महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. चमत्कार ही अंधश्रद्धा आहे असे प्रगत राज्यात मानतात. पण राजकारण केवळ चमत्कारावरच चालते, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहोब ठाकरेंची गाढ अंधश्रद्धा होती. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाने चमत्कारांच्या मालिका अनुभवल्या, आणि अशा चमत्कारांच्या अंधश्रद्धेवर सगळ्यांचीच श्रद्धा बसली. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धांना थारा नाही, असे म्हणत अंधश्रद्धाविरोधी कायदे संमत करणाऱ्या महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चमत्कार होतात अशी एक अंधश्रद्धा राजकारणात वर्षांनुवर्षांपासून रूढ आहे. इथे तर अधिवेशनाआधीच चमत्कार घडूनही गेला असताना एक आठवडय़ाच्या अधिवेशनातही काहीतरी नवा चमत्कार घडेल या अपेक्षेने काहीजणांनी देव पाण्यात घातले, तर काहीजण धास्तावून गेले. अधिवेशनाचे कामकाज संपले, आणि धास्तावलेल्या काहींनी सुटकेचे सुस्कारे सोडत आपले गाव गाठले. पण प्रगत महाराष्ट्राच्या विधिमंडळात चमत्कार घडलाच. हा चमत्कारही असा चमत्कारिक, की तो घडल्यानंतरही कुणालाच कळलादेखील नाही.. ‘नया है वह’ या समजुतीतून तीन पक्षांच्या ठाकरे सरकारवर सभागृहातून हल्ला करण्यासाठी सरसावलेल्या विरोधी पक्षांना तर या चमत्काराची कल्पनाच आली नाही, आणि पाठपुरावा करण्याच्या हिमतीने मैदानात उतरलेल्या विरोधकांना सभात्यागाचे हत्यार हाती घेऊन सरकारला वारंवार तोंड द्यावे लागले. उद्धव ठाकरेंना संसदीय कामकाजाचा आणि सरकार चालविण्याचा अनुभव नाही, पाच वर्षे सत्तेत मुरलेल्या विरोधकांपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही अशा समजुतीत पहिल्याच दिवशी विरोधकांनी सावरकरांचे नाव असलेल्या भगव्या गांधी टोप्या डोक्यावर चढविल्या. सरकार चालविण्याचा अनुभव नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी या पवित्र्यामुळे गोंधळून जायला हवे अशी विरोधकांची अपेक्षा असावी. पण सावरकरांबाबतची आमची कालचीच भावना आज आहे, आणि उद्याही तशीच राहील असे सरकार चालविण्याचा अनुभव नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगतिले, मग मुख्यमंत्री सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोप करीत विरोधकांनीच सभात्याग केला. सरसकट कर्जमाफी, कोरा सातबारा आणि हेक्टरी २५ हजारांची मदत करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता अननुभवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत अशी कुजबुज सुरू झाली, आणि तसेच झाले.. सत्तेचा पुरेपूर अनुभव असलेल्या विरोधकांनी सरकार चालविण्याचा जराही अनुभव नसलेल्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, आणि शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा होताच, विरोधकांना पुन्हा सभात्याग करावा लागला.. ‘बहु बोलले साहेब, परि आम्हांसि काही कळेचिना’ अशी अवस्था ओढवली.. पाच तासांच्या प्रश्नांना तीन मिनिटांची उत्तरे मिळाली, असा आणखी एक चमत्कार हिवाळी अधिवेशनात विरोधकांना अनुभवायला मिळाला, पण तो अधिवेशन संपल्यावर जाणवला.. अशातच अधिवेशन पार पडले. ‘कुछ पन्न्ो क्या फटे, जिंदगी की किताब से, जमाने ने समझा दौर हमारा खतम हो गया’ असे म्हणत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराजधानीत दाखल झालेले, सत्तेत मुरलेले विरोधक, ‘आपण पाहिलेले उद्धव ठाकरे असे नव्हते’ असे आता अधिवेशन संपल्यानंतर म्हणू लागले आहेत. हादेखील त्या चमत्कारानेच दिलेला धक्का नव्हे काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा