माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम, कणव रुजली की हिंसक मानसिकता हळूहळू कमी होते, असे म्हणतात. राष्ट्रसंत गाडगेबाबांची ही शिकवण! समाजातील हिंसक प्रवृत्ती कमी व्हाव्यात यासाठी त्यांनी भूतदयेचा मार्ग समाजाला दाखविला. गोहत्येचा निषेध केला आणि गोपालनाचा पाठ समाजास मिळावा यासाठी गोशाळा स्थापन केल्या. मध्य प्रदेशच्या सरकारने गाडगेबाबांपासून धडा घेतला किंवा काय ते कळावयास मार्ग नाही. कदाचित, राजकीय अपरिहार्यता म्हणून किंवा जनतेच्या भावनांवर राजकीय फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी, राज्यात गोशाळा स्थापन करण्याची ग्वाही काँग्रेसने जाहीरनाम्यातच दिली, तेव्हा राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या ..जनतेने मात्र या आश्वासनास दाद दिली. त्याचे कारण आणखीच वेगळे असावे. रस्तोरस्ती मोकाट हिंडणाऱ्या गाईगुरांच्या झुंडींना सरकारी वेसण बसणार हा कदाचित जनतेच्या दिलाशाचा भाग असावा. काहीही असले, तरी मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेवर आल्यामुळे त्या राज्यात गोप्रेमाचे भरते सुरू झाले, आणि अप्रत्यक्षपणे का होईना, गाडगेबाबांच्या शिकवणीचा पगडा वाढू लागला असे दिसते. या राज्यातील चंबळच्या खोऱ्यात बंदूक हा शरीराचा अविभाज्य भाग परंपरेनेच प्रस्थापित झाला असल्याने, बंदूक हा प्राणापलीकडचा जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच, ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करावयास हवे. गोरक्षणवृद्धीसाठी त्यांनी मोठय़ा खुबीने बंदुकीचा वापर केला. म्हणजे, बंदुकीचा परवाना पाहिजे असेल, तर गोशाळांमधील किमान दहा गाईंचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करा असा आदेशच त्यांनी काढला. दहा गाईंसाठी पांघरुणे दान करणाऱ्यास बंदुकीचा परवाना प्राधान्याने मिळेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. मुक्या प्राण्यांना जगविण्यासाठी मन मोठे असावे लागते. बंदुकीच्या ताकदीवर वरचढपणा करणाऱ्यांच्या मनाला हा मोठेपणा मिळवून देण्याच्या प्रयोगातून भूतदयेची आगळी अनुभूती बंदूकधाऱ्यास आली, तर बंदुकीचा वापर शस्त्र म्हणून करण्याचा विचारदेखील त्या मनास शिवणार नाही, हा विचार यामागे होता की कसे हे कळावयास मार्ग नाही. मध्यंतरी, याच भागातील वीजबिल थकबाकीच्या वसुलीसाठीदेखील असाच एक नामी उपाय आखण्याची शिफारस राज्य वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. ज्यांच्याकडे वीजबिलाची थकबाकी आहे, त्यांचे बंदूक परवाने रद्द करावेत, असा सल्ला मंडळास देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. पण केवळ या एकाच भयातून वीजबिलाच्या थकबाकीची वसुली मात्र नक्कीच झाली असेल, यात शंका नाही. मन मोठे करण्याच्या अटीवर बंदुकांचे परवाने देण्याचा हा प्रयोग मध्य प्रदेशात यशस्वी झालाच, तर हातात प्राणघातक शस्त्रे हाती असलेल्यांची मनेही भूतदयेने भारावलेली दिसतील. शस्त्र हवे असेल तर आधी भूतदयेचे प्रमाण दाखवा हा नवा प्रयोग मन मोठे करण्यासाठी उपयुक्त ठरेलच, पण शस्त्रांची धारदेखील कमी होईल. आपल्या एका फतव्यातून आपण मनपरिवर्तनाच्या प्रयोगाची पायाभरणी करत आहोत, याची ग्वाल्हेरच्या त्या जिल्हाधिकाऱ्यांस जाणीव तरी असेल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा