तर अशा रीतीनं भारताचा नवागत दस हजारी मनसबदार, विक्रमशिरोमणी, केवळ नावच नव्हे, तर गुणवत्ता, जिद्द, ईर्षां, धावांची भूक, केळ्यांची भूक वगैरे सारं काही ‘विराट’ असलेला कर्णधार विराटकुमार कोहली याची त्याच्यासाठी आणि मुख्य म्हणजे त्याच्या सहकाऱ्यांसाठी मनोभावे केलेली मागणी भारतीय क्रिकेट कारभार चालवणाऱ्या प्रशासकीय समितीनं मोठय़ा मनानं मान्य केली. काय म्हणता, केळ्यांची भूक हा काय प्रकार आहे? अहो, विराटची मागणी (नव्हे, विनंती) काय केवळ बायकांना पुढील वर्षी इंग्लंडात विश्वचषक स्पर्धेसाठी घेऊन जाण्याचीच नव्हती. याशिवाय भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नींसाठी मिळून स्वतंत्र रेल्वेचा डबा, जो आगाऊ बुक आणि ब्लॉक केला जाईल आणि भरपूर केळी या दोन प्रमुख मागण्या होत्याच की. केळी? होय, कारण गेल्या इंग्लंड दौऱ्यावर खाष्ट साहेबी यजमानांनी पाहुण्यांना म्हणजे टीम इंडियाला केळी सोडून भलतीच फळे (स्ट्रॉबेरी, सफरचंद, अॅव्होकॅडो, संत्री, मुसंबी यांपैकी नेमकी कोणती आणि त्यांचे दुष्परिणाम काय झाले याविषयी स्वतंत्र, सविस्तर अहवाल विराटनं सादर केलाय म्हणे) दिली. त्याचे योग्य ते ‘फळ’ त्यांना म्हणजे यजमानांना मिळालेच. तीनपैकी दोन मालिका यजमानांनी जिंकल्या. या कटकारस्थानाला काय म्हणावं? तेव्हा हे पुन्हा होऊ द्यायचं नसेल, तर भारतातूनच केळी इंग्लंडात घेऊन जावीत असं सुचवण्यात आलं आहे. क्रिकेटपटू आणि त्यांच्या मंडळींसाठी रेल्वेचा खास डबा ठरवल्यास, अशा गाडीला केळी भरलेली स्वतंत्र ‘वाघीण’ (वॉगन हो) जोडायची, की स्वतंत्र केळ्यांचा ट्रकच इंग्लंडभर त्यांच्याबरोबर फिरवायचा याविषयी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला, रेल्वे बोर्डाला, वाहतूक बोर्डाला विचारणा करण्यात आल्याचेही समजते. दोन महिने भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या ‘मंडळी’ तिथं राहणार असल्यामुळे भारतातून सतत केळी पाठवत राहणं कितपत जमेल याविषयी भारतात फलोद्यान बोर्ड, जहाज वाहतूक बोर्ड यांच्याकडेही विचारणा करण्यात आली आहे. निव्वळ निकृष्ट किंवा नापसंतीची फळं देऊनही प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणता येतं, हा फॉर्म्युला गवसल्यामुळे भविष्यात भारतीय दौऱ्यावर येणाऱ्या संघांना कोणकोणती फळं चाखायलाच नव्हे, तर जबरदस्तीने खायला लावायची यावरही खल झाला. त्या चर्चेची आम्हाला मिळाली ती खबर अशी (प्रथम क्रिकेट संघ आणि नंतर न लाभणारे फळ अशा क्रमाने पुढील जोडय़ा वाचाव्यात) – ऑस्ट्रेलिया – कडक पेरू, इंग्लंड – पाणचट संत्री, दक्षिण आफ्रिका – भुसकट सफरचंद, वेस्ट इंडिज – कडक नासपती, श्रीलंका – आंबट द्राक्षे, न्यूझीलंड – बेचव कलिंगड, पाकिस्तान (कधी काळी आलेच तर) – तुरट चिक्कू! भारतीय संघ मात्र कुठेही गेला, तरी त्यांना केवळ आणि केवळ भारतीय केळीच खायला द्यावीत, असा दंडक आमच्या बोर्ड किंवा समितीकडून लवकरच घातला जाण्याची शक्यता आहे. आता भारतीय संघातील सर्व सदस्यांचं, हिरवी केळी की पिवळी केळी की वेलची केळी यावर तेवढं मतैक्य व्हायचंय! वेलची केळ्यांविषयी विराट फारसा उत्सुक नसल्याचं समजतं.
बनाना क्रिकेट टीम!
अहो, विराटची मागणी (नव्हे, विनंती) काय केवळ बायकांना पुढील वर्षी इंग्लंडात विश्वचषक स्पर्धेसाठी घेऊन जाण्याचीच नव्हती.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-11-2018 at 02:45 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train travel banana virat kohli