रामयात्रेची मोहीम फत्ते करून राजे परतले. मुक्कामी आनंदोत्सव जाहला.. त्या आनंदाप्रीत्यर्थ रामनामकीर्तनाचा योग घडवून आणावा, असे नवरत्नगणाने सुचविल्याने हरिभक्तपरायणांस पाचारण करण्यात आले. परिचितांस, आप्तगणांस, सन्यगणातील मोजक्या अमलदारांस निमंत्रणे धाडली गेली, आणि एका सुप्रभाती, कीर्तनयोग जुळून आला. दिवाणखान्यात सिंहासनाशेजारी रामप्रतिमा ठेवली गेली. बुवा उभे राहिले. संवादिनीवर रामनामाची धून वाजू लागली, बुवा रामगीत आळवू लागले आणि राजांचे मन पुन्हा मागे, अयोध्येत पोहोचले. जणू बंदिवासात असल्यागत प्रभूराम आपल्यास मुक्तीचे साकडे घालत आहेत, असे त्यांना वाटू लागले. ‘मदंत पाहू नको, त्वरित तू ये.. ये उचलित पाऊली, दया करि माय माऊली.’.. बुवा एक गीत आळवत होते, आणि राम आपल्यासच आवाहन करीत आहे, असे वाटून राजांच्या मनाची तगमग अधिकच वाढली.. डोळ्यांतून भक्तिजलाच्या धारा वाहू लागल्या.. शेजारीच बसलेल्या संजयादी अंमलदारांच्या ध्यानी राजांची ही तगमग आली, आणि त्यांनी बुवांस नजरेनेच खूण केली.. तो अभंग बाजूस सारून बुवांनी लगेचच रामनामाचा गजर सुरू केला.. ‘बोला, रघुपती राघव’.. श्रोतृवृंदातून प्रतिसाद उमटला, अन् राजे भानावर आले. त्यांच्या बाहूंत बळ संचारले.. ‘आज का निष्फळ होती बाण’ अशा अवस्थेतून आपण बाहेर येत आहोत, याची जाणीव त्यांनी होऊ लागली.. चहुबाजूंनी धर्मर्षी हनुमानस्तुती गात आहेत, सर्वत्र भगवे फडकू लागले आहेत, अशा आभासी विचारांचे जाळे राजांच्या मनावर दाटून आले. राजांनी कल्पनेनेच धनुष्यबाण उचलला.. हो, हे तर आपलेच शस्त्र! ..याच धनुष्याची प्रत्यंचा आकर्ण ओढून प्रतिस्पध्र्यावर विचारांचे बाण सोडावयाचे आहेत, हे थोरल्या राजांनी एकदा सांगितले होते, याची राजांना आठवण झाली. पाश्र्वभूमीवर रामकीर्तनाचा गजर सुरूच होता.. अचानक, भान विसरून राजांनी गर्जना केली.. ‘जय श्रीराम’.. तत्क्षणी बुवांनी रामगीत थांबविले. रामनामाचा गजरही काही क्षण थबकला. राजेंनी गर्जना केली, म्हणजे त्यास प्रतिसाद दिलाच पाहिजे, या सवयीनुसार गर्दीतूनही तीच घोषणा उमटली. लगोलग, सन्यगणातील ‘तो’ – आवाज- जागा झाला.. सीमोल्लंघनसमयी विचारांचे सोने लुटण्याआधी तुतारीचा नाद होताच आपण एकाच श्वासात जी घोषणा देतो, त्यापुढे जय श्रीराम म्हटले तर?.. त्याच्या मनात विचार आला, आणि लगेचच, शिवतीर्थावरील भारलेले वातावरण दिवाणखान्यात पसरले. लांबलचक गर्जना करीत शिवभक्ताने ‘जय श्रीराम’चा गजर केला, आणि जणू संदेश मिळाल्यागत भक्तगणांनी त्या घोषणेचा उच्चार केला.. रामजयाचा गजर सर्वत्र घुमू लागला, अन् नव्या बळाची जाणीव होऊन राजे सुखावले.. लगोलग नवरत्नांचा घोळका बाजूस उभा राहिला.. राजांनीही उत्स्फूर्तपणे बाहू उंचावले, अन् घोषणा दिली.. ‘जय श्रीराम’.. गर्दीत तोच सूर प्रतिध्वनीसारखा उमटला, अन् एक सांगावा थेट कोल्हापुरापर्यंत पोहोचला. ‘आता जय महाराष्ट्रसोबत जय श्रीराम म्हणा.. बघा, बाहूंत नवे त्राण संचारते’.. शाखाप्रमुखाने सनिकांना बळमंत्र दिला. इकडे राजे बळाच्या केवळ कल्पनेनेच कमालीचे सुखावले होते. दिवाणखान्यात कीर्तनातील रामधून सुरूच होती..