राजधानीतील अशोका हॉटेलमधील ती बैठक संपली, अमितभाईंनी रालोआतील मित्रपक्षांना दिलेल्या शाही रात्रभोजनाच्या बातम्याही माध्यमांवर झळकल्या. जावे की न जावे अशा दोलायमान स्थितीत सारा दिवस घालविल्यानंतर अखेर आघाडीचे अनेक नेते अशोकामध्ये दाखल झाले, बातमीतही आले, आणि देशाला नवे प्रश्न पडले. कशासाठी झाली असेल ही बैठक?.. काय असेल या शाही स्नेहभोजनाचे प्रयोजन?.. गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामांचा आढावा आणि त्यामध्ये मंत्री, खासदारांनी बजावलेल्या कामगिरीबद्दलचे आभार प्रदर्शन एवढाच या शाही बैठकीचा हेतू असेल, की परवाच पार पडलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालातून उफाळलेल्या उत्साहास नवी वाट करून देण्याच्या एका साहजिक आनंद सोहळ्याचे ते आयोजन असेल?.. निवडणुकीच्या निकालानंतरची रणनीती आखण्याची खलबते असतील, की नव्या रणनीतीतील मित्रांच्या भूमिकांची जाणीव करून देण्याचे ते एक निमित्त असेल?.. असे एक ना अनेक प्रश्न मतदारांनाही पडले.. तसेच विरोधकांनाही पडले.. अनेक प्रश्नांची उत्तरे काही जणांना मिळाली. पण अशी उत्तरे म्हणजे, राजकारणाच्या हिमनगाचे केवळ वरचे टोक असते, हे माहीत असलेल्यांचे मात्र या उत्तरांनी समाधान झालेच नाही. निकालोत्तर राजकीय परिस्थितीत सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार आणि तसे झाल्यास नव्या सरकारचे नेतृत्वही नरेंद्र मोदीच करणार याची खूणगाठ तर पक्षात तळागाळापासून सर्वत्र पक्की झालेली असल्याने, तो सांगावा देण्यासाठी मित्रपक्षांना स्नेहभोजनावळीस निमंत्रित करण्याचे तर काहीच कारण नव्हते. तरीही अमितभाईंचा सांगावा येताच मिळून सारेजण रालोआचे झेंडे खांद्यावर घेऊन दिल्लीत एकत्र आले, आणि आम्ही सारे एक आहोत, अशी ग्वाही दिली, तेव्हाच स्नेहभोजनाच्या प्रयोजनाचे फळ मिळाल्याचे समाधान अमितभाईंच्या चेहऱ्यावर झळकले असणार. निकालानंतरच्या राजकीय परिस्थितीची चातुर्याने पूर्वआखणी करण्याची पहिली खेळी तर अशी यशस्वी झाली असल्याने, उद्या प्रतिस्पर्धी पक्षांचा नवा कात्रजचा घाट करणे अवघड नाही, असाही विश्वास अमितभाईंच्या चमकत्या चेहऱ्यावर झळकला, आणि स्नेहभोजनाच्या निमित्ताने दिल्लीवारी सफल झाल्याचा आनंद सोबत घेऊन सारे रालोआ मित्रपक्ष घरोघरी परतले. दिवसभर, जावे की न जावे असा विचार करीत अखेरच्या क्षणी सहपरिवार स्नेहभोजन सोहळ्यात दाखल झाल्यावरही तेथे मानाचे पान मिळते असा अनुभव कदाचित काहींना गेल्या पाच वर्षांत प्रथमच आला, आणि ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड असे समजून, गतकाळच्या आठवणींची कडवट साठवण मनातून पुसून टाकून काहीजण घरोघरी परतले. अमितभाईंनी याचीही नोंद घेतली असणार.. ही केवळ स्नेहभोजनाची बैठक नव्हती, तर आमच्याकडे नेता आहे असे सांगत विरोधकांना वाकुल्या दाखविण्याचा यशस्वी सोहळा होता, हे ओळखून मित्रपक्षही आनंदले असणार.. गेल्या पाच वर्षांत दुरावलेली मने पुन्हा सांधण्याचा एक आगळा प्रयोग अमितभाईंनी जमवून आणला, आणि पुढच्या पाच वर्षांचे पीक घेण्यासाठी बेमालूम पेरणी केली, हे मित्रपक्षांनाही ठाऊक असणारच! म्हणूनच, उद्धवजींचे मनोगत महत्त्वाचे आहे. अशोकामधील बैठक ही केवळ रालोआची बैठक नव्हती. ती मनामनांची बैठक होती. आपली सर्वाची मने जोडणारी ही बैठक आहे- ही त्यांची भावना म्हणजे जुन्या कडवटपणावर चढविलेल्या नव्या साखरपेरणीचा पुरावाच नाही काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेखक राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक व पुणेस्थित राजकीय भाष्यकार आहेत.

ईमेल  : suhaspalshikar@gmail.com

लेखक राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक व पुणेस्थित राजकीय भाष्यकार आहेत.

ईमेल  : suhaspalshikar@gmail.com