अखेर बरोबर एक वर्षांनंतर, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपले शब्द खरे ‘करून दाखविले’. ‘आम्ही वाघांची प्रेमाने काळजी घेत असून राज्यात वाघांचे संवर्धन व्हावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, ते वाया जाणार नाहीत’, असा विश्वास गेल्या वर्षी याच दिवशी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. आज एक वर्षांनंतर त्याची खात्री पटण्यासारखी परिस्थिती आपण सारे जण अनुभवत आहोत. मुनगंटीवार हे भाजपचे असल्याने, ‘वाघांची प्रेमाने काळजी घेऊ’ असे ते म्हणत असले तरी त्यासाठी त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या उपाययोजना आहेत याची कोणासच काही कल्पना नव्हती. खुद्द वाघदेखील याबाबत  थोडेसे संशयानेच वनमंत्र्यांकडे पाहात असावेत. पण काही वाघांना मात्र याची खात्री असावी. निवडणुकीचे वारे वाहू लागले, आणि वाघांच्या संवर्धनाच्या सरकारच्या प्रयत्नांस यश येणार अशी चिन्हे दिसू लागली. आता, निवडणुका हा मानवी व्यवहारांचा भाग असल्याने, जंगलातील वाघांचा निवडणुकांशी संबंध काय, असा प्रश्न राज्याबाहेरील कोणास पडला तर त्यात वावगे काहीच नाही. पण महाराष्ट्रात मात्र, सध्याच्या राजकारणाची थोडीफार जाण असलेल्या कोणासही असा प्रश्न पडणार नाही. वाघाचे  दात मोजणाऱ्यांची जात सत्तेवर असल्याने, वाघांच्या भविष्याची चिंता वन्यप्रेमींना पडणे साहजिकच असल्याने मुनगंटीवार कोणत्या विश्वासावर व्याघ्रसंवर्धनाची ग्वाही देत सुटले, असे कोडे सुरुवातीस काही दिवस अनेकांना पडले असेल. पण पुढच्या प्रत्येक दिवसागणिक त्याची उकलही होताना ‘याचि डोळा’ अनुभवास येऊ लागले. आता निवडणुका पार पडल्या आहेत. सारे काही ठरल्यानुसार, अपेक्षेप्रमाणे पार पडले आहे. आता खुद्द वाघदेखील त्याचे दात मोजणाऱ्यांच्या गळ्यात गळा घालून प्रेमाने आयाळ कुरवाळून घेत असल्याचे चित्र साऱ्या राज्यभर दिसू लागले आहे, आणि अशा साऱ्या ‘वन्यस्नेही’ वातावरणात मुनगंटीवार यांनी त्यांची ती लोकप्रिय घोषणा खरी करून दाखविली आहे. गेल्या वर्षभरातच वाघांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली, हे  नागपुरात पत्रकारांना सांगताना मुनगंटीवार यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्यासारखे होते, असे समजते. आता महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये मोठय़ा वाघांची संख्या ६० ने वाढली आहे, एवढेच  नव्हे, तर देशाच्या पातळीवरही वाघांची संख्या वाढल्याची शक्यता आहे, असेही मुनगंटीवार यांनी जाहीर करून टाकले. व्याघ्रसंवर्धन  मोहिमेत सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना वाघदेखील सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी गेल्या वर्षी व्यक्त केला होता. गेल्या वर्षभरात वाघांची वाढलेली संख्या हे सरकारचे प्रयत्न आणि वाघांचा विश्वास यांचे एकत्रित फलित आहे. म्हणजेच, सरकारच्या प्रयत्नांविषयी आता वाघांनाही खात्री पटली, असे मानावयास हरकत नाही. निवडणुका आणि व्याघ्रसंवर्धनाची सरकारी आस्था यांचा खूपच जवळचा संबंध असल्याने, पुढे येऊ घातलेल्या  विधानसभा निवडणुकांआधी वाघांची संख्या भरमसाट वाढेल, पण ते गुरकावणार नाहीत याची काळजीही घेतली जाईल. मात्र याची वाच्यता होणार नाही. कारण ते एक राजकीय गुपित आहे.

Story img Loader