थोरल्यांच्या छायेत राजकीय झळा, डावपेचांची वादळे यांपासून संरक्षण मिळत असल्याने धाकटी पाती जोमात बहरली. हळूहळू राजकारणात जमही बसू लागला. त्यामुळे निवारा-दाणापाण्यासाठी विविध प्रकारचे जीव आसऱ्यासाठी येऊ  लागले. धाकटय़ा पातीचा आत्मविश्वास दुणावला. हिकमतीने राजकारण सुरू झाले. अंगात जोश असल्याने वाणीलाही धार आली. नव्या जोमाच्या कार्यकर्त्यांनाही आपल्यातलाच एक म्हणून जिव्हाळा वाटू लागला. ताकद थोरल्यांसारखी पण जनरेशन गॅपचा प्रश्न नाही. जातील तेथे तरुणांचा घोळका. एकदा कोणी तरी सांगितले की समर्थ रामदास म्हणायचे, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मग तर बाहू स्फुरूच लागले. निर्धार पक्काच झाला.. आपण स्वत:च्या पायावर उभे राहायचे. पण राजकारणात काही निर्धार जाहीरपणे व्यक्त करायचे असतात; तरच किंमत राहते. मग थोरल्यांनीच उभारलेल्या एका संस्थेतील कार्यक्रमातील भाषणाची संधी साधली. मित्राचे नाव न घेता धाकटे म्हणाले, पन्नाशी उलटली आपली अजून किती दिवस वर विचारून निर्णय घ्यायचा. आता आपणच आपले निर्णय घ्यायचे. टाळ्यांचा कडकडाट झाला. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे सगळीकडे त्याचीच चर्चा. हे पाहून थोरली पाती गालातल्या गालात हसली. फायली बगलेत मारून आपल्या कामात गुंतली. तिकडे दिल्लीच्या वाडय़ातही बाबागाडी वेग पकडत होती. मुंबईतील धाकटय़ा पातीचा दरारा ऐकून होती. तिलाही वाटले की आपणही किती आक्रमक आहोत हे दाखवून द्यावे. मग काय बोलावली पत्रकार परिषद अन् फाडून टाकला आपल्याच सरकारच्या निर्णयाचा कागद. भोवतीच्या कोंडाळ्याला याचे कोण कौतुक वाटले. आधी दिल्लीत अन् मग राज्यात निवडणूक लागली. दिल्लीतला बाबा आणि मुंबईतील दादा दोघांवर विरोधकांनी नेम धरला. जनमत बाहेर आले तेव्हा बाबा-दादा दोघेही साफ झाले. पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीचा खेळ रंगला. दिल्लीतला बाबा पुन्हा साफ आपटला. हिरमुसला. घरात जाऊन बसला. मुंबईत धाकटय़ामुळे आपला पक्ष विस्कटायला नको म्हणून थोरल्याने जिवाचे रान केले. पक्ष सावरलाच नाही तर समोरच्या मित्राने आपल्या साथीदाराचा हात सोडून सोयरिकीसाठी हात पुढे केला. थोरल्यांना एकटय़ाला शक्य नसल्याने त्यांनी दिल्लीच्या वाडय़ाची साथ मागितली. आयती थाळी पुढे येत असताना दिल्लीतल्या बाबाला उचकी लागली. इतके दिवस भांडलो मग आता दोस्ती का, अशी आदळआपट केली म्हणे. शेवटी वाडय़ाच्या मालकीणबाईंनी सूत्रे हाती घेतली. मुंबईतल्या थोरल्यांशी चर्चा केली अन् नवा डाव मांडला. कोसळणारे दोन वाडे सावरणार इतक्यात मुंबईतल्या दादाला आपल्या निर्धाराची आठवण झाली. आपणच आपले निर्णय घ्यायचे. झाले! ज्यांच्याविरोधात थोरल्यांनी डाव मांडला त्या भाऊंशीच हातमिळवणी केली. पण थोरल्यांनी पायाखालचे जाजमच ओढले. दादा रिकाम्या हाताने परतले आणि भाऊंना तो प्रसिद्ध कात्रजचा घाट दिसला. काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय आणि आता बिहारमधील राष्ट्रीय जनता दल काय एकेकाळचे चिरेबंदी वाडे. नवी पिढी त्यावर मजले चढवेल आणि कीर्ती वाढवेल अशीच सोनिया, शरदराव, लालूप्रसादांची मनीषा. पण नव्यांना भार सोसवला नाही आणि भग्न होत चाललेले वाडे सावरण्यासाठी थोरल्यांनाच यावे लागले. सांगे वडिलांची कीर्तीऐवजी सांगू वडीलधाऱ्यांचीच कीर्ती अशी नवी म्हण या वाडय़ांमध्ये ऐकू येते असे म्हणतात.

Story img Loader