निवडणूक जाहीरनामा : मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या काही महिन्यांत आपल्या उत्तम अशा उत्तर प्रदेशात निवडणूक होणार आहे. यात यश मिळावे म्हणून प्रतिस्पर्धी पक्ष घोषणांचा पाऊस पाडण्यासोबतच महामार्गावर लढाऊ विमाने उतरवून खरे देशभक्त असल्याचा आव आणत आहे. वास्तविक महामार्गावर असे विमान पहिल्यांदा उतरले ते २०१६ मध्ये, राज्यात आमची सत्ता होती तेव्हा. तरी केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांची ही कृती आहे. यांच्या देशभक्तीतला फोलपणा लक्षात यावा म्हणून आम्ही यापुढे सत्तेत आल्यावर सलग पाच वर्षांसाठी एक नवी योजना जाहीर करीत आहोत. ‘यूपी महामार्ग वाहतूक व उड्डाणयोजना’ याचा राज्यभरातील जनतेला लाभ पोहोचवण्याचा आमचा ठाम इरादा आहे. त्यानुसार सत्ता येताच पहिल्या दोन वर्षांत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असे गुळगुळीत महामार्ग तातडीने बांधण्यात येतील. हा प्रत्येक मार्ग सोळा पदरी असेल व त्यावर एकाच वेळी विमान उतरणे, उड्डाण घेणे, बसगाडय़ा धावणे तसेच खासगी वाहतूक शक्य होईल. या मार्गावर प्रत्येक महिन्यात लढाऊ विमानांचे प्रदर्शन आयोजित केले जाईल. त्याला त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हजर असतील. या कार्यक्रमासाठी लोकांना गोळा करता यावे म्हणून सरकारी वाहतूक सेवेचा उपयोग केला जाणार नाही व सामान्य जनतेला त्रास होऊ दिला जाणार नाही. हे प्रदर्शन सुरू असताना मार्ग मोठा असल्याने इतर वाहतूक सुरूच ठेवली जाईल. प्रदर्शन करणाऱ्या विमानातून आजूबाजूच्या परिसरावर पुष्पवृष्टी केली जाईल, यामुळे शेतात वा आता अन्य ठिकाणी काम करणाऱ्या जनतेत आपसूकच देशभक्तीची भावना निर्माण होईल. विमानांच्या आवागमनासाठी सदैव सज्ज असलेले हे महामार्ग राज्य सरकार स्वत:च्या तिजोरीतून तयार करेल, त्यासाठी केंद्राची मदत घेतली जाणार नाही. प्रदर्शनासाठी केंद्राने लढाऊ विमाने देण्यास नकार दिला तर राज्य स्वत: काही विमाने खरेदी करेल. राज्यातील जनतेत करमणुकीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश रुजावा हाच या योजनेचा उद्देश आहे. भविष्यात याच महामार्गावर प्रवासी विमानसेवासुद्धा सुरू करण्याचा आमचा मानस आहे! ‘विमानतळाशिवाय, रस्त्यावरून विमानोड्डाण’ हेच आमचे पुढील धोरण असणार, त्यामुळे केंद्राच्या ‘विमानतळ खासगीकरणातून एकाच उद्योगपतीला फायदा’ या योजनेला आपसूकच ब्रेक लागेल. याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्य़ाला जोडणारी ही हवाईसेवा गरिबांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे महामार्गावर उभे राहिले की वाहतुकीचे सर्व पर्याय उपलब्ध राहतील. या महामार्गाना जोडणारे पोचरस्ते चांगले करण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण तिजोरीवर एकदम भार नको म्हणून पहिली चार वर्षे या रस्त्यांच्या बांधकामाकडे लक्ष दिले जाणार नाही. यामुळे नागरिकांची थोडी गैरसोय होईल पण त्यासाठी आतापासूनच दिलगिरी व्यक्त करण्याची आमची तयारी आहे. पुन्हा सत्ता मिळाल्यावर मात्र या पोचरस्त्यासोबतच दुर्गम भागातले रस्तेसुद्धा गुळगुळीत नाही पण वाहतूक करण्यायोग्य केले जातील. लढाऊ विमानांच्या प्रदर्शनासोबतच नियमितपणे हवाई कसरतीसुद्धा आयोजित करण्याचे आमचे प्रयत्न राहणार असून शेतकऱ्यांना त्या शेतात काम करता करताच पाहता येतील. त्यासाठी महामार्गावर गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही. देशभक्ती रुजवण्याची जबाबदारी एकटय़ा केंद्राची नसून राज्याचीसुद्धा आहे हे जनतेत ठसवण्यासाठीच ही योजना आखण्यात आली असून ती साकार करण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून द्यावे असे आवाहन आमच्या पक्षातर्फे करण्यात येत आहे.
‘लढाऊ’ महामार्ग!
प्रदर्शनासाठी केंद्राने लढाऊ विमाने देण्यास नकार दिला तर राज्य स्वत: काही विमाने खरेदी करेल.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-11-2021 at 02:45 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up assembly election 2021 purvanchal expressway inauguration narendra modi zws