अचानक सगळ्यांनी उचल खाल्ली. ती मलिष्का पुन्हा सरसावली, नाटक-सिनेमावाल्यांनी प्रशासनास धारेवर धरण्यास सुरुवात केली. असे काही झाले, की यंत्रणा धाबे दणाणल्यासारखे दाखविते. नव्याने अभ्यास केला जातो.. ‘खड्डेपुराणाचा अखेरचा अध्याय’ सुरू झाला असे वाटू लागते. गेल्या आठवडय़ात अचानक तसेच झाले आणि रस्तोरस्तीचे खड्डे चिंतातुर झाले. आता आपले काही खरे नाही, लवकरच गाशा गुंडाळून घ्यावा लागणार या काळजीने खड्डय़ांची झोप उडाली. मुलेबाळे आणि थोरामोठय़ा खड्डय़ांना नवा पाझर फुटला. आपले आयुष्य आता संपणार, पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला जमिनीत गाडून घ्यावेच लागणार या कल्पनेने सारे खड्डे गळ्यात गळे घालून एकमेकांच्या सोबतीने, भयाण नजरेने आला दिवस कसा जाणार या चिंतेने अधिकच गहिरे झाले. खड्डय़ांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आणि जनतेच्या मनात नव्या आशा पालवल्या. अपेक्षांना नवे अंकुर फुटू लागले. आता खड्डय़ांची अखेर जवळ आली, असेही लोकांना वाटू लागले. उभा पावसाळा ज्यांनी आपल्याला छळले, कंबरदुखी, सांधेदुखी, हाडे मोडण्यासारखे विकार जोडून त्रस्त केले, ते खड्डे बुजविण्याची वेळ आता दूर नाही या अपेक्षेने सामान्य जनतेच्या नजरा आशाळभूतपणे यंत्रणांच्या कृतीकडे लागल्या आणि तमाम खड्डेजमातीच्या पोटात आणखी खोल खड्डे पडले. आता गाशा गुंडाळण्याची वेळ आली, या जाणिवेने ते गलितगात्र झाले.. निर्वाणीच्या सुरात एकमेकांचा निरोप घेऊ लागले आणि अचानक एक सुवार्ता येऊन थडकली. साऱ्या खड्डय़ांच्या नजरा चमकल्या. मरगळ कुठल्या कुठे पळाली आणि जगण्याच्या नव्या उभारीने सारे खड्डे पुन्हा तरारून उठले.. हाकारे सुरू झाले. एकमेकांच्या गळ्यात गळे घातलेल्या गलितगात्र खड्डय़ांना चैतन्य आले. आता उत्सव साजरा केला पाहिजे, असेही वाटू लागले. पितृपक्ष संपला, की नवरात्रीच्या अखेरच्या टप्प्यात माणसांच्या जगात ‘खंडेनवमी’ साजरी केली जाते. आपण या वर्षी ‘खड्डेनवमी’ साजरी करून नवजीवनाचा आनंद एकमेकांत वाटून घेऊ, असे तमाम खड्डेजमातीने ठरविले.. मोठय़ा खड्डय़ांचा जगण्याच्या उत्साहाचा हा बहर पाहून, यंदाच्याच पावसाळ्यात नव्याने जन्माला आलेले लहानलहान खड्डे अचंबित झाले. पुरते आयुष्यही उपभोगून झालेले नाही, अजून कुणीच आपल्या पोटात आदळून जखमी झालेला नाही, कुणाचेच कंबरडे खचलेले नाही, तेवढय़ात गाशा गुंडाळावा लागणार या भयाच्या सावटाखाली खचून गेलेल्या लहान खड्डय़ांच्या आशा पालवल्या होत्या; पण नेमके काय झाले ते त्यांना कळलेच नव्हते. ‘बुजण्याचे भय संपले आहे, आता खड्डेनवमीसाठी सज्ज व्हा’ असा सांगावा आजूबाजूच्या मोठय़ा खड्डय़ांनी एका भयाण रात्री हळूच लहानग्या खड्डय़ांच्या कानात दिला. पण असे घडले तरी काय, हा प्रश्न त्यांना छळत होताच. मग लहान खड्डे एकत्र आले. या आनंदोत्सवाचे कारण मोठय़ा खड्डय़ांना विचारले पाहिजे, असे ठरले आणि दुसरा दिवस उजाडला. सारे लहान खड्डे मोठय़ांभोवती गोळा झाले. मोठय़ा खड्डय़ांना ते अपेक्षितच होते. मग एक मोठा खड्डा स्वत:हूनच लहान खड्डय़ांच्या घोळक्यात उभा राहिला आणि गाऊ लागला.. ‘मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा.. आचारसंहिता लागू झाली आहे.. आता आपल्याला कुणीच हात लावणार नाही. मतदारांवर प्रभाव पडेल, मतदार खूश होतील असे कोणतेही काम करण्यास आयोगाने मनाई केली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम आता लांबणीवर पडणार.. आपले आयुष्य वाढले आहे.. खड्डेनवमीच्या तयारीला लागा..’ मोठय़ा खड्डय़ाच्या सुरातला आनंद लपत नव्हता. मग लहान खड्डय़ांनी जोरदार जल्लोष केला. आता सारे जण ‘खड्डेनवमी’च्या तयारीला लागले आहेत!

Story img Loader