देशातील जनतेचा, गरिबांचा, शेतकऱ्यांचा, उपेक्षितांचा खरा कळवळा येणारा पक्ष एकच असतो. तो म्हणजे, विरोधी पक्ष. सध्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या वर्गाच्या उद्धारासाठी कंबर कसली आहे, कारण आता काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. सत्तेत असतानाची बेपर्वाई आता चालणार नाही, याची पुरेपूर जाणीव असल्याने गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, उपेक्षितांच्या समस्यांवरून सरकारला धारेवर धरावे आणि राहुल गांधींनी आता झंझावाती दौरे काढावेत असेही पक्षात ठरले. त्यानुसार, मुंबईत येताच त्यांना खरे तर सरकारला धारेवर धरायचेही होते. पण मुंबईतील काँग्रेसजनांनी राहुलजींना ती संधीच मिळू दिली नाही. काँग्रेस ही एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे दर्शन अनेकवार होत असते. निष्ठावंत काँग्रेसजन आणि उपरे काँग्रेसजन यांच्यातील संघर्षांची या संस्कृतीला किनार आहे. काँग्रेसमध्ये झालेल्या पहिल्या फुटीनंतर कडवट इंदिरानिष्ठांनी रुजविलेल्या बीजाच्या फांद्या जागोजागी फोफावल्या. महाराष्ट्रातील निष्ठावंतांची तिसरी पिढी परवा राहुलजींच्या दौऱ्याच्या निमित्ताने जनतेला पाहायला मिळाली. याआधी दुसऱ्या पिढीतील निष्ठावंतांच्या संस्कृतीचे काँग्रेस दर्शन नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशापासून सुरू झाले, ते पुढे राणे पुरते नामोहरम होईपर्यंत कायम राहिले. पण असे झाल्याने संघर्ष संपत गेले तर पक्षाची ‘सांस्कृतिक’ परंपरा जोपासली कशी जाणार?.. अस्वस्थ निष्ठावंतांचा गट या चिंतेत बुडालेला असतानाच, शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेल्या ‘उपऱ्या’ निरुपमांनी केलेल्या ‘काँग्रेस दर्शन’च्या उपद्व्यापांचे आयते कोलीत निष्ठावंत मूलनिवासी-काँग्रेसींच्या हाती आले आणि काँग्रेस दर्शनाचा तिसऱ्या पिढीचा प्रयोग सुरू झाला. राहुलजींच्या दौऱ्याआधी निष्ठेचे ‘काँग्रेस दर्शन’ घडविण्याच्या प्रयोगाची रंगीत तालीमही झकासपणे पार पडली. पण राहुलजींच्या दौऱ्यातच याचा आविष्कार सादर करण्याचा निष्ठावंतांचा इरादा मात्र फिसकटला. सरकारला धारेवर धरून महापालिका निवडणुकीचा नारा देण्यासाठी ‘राहुलजी’ आले आणि त्यांना आतली भांडणे सोडवत बसावे लागले. निरुपमना कानपिचक्या देण्याऐवजी राहुलजींनी निष्ठावंतांनाच उपदेशाचे डोस पाजले.. ही म्हणजे निष्ठेचीच चेष्टा झाली! आता निष्ठावंत या शब्दाचे संदर्भ बदलून निष्ठेचे नवे रूप काँग्रेसजनांना धारण करावे लागणार अशी पक्षातील कुजबुज आमच्या कानावर आली आहे. तसेही, नुसती निष्ठा काय कामाची? इंदिरानिष्ठेची ‘कृपा’ लाभलेले काँग्रेसी संस्कृतीचे पाईक भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बाजूला पडल्यावर उत्तर भारतीय मुंबईकरांचा चेहरा म्हणून कामत किंवा त्यांची निष्ठा थोडीच कामी येणार आहे? उपरे आणि निष्ठावंतांमधील भांडण हा संस्कृतीचा भाग झाला. मतांचे गठ्ठे मिळवणाऱ्या चेहऱ्यातच खरे ‘काँग्रेस दर्शन’ घडते, हे निष्ठावंतांनी ओळखलेच नाही, हेच खरे!

Story img Loader