजासहजी माणसांच्या दावणीस बांधून घेत नसल्याने, माकडांच्या बंदोबस्तासाठी नकली वाघाचा प्रयोगही प्रभावी ठरतो हे आता सिद्ध झाले आहे. वाघ खराखुरा असावयास हवा असे नाही हेही त्या प्रयोगानंतर स्पष्ट झाले. या बातमीचे मूळ कोठे असावे याबाबत कुतूहल वाटणे आता साहजिकच असल्याने बातमीचा तपशील सांगावयासच हवा! तर, आपल्या शेजारी, कर्नाटकातील नालुरू गावात श्रीकांत गौडा नावाच्या शेतकऱ्याने माकडांच्या शत्रूचा, म्हणजे वाघाचा वापर माकडांच्या बंदोबस्तासाठी करावयाची शक्कल लढविली. अर्थात, यासाठी खरा वाघ बाळगणे शक्य नसल्याने त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याच्या अंगावरच वाघाचा रंग दिला, झोकदार पट्टे सजविले. मग त्या कुत्र्यासही आपण वाघ असल्याचे वाटू लागले आणि तो दिमाखात शेतात वावरू लागताच पाचावर धारण बसलेल्या माकडांच्या टोळ्या गायब झाल्या. या बातमीतील श्रीकांत गौडा यांनी ही शक्कल लढविताना, वाघाचा रंग दिलेला कुत्रा आवेशात ओरडणार नाही याची काळजी नक्कीच घेतली असणार! कारण तसे केले नसते तर नकली वाघाचे बिंग फुटले असते आणि शत्रूच्या शत्रूस मित्र बनविण्याची माणसाची नीतीही फसली असती. पण कुत्र्याचा नकली रंग मात्र हळूहळू फिकट होत गेला आणि पुन्हा माकडांनी उचल खाल्ली. आता त्या शेतकऱ्याने आपल्या शेतात वाघ बनविलेल्या कुत्र्याचे फोटो जागोजागी लावले आहेत असे कळते. पण वाघाच्या नुसत्या चित्राचीही माकडांनी धास्ती घेतली असून माकडांना पळवून लावण्यात माणसास यश आले आहे, हे मात्र सिद्ध झाले आहे. आपण ज्याचे पूर्वज आहोत त्यानेच आपल्या बंदोबस्तासाठी आपल्या शत्रूचा खुबीने वापर केला हे त्या माकडांना कळले तर त्यांना काय वाटेल ते सांगता येत नाहीच, पण शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी माणसाने कुत्र्याला वाघ बनविले हे खऱ्या वाघास कळले तर त्याला काय वाटेल हेही सांगता येत नाही. एक मात्र खरे, की माकड आणि माणसात आता पूर्वज आणि वंशज वगरे नाते राहिलेले नाही. माकडे ती माकडे आणि माणसे ती माणसे.. कुत्रा मात्र, वाघदेखील होऊ शकतो!