ही वेळ आपल्यावरही येईल असा विचारही कधी त्यांच्या मनात आला नसेल. मुंबईचेआरे जंगल तर इथून किती तरी लांब. शिवाय, जिथे पुढच्या पिढय़ांचे जागरूक नागरिक घडविले जातात, त्या परिसरावर आपली सावली असल्याने, आरेची आपत्ती आपल्यापर्यंत येणार नाही या विश्वासात त्यांच्या फांद्यांना नवे धुमारेही फुटू लागले होते. दिवसागणिक बहरणाऱ्या डेरेदारपणावर हुरळून नव्या पक्ष्यांनी तिथे घरटी बांधण्यासाठी घिरटय़ाही सुरू केल्या होत्या आणि एखाद्दुसऱ्या घरटय़ात कोवळा किलबिलाट करणाऱ्या पिल्लांना या फांद्या झोकेही देऊ  लागल्या होत्या. असे सारे काही सुरळीत, सुरक्षित असताना परवाच कुणी कुऱ्हाडी-करवती घेऊन दाखल होतो, खोडावर सपासप घाव घालू लागतो आणि हिरवाईने डवरलेल्या फांद्यांची शकले पडू लागतात. बघता बघता निष्प्राण ओंडक्यांचे ढीग वाढू लागतात, .. मैदान उजाड, मोकळे होते आणि आयोजक समाधानाने पुढच्या सभेच्या तयारीला लागतात. आता सप महाविद्यालयाच्या परिसरातली ती झाडे हा भूतकाळ झाला आहे. आरेच्या जंगलातील त्या हरवलेल्या झाडांसारखाच! महाविद्यालयाच्या आवारातील या झाडांच्या सावलीखाली सुखावलेला कुणी तरी भविष्यात कधी आपल्या पुढच्या पिढीला घेऊन इथे येईल तेव्हा, ‘इथेही झाडे होती, एका सभेआधी त्यांच्यावर सपासप कुऱ्हाडी चालविल्या गेल्या आणि आमची सावली हरवली’ असे तो हरवल्या सुरात सांगेल.. कदाचित, तेव्हा त्याच्या डोळ्यातला भूतकाळ भुतासारखा भयभीत झालेला असेल. त्याच्या मुलाच्या कोवळ्या मनात त्या वेळी पर्यावरणाची एखादी शाळेत शिकलेली गोष्ट कदाचित ताजी होईल. अशीच एक पर्यावरणाच्या जाणिवेची गोष्ट कधीकाळी जिम कार्बेटच्या जंगलात बेअर ग्रिल्स नावाच्या जंगलप्रेमीसोबत हिंडताना, पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या माणसाने सांगितली होती आणि त्या पर्यावरणप्रेमाची हळवी कथा ऐकताना पर्यावरणाचे हजारो भक्तगणही हळवे झाले होते. आपल्या नेत्याच्या मनाचे मोठेपण पाहून त्यांचीही छाती अभिमानाने फुलली होती, अवघ्या मानवी संवेदनेला त्या कथेने पाझर फुटला होता. या नेत्याच्या लहानपणी त्याच्या मनावर झालेल्या संस्काराची ती कहाणी जगाने ऐकली होती. ‘माणसाच्या स्वार्थासाठी झाडे कापू नयेत, कारण लाकडालाही जीव असतो’ असा विचार लहानपणी मोदींच्या मनावर बिंबविणाऱ्या त्यांच्या मातेलाही तेव्हा सहजपणे शेकडो सलाम केले गेले होते. त्या वेळी अस्तित्वात असलेल्या झाडांना, त्यांवर वास्तव्य करणाऱ्या पक्ष्यांना माणसाची भाषा वाचता आली असती, तर या हळव्या कथेच्या अनोख्या ओलाव्याने त्यांचीही मने भारावली असती आणि सुरक्षिततेच्या सावलीखाली ती आश्वस्तपणे विसावली असती. पण तसे झाले नाही, तेच बरे झाले! नाही तर, ‘लाकडातही जीव असतो’ असे सांगणाऱ्यासाठीच आपल्यावर कुऱ्हाडी चालविल्या गेल्या अन् जीव गमावण्याची वेळ आली या भावनेने, सपासप कापलेले ते ओले ओंडकेही सुकून गेले असते. आता तिथे एका उजाड अस्तित्वाच्या उदास खुणा भूतकाळाला खुणावत राहतील, हे नक्की!

Story img Loader