आज मोरूला अंमळ लवकरच जाग आली. नेहमी सूर्य डोक्यावर येईपर्यंत मोरू घोरत पडलेला असायचा. एरवी तो झोपलेलाच बरा, असा विचार करून मोरूचा बाप त्याला जागे करत नसे. आज मात्र मोरूचा बाप त्याच्या खाटेसमोर बसला होता. आज तरी मोरूने लवकर उठावे, सोने लुटावे, सीमोल्लंघन करून यावे अशी त्याची इच्छा होती. पण मोरूला हाक मारून उठवले तर मोरू मनातल्या मनात आपल्याला लाखोली वाहतो हे माहीत असल्याने मोरूच्या बापाचे धाडसच होत नव्हते. मोरू स्वत:च जागा झाल्याचे पाहून त्याने सुस्कारा सोडला आणि मोरूकडे पाहून त्याने हलकेच स्मितहास्य केले. मोरूनेही हलके हसून बापास प्रतिसाद दिला. मोरूच्या बापाने कापसाच्या बोळ्याने पट्टय़ाच्या बक्कलला ब्रासो चोळले आणि तो बाजूला ठेवून बुटांना पॉलिश करावयास घेतले. आज मोरूने संचलनात सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा होती. पण मोरू दसऱ्याच्या दिवशी विचारांचे सोने लुटण्यासाठी जातो, हे माहीत असल्याने मोरूला आग्रह करावयाचा नाही असे त्याचे मत होते. आज मात्र मोरू बापाचा बुटावरून सफाईदारपणे फिरणारा हात कुतूहलाने न्याहाळत होता. लहानपणापासून स्वयंसेवक असलेल्या आपल्या बापाने, सायंशाखा चुकू नये म्हणून रात्रपाळी लावणाऱ्या नोकरीवर तडफदारपणे लाथ मारली होती, हे मोरूला माहीत होते. पण तो मात्र शाखेवर कधीच रमला नाही. आपण छत्रपतींचा मर्द मावळा, ढाण्या वाघाची अवलाद आणि आई भवानीचा भक्त वगैरे आहोत, असे मोरूला वाटत असे. दर दसऱ्याला विचारांचे सोने लुटून घरी आल्यावर बहीण काशी कौतुकाने ओवाळायची तेव्हा मोरूची छाती अभिमानाने फुलून जात असे. पुढे मोठा होऊ लागल्यावर, मावळा, वाघनखे, अफझलखान वगैरे झूठ असून खळ्ळ खटय़ाक हेच खरे मर्दाचे लक्षण आहे असे वाटू लागल्याने मोरू तिकडेही वळला होता. पण दोनचार खटले अंगावर चढताच त्याचे डोळे उघडले आणि मोरू पुन्हा नाक्यावरच्या शाखेवर हजर झाला. त्याने आपल्या शाखेवर यावे असे मोरूच्या बापास नेहमीच वाटत असे, पण मोरूपुढे बोलायचे धाडस त्याला होत नसे. आज मात्र मोरूला विचारायचेच असे ठरवून त्याने मोरूला हाक मारली. ‘‘मोरया, आज तू संचलनास येणार की शिलंगणास जाणार?’’ असे त्याने विचारले, आणि मोरू चपापला. आज प्रथमच त्याला संभ्रम वाटू लागला होता. विचारांचे सोने लुटण्यासाठी शिलंगणास जावे, की संचलनात सहभागी होण्यासाठी शाखेवर जावे, हे त्यालाच कळत नव्हते. मोरू तडक मोरीजवळ गेला आणि दात घासून त्याने टेबलावरचा कागद समोर ओढला. संचलन झाल्यानंतर लगेच सारे स्वयंसेवक पक्ष कार्यालयात गोळा होणार असून प्रचाराच्या जबाबदाऱ्यांचे वाटप होणार असल्याचा निरोप त्यावर दिसताच मोरूचे डोळे चमकले. सध्या नोकरीधंदा काहीच नसल्याने रिकामपणात वेळ घालविण्यापेक्षा संचलनानंतर प्रचारात जावे म्हणजे काही सोयदेखील होईल, असा विचार करून मोरूने बापाकडे पाहिले. ‘‘आज मी संचलनास येणार’’.. मोरू म्हणाला आणि मोरूच्या बापाचे पॉलिश करणारे हात थबकले. डोळ्यांत आनंदाश्रू जमा झाले. त्याने प्रेमाने मोरूच्या केसातून हात फिरविला. ‘‘आता नोकरीधंदा नसल्याची खंत करू नकोस.. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात आपण सहभागी होत आहोत यातच जीवनाचे सार्थक सामावले आहे’’.. मोरूचा रिटायर बाप भरल्या गळ्याने मोरूला म्हणाला आणि स्वयंपाकघरातून आई आणि काशीने एका सुरात दिलेला नापसंतीचा हुंकार मोरूच्या कानात घुमला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा