काल सकाळी बंटीचे डॅड आणि मॉम यांच्यात जाम वादावादी झाली होती. शेवटी डॅडनी मॉमचं ऐकलं आणि बंटीच्या बर्थडे पार्टीसाठी मित्रांना घरीच बोलवायचं ठरलं. बंटीच्या मित्रांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी लहान मुलांची मासिकं आणू या, त्यांना गोष्टी वाचून दाखवू या असं डॅड म्हणत होता पण मॉमला काही ते फारसं आवडलं नव्हतं. तिनं सकाळीच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आपल्या मत्रिणींशी यावर डिस्कस केलं होतं. ‘मुलांसाठी चारपाच मोबाइल, दोनतीन टॅब्ज, एकदोन लॅपटॉप आणून ठेवा आणि त्यांच्या हवाली करा, त्यांना धमाल करू द्या..’ असा सल्लाच बऱ्याचशा मॉम्सनी बंटीच्या मॉमला दिला होता आणि तिला ही आयडिया जाम आवडली होती. पण डॅड कसला.. तो तरातरा मार्केटमध्ये गेला आणि बालमासिकांचा गठ्ठाच घेऊन आला.. मग बसला त्यांना पॅक करत.. बंटीच्या मॉमने तोवर ग्रुपवरूनच रिक्वेस्ट करून चारपाच टॅब्ज गोळा करूनही ठेवले होते. संध्याकाळी बंटीचे सारे फ्रेंड्स दाखल झाले. काही वेळातच गलबला शांत झाला.. ‘पार्टी सुरू झाली वाटतं..’ बंटीचा डॅड मनात म्हणाला आणि त्याने हळूच बंटीच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. सारी मुलं टॅब्ज घेऊन गेम्स खेळण्यात दंग होती. बंटीच्या डॅडने आणलेल्या स्टोरी बुक्सचा पसारा बाजूलाच पडला होता. बंटीने मात्र, गुड बॉयसारखं वागायचं ठरवलं असल्याने त्यातलंच एक स्टोरी बुक उघडलं, आणि तो ते वाचू लागला. कारण त्याचा बर्थडे असूनही, त्याच्या वाटय़ाला टॅब आलाच नव्हता. हळूहळू बंटी त्या स्टोरीत दंग झाला. राजकन्येला आवडलेला एक मुकुटमणी आणण्यासाठी निघालेल्या एका तरुणाची गोष्ट बंटी वाचत होता. वाटेत येणारे अडथळे, संकटे पार करत, जंगली प्राण्यांना पळवून लावत, राक्षसांच्या तावडीतून स्वतची सुटका करत हा तरुण जंगले, नद्या, पर्वत आणि समुद्र पार करणार असतो. पलीकडच्या सप्तरंगी मातीच्या पर्वताच्या शिखरावरील गुहेत सर्पाच्या पहाऱ्यात असलेला मुकुटमणी आणून राजकन्येला दिला की त्याला राजकन्या मिळणार असते, आणि तो राज्याचा वारसही होणार असतो. बंटी त्या स्टोरीत जाम रमला. त्याला आसपासचं भानच नव्हतं. बाकीचे फ्रेंड्स टॅबवर काहीबाही करत रमले होते.. तितक्यात त्याचा मित्र, विकी, त्याच्या शेजारी येऊन बसला, आणि बंटीच्या हातातल्या स्टोरी बुककडे कुतूहलाने पाहू लागला. बंटीला बरं वाटलं. आतापर्यंत वाचलेला स्टोरीचा पार्ट विकीला सांगण्यासाठी त्याने बुक बाजूला ठेवलं, आणि तो विकीला स्टोरी सांगू लागला. बाजूलाच स्वीटी टॅबवर काही तरी गेम खेळत होती. ‘सेम गेम!’ बंटीची स्टोरी ऐकून ती ओरडलीच.. बंटीला आश्चर्य वाटलं. तो विकीला स्टोरी सांगतच होता.. जिथपर्यंत वाचून झाली, तिथपर्यंत गोष्ट सांगून झाली, आणि बंटीने पुढची स्टोरी वाचण्यासाठी बुक ओपन केलं. ‘ए बंटी.. तुझं स्टोरी बुक स्लो आहे का?’ .. स्वीटीने विचारलं, आणि सगळे जण खदाखदा हसू लागले ‘..मी सगळ्या लेव्हल्स क्रॉस करून तो मणी आणून राजकन्येला दिलापण’ .. स्वीटी म्हणाली, आणि बंटीने बुक मिटून बाजूला ठेवलं. धावतच बाहेर जाऊन त्याने बाबांचा मोबाइल आणला, आणि तोदेखील गेम खेळू लागला. अशा तऱ्हेने बच्चापार्टी मस्त रंगलेली पाहून बंटीचे मॉम-डॅड जाम खूश झाले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा