कोकणच्या मातीला स्वाभिमानाचे बाळकडू पाजण्यासाठी नारायणदादा राणे यांनी स्थापन केलेला पक्ष अखेर भाजपच्या चरणी विलीन होत असल्याने महाराष्ट्राच्या वर्तमान राजकारणाची इतिहासात नोंद करण्याचे श्रेय दादांच्या या पक्षास प्राप्त होणार आहे. दादांचा हा पक्ष म्हणजे नारायणास्त्र असल्याचा समज जेव्हा पसरविला जात होता, त्याच काळात ते निष्प्रभ करण्याचे सारे श्रेय काँग्रेसकडे जाते. शब्दांना सत्याची धार लावून प्रतिपक्षावर प्रहार करण्याची सारी शक्ती हळूहळू शोषून घेऊन काँग्रेसने दादांना वाऱ्यावर सोडल्यानंतर नारायणदादांनी हा स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्याआधी दादा म्हणजे राजकारणातील नारायणास्त्र असून धनुष्यातून सुटणारे बाण निष्प्रभ करण्यासाठी ते प्रभावी असल्याचा समज राजकारणात पसरला होता. पण बदलत्या काळासोबत आता हे अस्त्र नतमस्तक झाले की मगच समोरच्या कोणत्याही अस्त्राचा प्रभाव कमी होतो अशी चर्चा आहे. याला एके काळी स्वाभिमानास्त्र असेही नाव होते असे म्हणतात. ते ज्या भात्यात असेल त्याला पक्षविस्तारासाठी साह्य़भूत ठरते असा खुद्द दादांचा दावा असून आता हे अस्त्र भाजपच्या दावणीस बांधलेले असल्याने केवळ कोकणातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात भाजपच्या विस्तार सेवेसाठी ते सदैव विनम्रपणे सज्ज राहील असा दादांचाही (गर्भित) दावा आहे. अर्थात सिव्सेना (पक्षी : शिवसेना) या पक्षासोबत मात्र कित्येक वर्षांपासूनचा दादांचा उभा दावा असल्याने, स्वपक्षविस्तार म्हणजे, कधी लहान तर कधी मोठा भाऊ असलेल्या सिव्सेनेचे पंख छाटण्यासाठी भाजपकडून या अस्त्राचा वापर केला जाईल ही अपेक्षा मात्र फोल ठरली आहे. कारण सिव्सेनेशी जुळवून घ्यावे लागेल ही पहिली अट मान्य करूनच दादांनी आपले स्वाभिमानास्त्र भाजपच्या चरणी ठेवले आहे. आता भाजपचे आमदार वाढविणे हाच एककलमी कार्यक्रम राबविण्यासाठी दादा सिद्ध झाले आहेत. कोणताही पक्ष स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करतो, मग भाजपने तसा केला तर त्यात गैर काय, असा विधायक विचार करताना, स्वपक्षाला गुंडाळण्याच्या किती वेदना दादांना होत असतील, याची कुणासच कल्पनाही करता येणार नाही. फडणवीस यांची इच्छा असेल, तर शिवसेनेशी जुळवून घेण्याचीही तयारी आहे, असे दादा विनम्रपणे सांगतात. दादा आणि त्यांनी कष्टपूर्वक घडविलेला स्वाभिमानी परिवार बदलतो आहे हे सिद्ध करण्यासाठी आता कोकणी माणसास वेगळ्या पुराव्याची गरज आहे काय? त्या दसऱ्याच्या दिवशी जमिनीवर मांडी ठोकून तासभर बसल्यावर दादांच्या राजकीय वारसास- पक्षी नितेशदादास- भाजप आणि संघ परिवार समजून घेण्याची आयुष्यातील पहिली संधी मिळाली. त्या संधीचे संपूर्ण परिवाराने सोने करून टाकले. परिवर्तनाच्या प्रयोगास एवढय़ा अल्पावधीत असे अचाट यश लाभल्याच्या अनुभवाने अवघा संघ परिवारही सुखावला आहे, अशी जोरदार चर्चा आहे. आता शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची भूमिका मान्य करून दादांच्या स्वाभिमान पक्षाने आणखी एका संस्कारक्षमतेचा स्वीकार केला आहे. दादांच्या इतिहासाचे वर्तमानात असे अद्भुत परिवर्तन घडविण्यामुळे भाजपची मान उंचावणार असून वाल्मीकीकरण योजना हा थट्टेवारी नेण्याचा विषय नाही हेच यावरून सिद्ध होते. परिवर्तनाचा याहून वेगळा दाखला कोणता असू शकतो काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा