विधानसभा निवडणुकीचे निकाल महिन्याच्या उंबरठय़ावर येऊन थांबल्याने नेहमीप्रमाणे नव्या सरकारची प्रतीक्षा करणारी विधान भवनाची वास्तू कंटाळून गेली असताना, महापालिकांच्या वास्तू मात्र, उत्साहाने एक एक दिवस मोजत होत्या. अडीच वर्षांनंतरचा ‘भाकरी फिरविण्याचा’ एक नवा सोहळा पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार, नवा महापौर येणार, त्याच्या स्वागताचा जल्लोष होणार, भगवे फेटे आणि भगवे झेंडे फडकावत कार्यकर्ते नव्या सत्तासंपादनाचा विजय साजरा करणार, हे त्या वास्तूला अपेक्षितच होते. तो दिवस जवळ येऊ लागला, तरी उत्साहाचे ते अपेक्षित वारे आसपास फिरकतच नव्हते. महापालिकांच्या वास्तूच्या भिंतींवरच्या शंकांच्या पाली उगीचच चुकचुकू लागल्या.. अखेर तो दिवस उजाडला, आणि महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या. कोणास अपेक्षेप्रमाणे यश मिळाले, तर कोणास अनपेक्षित धक्के बसले.. असे झाले तरी त्या त्या पक्षाची जल्लोषाची प्रथा पार पडतेच, असाच अनुभव असल्याने महापालिकांच्या वास्तू उत्सुकतेने झेंडेधारी नेत्यांची प्रतीक्षा करू लागल्या.. ढोलताशे वाजताहेत, असा भासही त्या वास्तूंना झाला, आणि हे पडघम आता कानाशी घुमू लागतील, या अपेक्षेने वास्तूंच्या भिंती सरसावूनही बसल्या. पण तो दिवस काहीसा वेगळाच होता. उगवतानाच कोमेजलेला.. निवड जाहीर झाली, सभागृहात अभिनंदनाचे सोपस्कार सुरू झाले, आणि विरोधी बाकांवरून ज्यांनी आजवर या आसनास धारेवर धरले, तेही आस्थेने आसनासमोर येऊन अभिनंदन करू लागले.. पण ज्यांच्या आमगनानंतर जल्लोषाचा जोर वाढतो, त्यांचा मात्र पत्ताच नसल्याने जल्लोषावरही उदासीनतेचेच सावट दाटले.. मग बातम्या येऊ लागल्या, आणि उलगडाही होऊ लागला. फेटेधारी महापौर चेहऱ्यांवर उसने हास्य आणत अभिनंदनाचा स्वीकार करू लागले, तरी ‘तिकडे’ काय सुरू आहे याकडेच साऱ्या नजरा लागल्या होत्या. इथे सत्तेची सारी गणिते अपेक्षेप्रमाणे पार पडली तरी ‘तिकडे’ अनपेक्षित असा सत्तासंघर्ष सुरू होता. संघर्षांची धार, वळणे, टप्पे आणि कोलांटय़ा, साऱ्या कसरती करूनही संघर्ष स्थिरावतच नव्हता. आसपास असे काही घडत असले, की जणू शिष्टाचार असावा, अशा शिस्तीने अवघ्या राजकारणावर आपोआपच उदासीनतेचे सावट दाटू लागते. त्याचे टप्पेही ठरलेले असतात. इथे तर, राज्याच्या सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचलेला, त्यामुळे महानगरांच्या राजकारणाने आपल्या प्रतिष्ठेचा झेंडा मिरवलाच नाही. माध्यमांनीही शिष्टाचारापुरतीच महानगरांच्या कौलाची दखल घेतली. महापालिकांच्या वास्तू आणखी हिरमुसल्या चेहऱ्याने राज्याच्या राजकारणाची वळणे न्याहाळू लागल्या.. गेल्या कित्येक वर्षांत, महापौर निवडीच्या उत्साहाला असे राजकारणाचे ग्रहण लागले नव्हते. आर्थिक राजधानीतील महापालिकेच्या वास्तूवर फडकणाऱ्या भगव्याला मात्र, भावना व्यक्त करताच येत नव्हत्या.. राहून राहून स्वतकडे पाहात, स्वतस न्याहाळताना, आपला नेमका रंग कोणता तेच त्याला समजत नव्हते. पुन्हा भगवा फडकला, असा सूर सभागृहाच्या उजव्या बाजूला उमटू लागला.. वाऱ्याची एक झुळूक आली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे तो ‘भगवा’ वाऱ्याच्या तालावर फडकू लागला.. समोरच्या रस्त्यांवरून वाहणाऱ्या गर्दीची नजर कौलाकडे गेली, आणि गर्दी कुजबुजू लागली, ‘भगवा फडकला’! मग वास्तूला नेहमीप्रमाणे आनंद झाला, भिंतींचा काळवंडलेपणा मावळू लागला.. सत्तेचा एक टप्पा पार पडल्याच्या समाधानाने सुस्कारा सोडत त्या वास्तूने मान वळविली, आणि आसपास सुरू असलेल्या सत्तासंघर्षांकडे पुन्हा एकदा नाइलाजाने नजरा लावल्या!
.. आणि ‘झेंडा’ फडकला!
सभागृहात अभिनंदनाचे सोपस्कार सुरू झाले, आणि विरोधी बाकांवरून ज्यांनी आजवर या आसनास धारेवर धरले,
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-11-2019 at 02:00 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election result akp 94